Sunday, 15 December 2013

अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतीत नवतंत्राचा वापर आवश्यक- केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे प्रतिपादन


अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतीत नवतंत्राचा
वापर आवश्यक-केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे प्रतिपादन

 जळगाव, दिनांक 15 :- देशाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी शेती मधील नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे  केले.
येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने आधुनिक कृषीतंत्राचा वापर करुन कृषी प्रयोग करणा-या आणि कृषी उत्पादन घेणा-या शेतक-यास दिला जाणारा  पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च - तंत्र पुरस्काराचे वितरण केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
जैन इरिगेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा कै. डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार- 2012 कोकणातील डॉ. अनिल विठ्ठल जोशी रा.नरवण, ता. गुहागर, जि. रत्नागिरी यांना प्रदान करण्यात आला.  दोन लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याच समारंभात जागतिक पातळीवर केळी, डाळींब, टिश्युकल्चर रोपांच्या निर्मितीत प्रथम क्रमांकावर असलेल्या अत्याधुनिक जैन टिश्युकल्चर पार्कचेही ना. पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या समारंभास विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, कृषी राज्याचे कृषीराज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे, खासदार सर्वश्री ईश्वरलालजी जैन, हरिभाऊ जावळे, ए. टी. नाना पाटील, जैन उद्योग समूहाचे संस्थापक भंवरलाल जैन, ना.धो. महानोर, दलीचंद जैन विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी राज्यमंत्री सतीश पाटील,आमदार सर्वश्री. गिरीश  महाजन, गुलाबराव देवकर, राजीव देशमुख, जगदीशचद्र वळवी, शिरीष चौधरी, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार गुलाबराव पाटील, डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे,   महापौर राखीताई सोनवणे,  डॉ. शंकरराव मगर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी ना. पवार  पुढे म्हणाले की, शेती करताना शेतक-याला अनेक अडचणी येतात.शेतीचं उत्पादन विचारात घेतांना झालेला खर्च वजा जाता शेतक-याला चार पैसे  प्रपंच चालविण्यासाठी मिळावे इतपत तरी शेत मालाला भाव मिळाला पाहिजे यादृष्टीने शेतीच्या अर्थशास्त्राचा विचार व्हावा,  अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील 60 टक्के लोक हे शेती उद्योगावर अवलंबून आहे त्यामुळे शेती मध्ये भांडवली गुंतवणूक वाढली पाहिजे, मर्यादित जागेत शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन बियाणांचे संशोधन झाले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
समारंभाच्या प्रारंभी दिवंगत केंद्रीय श्रममंत्री शिवराम ओला यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन भवरलाल जैन यांनी केले.  आपल्या प्रास्ताविकात त्यांनी  सर्वसाधारण शेतक-याला सुखी करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सांगत, या पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेविषयी त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी विरोधीपक्षनेते एकनाथराव खडसे यांचेही समयोचित भाषण झाले.
 पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. अनिल जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते सपत्निक गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी कृतज्ज्ञता व्यक्त करीत हा पुरस्कार शेतीमुळे स्वावलंबी झालेल्या शेतक-यांचा हा गौरव आहे असे सांगितले. या शाबासकीमुळे आपल्या जीवनात नवे पर्व सुरु झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
 या कार्यक्रमास जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, पोलीस अधीक्षक एस. जयकुमार तसेच ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
         हा व्दिवार्षिक पुरस्कार यापूर्वी तेलंगवाडी जि. सोलापूर येथील डाळींब उत्पादक विश्वासराव कचरे, (2002) आकोटे, जि. अकोला येथील प्रभाकर मानकर  (2004), विश्वासराव आनंदराव पाटील ( पाचोरा , जि. जळगाव ) (2006),  भगवानराव यशवतराव क्षीरसागर ( कडबंची, जि. जालना) (2008) यांना प्रदान करण्यात आला आहे. पुणे जिल्हयातील वाघापूर येथील सौ. मनिषा कुंजीर 2010 या शेतक-यांना  देण्यात आला आहे.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment