Tuesday, 31 December 2013

मागासवर्गीयांच्या बचत गटांना शेतीसाठी अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेस 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

मागासवर्गीयांच्या बचत गटांना शेतीसाठी
अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेस 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

        जळगाव, दि. 31 :- शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना शेतीसाठी यंत्र वापर करता यावा यासाठी 90 टक्के अनुदानावर मिनीट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा करण्यात येणार आहे.  यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून त्यासाठी दि. 10 जानेवारी, 2014 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
             योजनेचे लाभार्थी हे अनुसूचित जाती व नवबौध्द स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द समाज घटकातील असावेत, ट्रॅक्टर खरेदीला कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार रूपये इतकी असून, बचत गटांनी 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.  पात्र बचतगटांनी बचतगट नोंदणी प्रमाणपत्र, बँक पासबुक, घटनाप्रत, सदस्य यादी, सदस्याचा जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यांच्या साक्षांकीत प्रती जोडून प्रस्ताव दि. 10 जानेवारी, 2014 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.


* * * * * * * *

Monday, 30 December 2013

आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा व आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा
व आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

जळगाव, दि. 30 :- रयतशिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत यशवंतराव चव्हाण इन्स्टि. ऑफ सायन्स, सातारा येथे दि. 16 ते 18 जानेवारी 2014 या कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमुजुषा स्पर्धेचे व दिनांक 21 व 23 जानेवारी 2014 या कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धाची माहितीपत्रके रयत शिक्षण संस्थेच्या www.rayatshikshan.edu व  www.karmaveeranna.com  या वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहेत. या दोन्ही  स्पर्धाच्या अधिक माहितीसाठी (नियम अटीसाठी) संपर्क फोन  व फॅक्स नं. 02162-231074, भ्रमणध्वनी क्र. 9850555938  ई-मेल - kvp.rayat@gmil.com
            प्रश्नमंजुषा स्पर्धा - पारितोषिक - चषक व स्मृतीचिन्हासह अनुक्रमे रोख रु. 5000/-, 4000/, 3000/- व रुपये 1000 ची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके. रजिस्ट्रेशन - राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्‍नमंजुषा स्पर्धा दि.11/1/2014 पर्यंत, संपर्क फोन नं. 02162-234392 भ्रमणध्वनी क्र. 9860375135 ई-मेल  yci_satara@dataone.in ,  वक्तृत्व स्पर्धा विषय- कर्मवीरांची विचारधारा आणि आजचा युवक, स्वयंअर्थसहाय्यित शाळा : बहुजन शिक्षणाची मृत्यूघंटा, विवेक व विज्ञान निष्ठा, महिला सबलीकरण : सत्य की आभास, समाज परिवर्तनात प्रसारमाध्यमांची भूमिका, जगात कविताच नसती  तर. .
             रजिस्ट्रेशन - राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा दि. 18 जानेवारी 2014 पर्यंत.

                                  * * * * * * *

1 जानेवारी पासून संजय गांधी योजना व मंडळ अधिकारी जळगाव, प्रिंपाळा कार्यालय नवीन जागेत सुरु

1 जानेवारी पासून संजय गांधी  योजना व
मंडळ अधिकारी  जळगाव, प्रिंपाळा कार्यालय नवीन जागेत सुरु

 जळगाव, दि. 30 :- जळगाव येथील स्टेशन रोड  लगतच्या शासकीय मिळकतीवरील बांधीव तालुका प्रशासकीय इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरण करण्यात आले असून सदर तालुका प्रशासकीय इमारतीमध्ये दिनांक 1 जानेवारी 2014 पासून पहिला मजला हॉल क्र. 1 मध्ये तहसिलदार, संजय गांधी योजन, अ वर्ग न. पा. क्षेत्र जळगाव तर पहिला मजला हॉल क्र. 2 येथे मंडळ अधिकारी, जळगाव यांचे कार्यालय आणि मंडळ अधिकारी पिंप्राळा ता. जळगाव यांचे कार्यालय सदर जागेत सुरु होणार आहेत  असे जिल्हाधिकारी जळगाव यांनी कळविले आहे.

* * * * * * *

पाणी अर्ज सादर करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यत मुदतवाढ

जळगाव, दि. 30 :-  गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव अंतर्गत गिरणा प्रकल्पावरील पांझरा डावा कालवा, जामदा डावा कालवा व निम्न गिरणा कालव्याव्दारे कालवा प्रवाही, कालवा उपसा, जलाशय उपसा, लाभ क्षेत्रातील अधिसूचित नदी, नाले, ओढे यावरुन उपसा सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहिरीवरुन पाण्याचा लाभ घेणा-या  लाभार्थ्यासाठी  गिरणा प्रकल्पात यावर्षी अंशत: पाणीसाठा उपलब्ध झालेल्या आहे. त्यापैकी पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरीत उपलब्ध पाणीसाठयातून दिनांक 15 ऑक्टोंबर 2013 ते 28 फेब्रुवारी 2014 या कालावधीत रब्बी हंगाम 2013-14 मधील उभी पीके तसेच विहीरीवरुन किंवा अन्य मार्गाने पाणी पुरवठयाची पर्यायी व्यवस्था असेल अशा लाभधारकांना गहू, हरबरा, ज्वारी, दादर, हा. दूरी, मका, कडबाळ, कपाशी, सुर्यफुल , कुरडई, भाजीपाला इत्यादी पिकांना जानेवारी 2014 मध्ये दोन आर्वतनात सिंचनाचे पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचनासाठी मर्यादित पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे., त्यासाठी  अटींच्या पुर्ततेसह नमुना नं. 7, 7 अ, व 7 ब चे पाणी अर्जावर मागणी करुन पाणीअर्ज दिनांक 20 डिसेंबर 2013 च्या आत मागविण्यात आले होते. पंरतू पुरेसे मागणी अर्ज क्षेत्र प्राप्त न झाल्यामुळे पाणी मागणी करण्यासाठी 31 डिसेंबर 2013 पर्यत मुदतवाढ देण्यात येत आहे. वाढीव मुदतीत अटींच्या पुर्ततेसह नमुना नं. 7, 7 अ, व 7 ब चे पाणी अर्जावर मागणी करुन पाणी अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2013 च्या आत संबंधीत पाटशाखेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अगर पोष्टाने देण्याचे करावे. मुदत वाढीचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा  या नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही. सन 2013-14 मधील अटी व शर्ती बंधनकारक राहतील असे कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांनी कळविले आहे.


* * * * * * *

Thursday, 26 December 2013

महावितरणाच्या वसुली मोहिमेस उत्तम प्रतिसाद कृषि पंप ग्राहकांने भरली एक-रकमी थकबाकी


महावितरणाच्या वसुली मोहिमेस उत्तम प्रतिसाद
कृषि पंप ग्राहकांने भरली एक-रकमी थकबाकी
     
चाळीसगाव दिनांक 26 :- राज्य शासनाच्या आदेशानुसार  संपुर्ण राज्यभरात महावितरण मुख्यालय, मुंबई यांचेकडून थकबाकीदार कृषि पंप ग्राहकांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नुसार परिमंडळ कार्यालय, जळगांव यांच्या अधिपत्याखालील चाळीसगाव विभागात देखील कृषि पंपांची विज बिलाची थकबाकी वसुली मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत चाळीसगाव ग्रामीण उप विभाग क्रं.1 मध्ये जवळपास 1495 ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करण्यात आला असुन त्यांचे कडून थकबाकी वसुलीची कार्यवाही सुरु आहे. मुख्यालयाने एप्रिल-2012 ते डिसेंबर-2013 या कालावधीतील एकूण सहा विज बिलांच्या वसुलीचे आदेश पारित केले आहेत. त्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील प्रगतीशिल शेतकरी श्री.शांताराम दराडे, करंजगांव ता.चाळीसगांव यांनी एक रकमी 65 हजाराची विज बिलाची थकबाकी  महावितरण ग्रामीण उपविभाग क्रं.1 चे सहाय्यक अभियंता धिरज चव्हाण यांच्याकडे भरणा केला आहे. या निमीत्ताने शेतक-यांनी या उपक्रमात सक्रीय सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळावे हा उद्देश ठेवून श्री.शांताराम दराडे यांना चाळीसगांव ग्रामीण उपविभाग क्रं 1 कार्यालयातच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  
            तरी तालुक्यातील इतर कृषि पंप ग्राहक, शेतक-यांनी श्री.शांताराम दराडे यांचा आदर्श समोर ठेवून आपल्याकडील विज बिल थकबाकीचा भरणा करावा व महावितरणाच्या विज तोडण्याच्या कटू कारवाईपासून मुक्त व्हावे असे आवाहन महावितरण, चाळीसगाव विभागाचे कार्यकारी अभियंता, श्री.डि.के.मोहोड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

* * * * * * * *

टिप : सदर वृत्ताचे छायाचित्र हे या कार्यालयाच्या ब्लॉग वर उपलब्ध आहे


 * * * * * * * * 

Wednesday, 25 December 2013

कामाच्या प्रतिक्षेत असलेल्या हातांना काम देण्यास शासन कटिबध्द् : पालकमंत्री ना.सावकारे



 कामाच्या प्रतिक्षेत असलेल्या हातांना काम देण्यास शासन कटिबध्द्
                                            : पालकमंत्री ना.सावकारे

            जळगाव, दि. 25 :-  राज्यात वाढलेली बेरोजगारी कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा रोजगार व स्वयंरोजगार विभाग कार्यरत असून या दुर्लक्षित असलेल्या विभागामार्फत कामाच्या प्रतिक्षेत असलेल्या हातांना काम मिळवून देण्यास शासन कटिबध्द् असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा कृषि राज्य मंत्री ना.संजय सावकारे यांनी आज भुसावळ येथे आयोजित विभागीय रोजगार मेळावा-2013 च्या कार्यक्रमात केले. रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे संगणकीकरण करण्यात आले असून आता ऑनलाईन नावनोंदणीचे काम सुरु करण्यात आले आहे. या विभागाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना शासकीय नोकरी बरोबर खाजगी क्षेत्रातील  रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रमुख उद्देश समोर ठेवून रोजगार मेळाव्याची संकल्पना उदयास आली आहे. त्याला मिळणारा वाढता प्रतिसाद पहाता बेरोजगारीचे वाढते प्रमाण लक्षात येते. ग्रामीण भागातील तरुण बेरोजगार वर्ग रोजगारासाठी बाहेर पडण्यास तयार नाही ही खेदाची बाब असल्याचेही त्यांनी यांवेळी सांगितले.
               राज्यातील मोठमोठया 12 उद्योजकांना व बेरोजगार तरुणांना आमंत्रीत करुन एकूण 1340 रिक्त पदांवर आज भरती प्रक्रीयेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांना आमंत्रीत करण्यात आले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरीक्त पोलीस अधिक्षक एन.अंबीका, उपसंचालक रोजगार व स्वयंरोजगार अनिल पवार, सहाय्यक संचालक रोजगार व स्वयंरोजगार प्रकाश सोनवणे यांना आमंत्रीत करण्यात आले होते.
     अध्यक्षीय भाषणात अरुणभाई गुजराथी म्हणाले की, बुध्दी आणि श्रमाची सांगड घालून आलेल्या संधीचे सोने करा. बेरोजगारीचा व दारिद्रयाचा जवळचा संबंध असल्यामुळे रोजगार मिळविण्यासाठी  परिश्रम, धडपड व जिवघेण्या स्पर्धेला सामोरे जा, बुध्दीमत्ता सर्वांची सारखी नसते, आपली बौध्दीक क्षमता व इच्छा ओळखून भविष्याचा वेध घेऊन  योग्य पर्याय निवडा. तारुण्य् ही एक मोठी संपत्ती आहे. उद्योग व्यवसायात मोठया प्रमाणात होणारे आधुनिकीकरणासाठी आपल्यातील सुप्त गुणांना वाव देऊन स्वत:शी स्पर्धा करायला शिका व बेरोजगारीपासून मुक्त व्हा असे आवाहन त्यांनी उपस्थित असलेल्या तरुणांना केले.
     अतिरीक्त पोलीस अधिक्षक एन.अंबिका यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर उपसंचालक रोजगार व स्वयंरोजगार अनिल पवार व सहाय्यक संचालक प्रकाश सोनवणे यांनी समायोचित भाषणे केली.
      यावेळी पंचायत समितीच्या सभापती मंगलाताई झोपे, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय पाटील, उप विभागीय अधिकारी विजय भामरे, जिल्हा परिषद तथा पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक आदि मान्यवरांसह तरुण बेरोजगार मोठया संख्यने उपस्थित होते.


* * * * * * *

Tuesday, 24 December 2013

ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन ही काळाची गरज : आमदार राजीव देशमुख


ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन ही काळाची गरज
                                     : आमदार राजीव देशमुख
चाळीसगाव दिनांक 24 :- लोकशाही अर्थव्यवस्थेत ग्राहकाचे महत्व मोठया प्रमाणावर आहे. परिस्थितीच्या अभ्यासाने मतदान करुन समाजाच्या अर्थव्यवस्थेला वळण लावण्याचे सामर्थ्य या ग्राहकांकडे आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरीक एकाच वेळी मतदार आहे. आणि ग्राहक पण आहे. दुखावलेला ग्राहक हा रागावलेला मतदार असतो. मतदाराची इच्छा, अधिकार दाबून जसे प्रजातंत्र उभे राहणार नाही. त्याचप्रमाणे अर्थक्षेत्रात ग्राहकांचे अधिकार इच्छा दाबून सामाजिक अर्थव्यवस्था उभी राहणार नाही आणि राहिली तरी ती कल्याणकारी असणार नाही. म्हणून माहितीच्या अधिकाराबाबत ज्या प्रकारे जनजागृती होऊन त्याचा वापर मोठया प्रमाणावर होतांना दिसून येतो त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार राजीव देशमुख यांनी आज आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात केले. महसूल प्रशासन व बी.पी.महाविद्यालय तसेच ग्राहक पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय ग्राहक दिन-2013 या कार्यक्रमाचे बी.पी.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे रोड चाळीसगांव येथे सकाळी 09:30 वाजता आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे, तर कार्यक्रमाचे उद्‌घाटक आमदार राजीव देशमुख होते, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा अनिता चौधरी, व्यापारी असोसिएशनचे प्रदीप देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. रोहिदास पाटील, नगर परिषद शिक्षण मंडळाचे सभापती रामचंद्र जाधव, प्रांताधिकारी मनोज घोडे, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, ग्रंथमित्र आण्णा धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी.वाणी , रोटरीचे रामभाऊ शिरोडे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब चंद्रात्रे म्हणाले की, अर्थ व्यवस्थेत ग्राहकाचे असे महत्व असूनही त्याचे अस्तित्व ओळखण्यास कोणी तयार नाही. महागाई, फसवणूक या भडकत्या ज्वालांमध्ये तो रोज होरपळून निघत आहे. ग्राहक हे आमचे माय-बाप आहेत असे म्हणतच या ग्राहकांचे प्रत्येक व्यवहारात शोषण होत आहे. ग्राहकांचे मोठया प्रमाणावरील अज्ञान, उदासीन वृत्ती, त्याचे असंघटीत स्वरुप यामुळे विक्रीव्यवहारात संघटित व्यापारी वर्गाच्या पुढे हा ग्राहक दुबळा होत आहे. मी स्वत: व्यापारी वर्गात असूनही मी या विषयावर स्पष्टोक्ती देतांना मला अभिमान वाटतो कारण ग्राहकांचे प्रबोधन होऊन त्यांना न्याय मिळण्यातच मी धन्यता मानतो. ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर, 1986 साली पारित झाला असून ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापनाही प्रत्येक जिल्हयात झाली आहे. मात्र अपुर्ण माहिती व शिक्षणाचा अभावामुळे ग्राहक याचा उपयोग करतांना दिसून येत नाही याची खंत वाटते. म्हणून या कायद्याबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी मनोज घोडे यांनी मार्गदर्शन करतांना उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सांगितले की, तरुण वर्गात माहितीची देवाण-घेवाण करिता उपलब्ध असलेल्या सोशन नेटवर्कींगच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती  केल्यास शासनाच्या या कार्यक्रमाचा उद्देश नक्कीच सफल होईल असे सांगून ग्राहक सरंक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन केले.
त्याच बरोबर ग्रंथमित्र आण्णा धुमाळ, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. रोहिदास पाटील यांची समायोजित भाषणे झाली. या कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य जी.पी.वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गंगापुरकर यांनी केले.

                                        * * * * * * * * 

Thursday, 19 December 2013

सैनिकांच्या कल्याणासाठी अधिकाधिक निधी संकलन करावा : जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर


 सैनिकांच्या कल्याणासाठी अधिकाधिक निधी संकलन करावा
                            : जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर

               जळगाव, दि. 19 :- देशासाठी त्याग आणि बलिदान करणा-या सिमेवरील सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जाणारा सैनिक कल्याण निधी हा ध्वजदिन निधीच्या माध्यमातून संकलित केला जातो, या निधीसाठी अधिकाधिक योगदान देऊन प्रत्येकाने आपल्या सेनिकांच्या त्यागाप्रती कृतज्ञता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज येथे केले.  शाहिर पाटील यांनी यावेळी पोवाडा सादर करुन कार्यक्रमास सुरुवात केली.
         सन 2013 साठी सशसत्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ आज जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात  करण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक एस जयकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले , निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मेजर लिमये, प्लाईट लेप्टं. चौधरी आदि उपस्थित होते.
               याप्रसंगी ते म्हणाले की, यंदा जळगाव जिल्ह्याने दिलेल्या उदिष्टापेक्षा अधिक काम केले असल्याने आपल्या जिल्ह्याचा गौरवपूर्ण उल्लेख झालेला आहे. हीच परंपरा कायम राखत अधिकाधिक निधी संकलन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
            या समारंभात मान्यवरांच्या हस्ते वीर पत्नी, वीर माता व वीर पिता यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना शिष्यवृत्ती व अन्य आर्थिक मदतीचे धनादेश निधी संकलनाचे उत्कृष्ट  कार्य करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शौर्य पुरस्कार विजेता शुभम चौधरी या धाडसी बालकाचाही सत्कार करण्यात आला.
         जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांनी 2012 मध्ये 1 कोटी 4 लक्ष 4 हजार 400 इतका सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलित केला. दिलेल्या इष्टकांचा हा निधी 137.62 टकके इतका आहे. सन 2013 साठी 83 लक्ष रुपये इतका इष्टांक देण्यात आला आहे.
            याप्रसंगी सत्कार करण्यात आलेल्या वीरपत्नी, वीर माता व वीरपित्यांची नावे याप्रमाणे श्रीमती साखरबाई धनाजी ठाकरे, मु. पो. जहांगिरपुरा ता. एरंडोल, श्रीमती इंदुबाई पुंडलीक पाटील, मु. पो. प्लॉट नं. 39 संभाजी नगर, जळगाव , श्रीमती लक्ष्मीबाई भिवसन पाटील मु. पांढरद, पो. चिंचपुरा, ता. भडगाव, श्रीमती अनुसया काशीराम शिंदे , मु. पो. कु-हे ता. भुसावळ, श्रीमती सुनंदा मनोहर पाटील, मु. पो. फेकरी, ता. भुसावळ, श्रीमती शैला अनंत साळुंखे, मु. पो. खेडगाव ता. चाळीसगाव, श्रीमती तुळसाबाई रोहिदास बागुल , मु. पो. नगरदेवळा ता. पाचोरा , श्री. रमेश देवराम पवार, मु. पो. इंदवे ता. पारोळा, श्रीमती निर्मलाबाई सुवालाल हनुवते , मु. पो. तोंडापूर ता. जामनेर, श्रीमती कल्पना विलास पवार, मु. पो. तामसवाडी, ता. पारोळा, श्रीमती सरला भानुदास बेडिस्कर, मु. पो. अमळजोद, ता. अमळनेर , श्रीमती सुनंदा वसंत उबाळे, मु. पो. कु-हाडे ता. पाचोरा, श्रीमती सुरेखा पोपट पाटील, मु. पो. बहाळ बुद्रुक, बाळद ता. पाचोरा, श्रीमती कविता राजू सावळवे, घर क्र. 10, समर्थ अपार्टमेंट, सानेगुरुजी नगर, हिरापूर, रोड चाळीसगाव, श्रीमती कल्पना देविदास पाटील, मु. पो. जूवार्डी ता. भडगाव, श्रीमती रंजना अविनाश पाटील, मु. पो. अंजनविहीरे, ता. भडगाव
           या समारंभात 22 माजी सैनिक पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. राष्ट्रीय शौय्यपदक विजेता शुभम चौधरी, भुसावळ याचाही यावेळी मान्यवरांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला.
             कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन कॅप्टन मोहन  कुलकर्णी यांनी केले

* * * * * * * *

मिनी ट्रॅक्टरसाठी प्रस्ताव मागविले

             जळगाव, दि. 19 :- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने 90 टक्के अनुदानांवर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधनाचा पुरवठा करण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
              स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने कल्टिव्हेटर,  रोटॅव्हेटर व ट्रेलरचा पुरवठा करण्यात येतो. आहे. या योजनेच्या लाभासाठी स्वयंसहाय्यता बचतगटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. खरेदीची कमाल मर्यादा रुपये 3.50 लाख इतकी आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाचा स्वहिस्सा 10 टक्के भरल्यानंतर शासकीय अनुदान 90 टक्के (कमाल रुपये 3.15 लाख) देण्यात येईल.
             मिनी ट्रॅक्टरचा लाभ घेणा-या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावेत. ज्या बचतगटांनी मागील वर्षी ( सन 2012-13) या योजनेचा लाभ घेतला आहे. अशा बचत गटांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सदर योजनेचा लाभ घेतला आहे. अशा बचतगटांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तेव्हा सदर योजनेच्या लाभासाठी सन 2013 -14 साठी बचतगटांनी दि. 26 डिसेंबर 2013 च्या आत जिल्हयातील सहाय्यक आयुक्त समाजकल्याणकडे प्रस्ताव पाठवावा. असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक यांनी केले आहे.


* * * * * * * *

Monday, 16 December 2013

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

             जळगाव, दि. 16 :- जिल्हा उद्योग केंद्र व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 17 डिसेंबर ते शुक्रवार 20 डिसेंबर या कालावधीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा पर्यंत स्टेट बँकेचे तज्ञ अधिकारी व अन्य तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हयातील प्लास्टीक व इंजिनिअरिंग उत्पादन करणा-या सूक्ष्म व लघु उद्योग घटकांनी याचा लाभ घ्यावा. सहभागासाठी व अधिक माहितीसाठी अमिताभ झा - 9923601438 व श्यामराव येसनसुरे 9421782910 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांनी केले आहे.

* * * * * * * *

महिला लोकशाही दिनी 50 तक्रारी अर्ज प्राप्त

              जळगाव, दिनांक 16 :- महिला व बाल विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 50 तक्रारदारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 49 अर्ज हे सहकार विभागाशी संबंधीत आहे. या वेळी  लोकशाही दिनातील प्रलंबीत व निकाली अर्जाचा आढावा घेण्यात आला.
                याप्रसंगी अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती एन. अंबिका, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती साधना सावरकर, जि. प.  उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कुटे, सहाय्यक निबंधक  श्री. प्रताप पाडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. देवेंद्र राऊत, तसेच महिला उपस्थित होत्या.


* * * * * * * *

Sunday, 15 December 2013

अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतीत नवतंत्राचा वापर आवश्यक- केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे प्रतिपादन


अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतीत नवतंत्राचा
वापर आवश्यक-केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे प्रतिपादन

 जळगाव, दिनांक 15 :- देशाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी शेती मधील नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे  केले.
येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने आधुनिक कृषीतंत्राचा वापर करुन कृषी प्रयोग करणा-या आणि कृषी उत्पादन घेणा-या शेतक-यास दिला जाणारा  पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च - तंत्र पुरस्काराचे वितरण केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
जैन इरिगेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा कै. डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार- 2012 कोकणातील डॉ. अनिल विठ्ठल जोशी रा.नरवण, ता. गुहागर, जि. रत्नागिरी यांना प्रदान करण्यात आला.  दोन लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याच समारंभात जागतिक पातळीवर केळी, डाळींब, टिश्युकल्चर रोपांच्या निर्मितीत प्रथम क्रमांकावर असलेल्या अत्याधुनिक जैन टिश्युकल्चर पार्कचेही ना. पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या समारंभास विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, कृषी राज्याचे कृषीराज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे, खासदार सर्वश्री ईश्वरलालजी जैन, हरिभाऊ जावळे, ए. टी. नाना पाटील, जैन उद्योग समूहाचे संस्थापक भंवरलाल जैन, ना.धो. महानोर, दलीचंद जैन विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी राज्यमंत्री सतीश पाटील,आमदार सर्वश्री. गिरीश  महाजन, गुलाबराव देवकर, राजीव देशमुख, जगदीशचद्र वळवी, शिरीष चौधरी, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार गुलाबराव पाटील, डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे,   महापौर राखीताई सोनवणे,  डॉ. शंकरराव मगर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी ना. पवार  पुढे म्हणाले की, शेती करताना शेतक-याला अनेक अडचणी येतात.शेतीचं उत्पादन विचारात घेतांना झालेला खर्च वजा जाता शेतक-याला चार पैसे  प्रपंच चालविण्यासाठी मिळावे इतपत तरी शेत मालाला भाव मिळाला पाहिजे यादृष्टीने शेतीच्या अर्थशास्त्राचा विचार व्हावा,  अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील 60 टक्के लोक हे शेती उद्योगावर अवलंबून आहे त्यामुळे शेती मध्ये भांडवली गुंतवणूक वाढली पाहिजे, मर्यादित जागेत शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन बियाणांचे संशोधन झाले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
समारंभाच्या प्रारंभी दिवंगत केंद्रीय श्रममंत्री शिवराम ओला यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन भवरलाल जैन यांनी केले.  आपल्या प्रास्ताविकात त्यांनी  सर्वसाधारण शेतक-याला सुखी करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सांगत, या पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेविषयी त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी विरोधीपक्षनेते एकनाथराव खडसे यांचेही समयोचित भाषण झाले.
 पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. अनिल जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते सपत्निक गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी कृतज्ज्ञता व्यक्त करीत हा पुरस्कार शेतीमुळे स्वावलंबी झालेल्या शेतक-यांचा हा गौरव आहे असे सांगितले. या शाबासकीमुळे आपल्या जीवनात नवे पर्व सुरु झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
 या कार्यक्रमास जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, पोलीस अधीक्षक एस. जयकुमार तसेच ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
         हा व्दिवार्षिक पुरस्कार यापूर्वी तेलंगवाडी जि. सोलापूर येथील डाळींब उत्पादक विश्वासराव कचरे, (2002) आकोटे, जि. अकोला येथील प्रभाकर मानकर  (2004), विश्वासराव आनंदराव पाटील ( पाचोरा , जि. जळगाव ) (2006),  भगवानराव यशवतराव क्षीरसागर ( कडबंची, जि. जालना) (2008) यांना प्रदान करण्यात आला आहे. पुणे जिल्हयातील वाघापूर येथील सौ. मनिषा कुंजीर 2010 या शेतक-यांना  देण्यात आला आहे.

* * * * * * * *

Friday, 13 December 2013

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

राज्यातील आर्थिक दुर्बल असलेल्या घटकांना दुर्धर व गंभीर आजारांवरील उपचार व शस्त्रक्रीया मोफत करून घेणे शक्य व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना 2 जुलै  2012 पासून सुरू केली.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या पहिल्याप्प्यात गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई, मुंबई उपनगर या 8 जिल्ह्यांचा समावेश करण्याआला होता. राज्यातील शासकीय, खासगी अशी 120 रुग्णालये या योजनेत सहभागी झाली होती. आता 21 नोव्हेंबर 2013 पासून ही योजना संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली आहे.  जळगाव जिल्ह्यातही ही योजना लागू करण्यात आली असून शासकीय रुग्णालयात या योजनेअंतर्गत उपचार उपलब्ध असून आतापर्यंत 10 खाजगी रुग्णालयेही या योजनेत समाविष्ट झाली आहेत. या योजनेअंतर्गत जळगाव जिल्हयात आतापर्यत 98 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यासाठी 25 लक्ष 39 हजार 500 रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे.  या योजनेची माहिती अधिकाधिक गरजूंपर्यत पोहचावी यासाठी  या योजनेची माहिती देत आहोत.
अशी आहे योजना
या योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका) व दारिद्रयरेषेवरील पण वार्षिक उत्पन्न रु 1. लाखापेक्षा कमी (केशरी शिधापत्रिधारक) अशा कुटुंबाला रु. 1.50 लाखाच्या कमाल मर्यादेपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. 30 विशेषज्ञांच्या 971 प्रोसीजर्स व 121 पाठपुरावा सेवा यात समाविष्ट आहे.   
योजनेत उपचार असा मिळवा
  • लाभार्थीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात /  रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्य मित्रास भेटावे. आजाराचे स्वरुप पाहून लाभार्थीची ओळख पटल्यावर आरोग्य मित्र संदर्भ चिठ्ठी देईल. ती घेऊन लाभार्थी वीमा कंपनीच्या निवडक रुग्णालयात उपचारासाठी जाऊ शकेल. याशिवाय वीमा कंपनीच्या निवडक रुग्णालयात गेल्यास तेथेही ओळख व आजार याची शहानिशा करुन उपचारासाठीची प्रक्रिया सुरु होईल. तसेच शिबिरातून संदर्भीत केलेले व अपघाताचे लाभार्थी थेट निवडक रुग्णालयात जाऊ शकतील.
  • वीमा कंपनीने निवडलेल्या रुग्णालयातील आरोग्य मित्र संदर्भ चिठ्ठी , हेल्थ कार्ड (शिधापत्र व आधार क्र.)  तपासून उपचारासाठी लाभार्थीला डॉक्टरांकडे पाठवेल.
  • वीमा कंपनीच्या रुग्णालयातील डॉक्टर्स तपासणी व चाचणी करुन रुग्णास दाखल करुन घेतील व प्री ऑथरायजेशन विनंती वीमा कंपनीस पाठवतील.
  • वीमा कंपनी व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे डॉक्टर्स संयुक्तपणे प्री ऑथरायजेशन विनंतीची छाननी करुन ती 971 प्रोसीजर्समध्ये बसत असल्यास ऑथरायजेशनला मान्यता ई मेलने पाठवितील.
  • वीमा कंपनीची रुग्णालये या मान्यता पत्रास अधिन राहून लाभार्थीला पूर्ण उपचार विनामुल्य करतील व बिल वीमा कंपनीकडे पाठवतील.
  • वीमा कंपनीची रुग्णालये बिल पाठविताना सर्व रुग्ण तपशील, रुग्णाचे अभिप्राय, निदानाचे व उपचाराचे रेकॉर्ड पाठवितील.
  • आलेल्या क्लेमची तपासणी वीमा कंपनी व सोसायटीच्या डॉक्टरांकडून संयुक्त पणे होईल. पात्र क्लेमची अदायगी 7 दिवसांत रुग्णालयात करण्यात येईल.
  • वीमा कंपनीने निवडलेली रुग्णालये, रुग्णायातून सुट्टी मिळाल्यावर मोफत पाठपुरावा, सल्लामसलत व निदान तसेच औषध पुरवतील.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीशी करार करण्यात आला असून या योजनेची विमा कंपनीकडून अंमलबजावणी करण्यासाठी एमडी इंडीया या त्रयस्थ प्रशासकीय कंपनीची निवड करण्यात आली आहे.
योजनेतील समाविष्ट उपचार
 या योजनेंतर्गत 971 आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा उपचारांचा समावेश आहे. या योजनेत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, ह्दय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतडयाच्या शस्त्रक्रिया  व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मुत्रपिंड व मुत्रमार्ग शस्त्रक्रिया व उपचार, कॅन्सर शस्त्रक्रिया व उपचार, मेंदु व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार (वाहन अपघातावरील उपचार सोडून) कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या सांध्यांच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, एंडोक्राईन व इंटरव्हेन्शनल रेडिऑलॉजी उपचार यांचा लाभ मिळेल.
योजनेची वैशिष्टे
  सदर योजना ही संपूर्णत: कॅशलेस असून रुग्णाला या योजनेंतर्गत कोणताही खर्च करावा लागणार नाही. या योजनेमध्ये रुग्णालयांतील उपचार निदान आवश्यक औषधोपचार, शुश्रृषा व भोजन तसेच एक वेळचा परतीचा प्रवास खर्च यांच्या समावेश आहे. तसेच या योजनेंतर्गत रुग्णालयांतून मुक्त केल्यानंतर 10 दिवसांपर्यंतचा  फॉलोअप तसेच उपचारा दरम्यान काही गंभीर गुंतागुंत झाल्यास त्याचाही उपचार यामध्ये समाविष्ट आहे.
आरोग्य पत्र
 सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी 'आरोग्य पत्राचे' वितरण पात्र लाभार्थी कुटूंबीयांना करण्यात येत आहे. हे आरोग्य पत्र मिळविण्यासाठी लाभार्थी कुटूंबायांनी कुटूंबातील सर्व सदस्यांचा समावेश असलेला 3x2 इंच आकाराच्या रंगीत फोटोच्या तीन प्रतीचे योगदान देणे आवश्यक आहे.
योजनेची अधिक माहिती www.jeevandayee.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  तसेच 1800 233 2200 / 155388 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

-         मिलिंद मधुकर दुसाने, माहिती अधिकारी, जळगाव.


* * * * * * *

जलतरण तलाव कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ दुरुस्तीचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

जलतरण तलाव कार्यान्वित करण्यासाठी
तात्काळ दुरुस्तीचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

जळगाव, दि.13- जिल्हा क्रीडा संकूलातील जलतरण तलाव कार्यान्वित करण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने सुचविल्यानुसार आवश्यक दुरुस्त्या तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जिल्हा क्रीडा संकूल समितीच्या बैठकीत दिले.
 जिल्हा क्रीडा संकूल कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात पार पडली. या बैठकीस  जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक एस. जयकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,  कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, मनपाचे अपर आयुक्त साजीदखान पठाण, उपशिक्षण अधिकारी ए.एम. सोनार तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा क्रीडा संकूलातील जलतरण तलाव  कार्यान्वित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी  सदर जलतरण तलावात दि. 13 जुले 2012 रोजी घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर महाराष्ट्र राज्य ॲक्वेटिक्स असोसिएशन व उपसंचालक क्रीडा , अमरावती विभाग या दोन वेगवेगळ्या समित्यांनी  सादर केलेल्या पाहणी अहवालावर त्यात सुचविण्यात आलेल्या उपायांवर चर्चा झाली.  त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या जलतरण तलावाची खोली कमी न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच समितीने सुचविलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना,  फिल्ट्रेशन प्लॅंट दुरुस्त करणे, ऑटो क्लोरिनेटर पॅनल बसविणे, जीवनरक्षा उपकरणे सज्ज ठेवणे आदी दुरुस्त्या तात्काळ करण्यात याव्या अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. या कामांसाठी व क्रीडा संकूलात करावयाच्या अन्य सुविधांसाठी वास्तूरचनाकारांची सेवा उपलब्ध करावी व त्यासाठी दरपत्रके मागविण्यात यावे, अशा सुचनाही समितीने केल्या. क्रीडा संकूलात  सिंथेटीक लॉन टेनिस, कुस्तीचे मैदान, खेळाडूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी कामे करण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला.


* * * * * * *

Thursday, 12 December 2013

दुय्यम कारागृह चाळीसगाव अन्न-पाणी पुरवठा निविदा मागविल्या

दुय्यम कारागृह चाळीसगाव अन्न-पाणी पुरवठा निविदा मागविल्या

               जळगाव, दि. 12 :- दुय्यम कारागृहातील वर्ग -2 कैद्यांना दिनांक 1/1/2014 ते 31/12/2014 या कालावधीसाठी शिजवून तयार केलेले अन्न तसेच पिण्यासाठी व स्नानासाठी दिवसातून कमीत कमी दोन वेळा पाणी पुरविण्याचा मक्ता दयावयाचा आहे. त्याकरीता सिलबंद निविदा मागविण्यात येत आहे. सदरच्या निविदा दिनांक 21 डिसेंबर 2013 रोजी 15.00 वाजेपावेतो (सुटीचे दिवस सोडून) तहसिल कार्यालय, चाळीसगाव येथे पोहोचतील अशा बेताने टपालाने अगर समक्ष सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या निविदांचा विचार केला जाणार नाही. असे अधिक्षक  दुय्यम कारागृह, चाळीसगाव  यांनी केले आहे.

* * * * * * * *

केळी पिकावरील किड रोगाचे निर्मूलन करावे

                जळगाव, दि. 12 :- यावल, रावेर , मुक्ताईनगर तालुक्यातील केळी पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षण व किड नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे.
              सद्यस्थितीत केळी पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सदरचे किड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाने पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे. - पानाचा भाग जर करपाग्रस्त असला तर प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे करपाग्रस्त पान पूर्णपणे न काढता फक्त करपाग्रस्त भागच काढावा. तसेच त्यावर प्रॉपीकोनॅझोल 5 मीली + खनीज ते ( मिनरल ऑईल) 100 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.
             फुलकिडीने प्रादुर्भाव झालेल्या केळी घडाचे निरीक्षण घेवून अपरीपक्व फळांवर खरचटल्या सारखा भाग दिसल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांची नोंद घेवून 10  टक्के  किंवा 10-15 फुलकिडी प्रति केळीच्या बेचक्यात आढळल्यास ॲसिटामीप्राईड 5 मिली किंवा फिप्रोनील 15 मिली किंवा व्हर्टीसिलीयम 30 ग्रॅम     +  स्टिकर 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. किंवा 5 टक्के निंबोळी अर्क फवारावे.                                                                    

* * * * * * * *

16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिन

           जळगाव, दि. 12 :-  जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2013 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यांत आलेला आहे. तरी संबंधीत समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी चौकाजवळ जळगाव, दूरध्वनी क्र. 0257- 2228828  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.                                                      


* * * * * * * *

Wednesday, 11 December 2013

जिल्हा वेठबिगार दक्षता समितीची बैठक संपन्न

जिल्हा वेठबिगार दक्षता समितीची बैठक संपन्न

         जळगाव, दि. 11 :- जिल्हास्तरीय वेठबिगार दक्षता समितीची बैठक जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी  ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. सदर बैठकीस जी. जे. दाभाडे, सदस्य सचिव तथा सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव, अशासकीय सदस्य रामराव राजाराम पाटील, अरुण शिवप्रकाश चांगरे, शांताराम तोताराम सपकाळे तसेच अन्य शासकीय सदस्य उपस्थित होते.  सदर बैठकीत प्रथम रामराव पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचा सत्कार केला. यावेळी जी. जे. दाभाडे, सदस्य सचिव यांनी सांगितले की, वेठबिगार पध्दत नाहिशी करुन वेठबिगार कामगारास मालकाच्या, सावकाराच्या तावडीतून मुक्त करुन त्‍याचे समाजातील राहणीमान उंचावण्याच्या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. वेठबिगार कामगार आढळून आल्यास महसूल विभागामार्फत त्याचे पुनर्वसन करण्यात येते. यावेळी माहिती देण्यात आली की, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांचे कार्यालयाच्या अधिपत्याखालील कार्यरत चार दुकाने निरीक्षक यांनी दि. 1 जुलै 2013 ते 30 नोव्हेंबर 2013  या कालावधीत एकूण 1,195 आस्थापनांना भेटी दिल्या असता वेठबिगार कामगार आढळून आलेला नाही. सदरहू भेटी प्रामुख्याने जिल्हयातील दुकाने व संस्था, गॅरेजेस, हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट, चहाटपरी इत्यादी आस्थापनांना  देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी अध्यक्ष, तथा जिल्हाधिकारी, जळगाव यानी अशासकीय सदस्यांच्या केलेल्या मागणीनुसार अशासकीय सदस्यांना देखील बाल कामगार धाडसत्रात सहभागी करुन घ्यावे, असे सदस्य सचिव यांना निर्देश दिले .

* * * * * * *

कृषीमंत्री ना.शरद पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

           जळगाव, दि. 11 :- केंद्रीय कृषी व अन्न प्रक्रिया उदयोगमंत्री ना. शरद पवार हे जळगाव जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
           रविवार दिनांक 15 डिसेंबर 2013 रोजी दुपारी 12.05 वा. दावलवाडी जि. जालना येथुन हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण, दुपारी 12.40 वा. जैनहिल्स जळगाव येथील हेलिपॅडवर आगमन, दुपारी 12.45 ते 1.45 वा. राखीव, दुपारी 2.15 ते 5.45 वा. जैन एरिगेशनच्या कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी 6.00 वा. जळगाव विमानतळ येथुन खाजगी विमानाने दिल्लीकडे प्रयाण

* * * * * * *

विक्रेत्यांच्या संपकाळात औषधांसाठी पर्यायी व्यवस्था

          जळगाव, दि. 11 :- औषध विक्रेत्यांनी दिनांक 16, 17 व 18 डिसेंबर 2013 रोजी राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे. औषधांचा अत्यावश्यक वस्तु कायदयात समावेश असल्याने त्यांनी दिनांक 16, 17 व 18 डिसेंबर रोजी त्यांची औषधी दुकाने सुरु ठेवावी, जेणेकरुन जनतेची गैरसोय होणार नाही व रुग्णांना आवश्यक तेव्हा औषधे सहजगत्या उपलब्ध होतील. रुग्णांना औषधांअभावी त्रास होणे किंवा त्यामुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण होणे हे जनहिताच्या व जनस्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह नाही, म्हणून प्रशासनाने जनतेसाठी पर्यायी उपलबधता व संपर्क व्यवस्था केली आहे.
             औषध पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व सरकारी , निमसरकारी रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध राहील याची व्यवस्था केली आहे. सर्व खाजगी रुग्णालये व वैद्यकीय व्यावसायिकांनी पुरेसा औषध साठा त्यांचेकडे ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.  24 तास उघडे असणा-या औषध दुकानदारांना तसेच खाजगी व सरकारी रुग्णालयांशी संलग्न असलेल्या औषध परवानेधारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जनहित व जनस्वास्थ्य विचारात घेवून त्यांची दुकाने उघडी ठेवावीत. औषधाचा अत्यावश्यक वस्तु कायदा, 1955 मध्ये समावेश असल्याने त्यांनी औषध दुकाने सुरु ठेवणे बंधनकारक आहे. आपतकालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास जनतेने खालील अधिका-यांशी संपर्क साधावा. हे. य. मेतकर सहायक आयुक्त दुरध्वनी क्र. 2217476, भ्रमणध्वनी क्र. 9730155370,  एस. एस. देशमुख औषध निरीक्षक 2217476, 9850177853, डॉ. ए. एम. माणिकराव औषध निरीक्षक 2217476, 9373556025, अ. शि. सरकाळे औषध निरीक्षक 2217476, 9890165018 असे आवाहन हे. य. मेतकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी केले आहे.


* * * * * * *

सैन्य दलात धर्मगुरु भोजन कक्ष अधिका-यांची भरती

सैन्य दलात धर्मगुरु भोजन कक्ष अधिका-यांची भरती

              जळगाव, दिनांक 10 :- भारतीय सैन्य दलात धर्मगुरु व भोजनकक्षासाठी कनिष्ठस्तर अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. धर्मगुरुपदासाठी किमान पदवीधर आवश्यक, सोबत पंडीत पदाकरीता 10 वी व 12 वी स्तरापर्यंत संस्कृत भाषा  आवश्यक , मौलवी पदासाठी अरेबिक, उर्दू भाषेचे शिक्षण आवश्यक तर पाद्री पदासाठी बिशपांच्या मान्यताप्राप्त यादीवर  असणे आवश्यक आहे.. वयोमर्यादा 27 ते 34 दरम्यान आहे. इच्छूकांनी आपले अर्ज रिक्रूर्टींग ऑफिसर, एचक्यू, आरटीजी झोन, पुणे- 900449 व्दारा 56 A P O या पत्यावर 27 डिसेंबर 2013 पर्यंत पाठवावे, या पदांसाठी चाळणी परीक्षा, शारीरिक क्षमता तपासणी 4 फेब्रुवारी 2014 रोजी अहमदाबाद येथे होईल.
              तसेच भोजन कक्षातील भरतीसाठी 12 वी पर्यंत शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट कॅटरींग डिप्लोमा आवश्यक, वयोवर्यादा 21 ते 27 वर्षे आवश्यक असुन या पदांसाठी दि. 11 जानेवारी 2014 पर्यंत एएससी सेंटर ( साऊथ ), बंगलोर व्दारा - 56  A P O , येथे अर्ज पाठवावे या पदांसाठी चाळणी व पात्रता परीक्षा 23 ते 25 मार्च 2014 दरम्यान बंगलोर येथे होईल,असे सैन्य भरती कार्यालय, औरंगाबाद यांनी कळविले आहे.

* * * * * * *

हरभरा  व तूर कीड रोगाविषयी मार्गदर्शन व सल्ला

              जळगाव, दि. 10 :- जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यातील हरभरा, व तूर हे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते.
          शासनाने या पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांची नेमणूक केली आहे. सद्यस्थितीत  हरभरा व तूर पिकावर खालीलप्रमाणे किडींचा प्रादुर्भाव आढळून आला असून या रोग नियंत्रणासाठी कृषि विषयक सल्ला पुढीलप्रमाणे-
             तूर -  शेंगा पोखरणारी अळी 5 टक्के निंबोळी तेल 10 मिली + 25 इसी क्विनॉलफॉस 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी  करावी. किंवा   25 ईसी क्विनॉलफॉस 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मोठया अळया सकाळी लवकर हाताने वेचून नष्ट कराव्यात किंवा इमॅमेक्टीन बेन्झोएट 2 मिली  + 25 एसपी  ॲसिटामिप्रीड +  1 टक्के गुळ 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा 75 एसपी ॲसिफेट 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
         हरभरा- मरग्रस्त रोपे मुळासकट ( माती बरोबर ) उपटून जाळून नष्ट केल्यास पुढील प्रादुर्भाव कमी होतो.


* * * * * * *

Sunday, 8 December 2013

जळगाव जिल्ह्यात सिएमपी प्रणाली कार्यान्वित

जळगाव जिल्ह्यात सिएमपी प्रणाली कार्यान्वित

            शासनाकडून वेतन आणि अन्य देयके अदा करण्यासाठी  परंपरागत धनादेशाचा वापर करणे बंद होत असून सीएमपी प्रणालीचा वापर सुरु झाला आहे. जळगाव जिल्हाही त्यासाठी सज्ज झाला आहे. जळगाव जिल्हा मुख्यालयात सात आहरण संवितरण अधिका-यांकडे ही प्रणाली नोव्हेंबर महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली . ही चाचणी यशस्वी झाली असून याद्वारे कर्मचा-यांची वेतने, भत्ते त्रयस्थांची देयके (third party paymeant) अदा करण्याची कारवाई यशस्वी झाल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी शि.बा. नाईकवाडे यांनी दिली आहे.
काय आहे सिएमपी प्रणाली ?
              C.M.P. ( Cash management product) शासनाकडून अदा होणारी विविध प्रकारची देयके अदा करण्यासाठी ही यंत्रणा भारतीय स्टेट बॅंकेने ही यंत्रणा विकसित केली असून त्यासाठी महाराष्ट्र शासन आणि भारतीय स्टेट बॅंक यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार शासनाची सर्व देयके या प्रणालीद्वारे अदा केली जाणार आहेत. थोडक्यात आता पर्यंत वेतन बिलांची प्रक्रिया ही आनलाईन होत होती मात्र प्रत्यक्ष वेतन बिले अदा करतांना धनादेशाद्वारे केली जात होती. आता धनादेशाच्या प्रक्रियेचा टप्पा यातून वगळला जाणार असून  -पेमेंट पद्धतीने अदा करावयाची रक्कम थेट संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.
वर्षभरापासून प्रक्रिया
                ही प्रणाली राबविण्याची प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शासन पातळीवर तयारी सुरु आहे. त्यासाठी 22 जानेवारी 2013, 28 जून 2013 17 सप्टेंबर 2013  असे तीन शासननिर्णय यासंदर्भात काढ़ण्यात आले आहेत. त्याद्वारे याप्रक्रियेविषयी शासनाच्या विविध विभागांना अवगत करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात यशस्वी चाचणी
               जळगाव जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विविध विभागांचे 166 आहरण संवितरण अधिकारी आहेत. त्यापेकी नोव्हेंबर महिन्यात  सात आहरण संवितरण अधिका-यांकडे ही प्रणाली राबविण्यात आली. त्यात जिल्हा कोषागार अधिकारी, सहायक संचालक स्थानिक निधी लेखा, जिल्हा सेनिक कल्याण अधिकारी, जिल्हा रोजगार स्वयंरोजगार अधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी ( तापी खोरे), विशेष भूसंपादन अधिकारी (नं-1), वार्डन अनुसूचित जाती जमातीच्या मुलींचे वसतीगृह या कार्यालयांनी आपल्याकडील 152 अदात्यांची (ज्यांना देयक अदा करावयाचे आहे अशा व्यक्ती, संस्था) नोंदणी करुन  त्यांना देयके यशस्वीरित्या अदा केलीतत्याआधी जुले महिन्यात जिल्हा रोजगार स्वयंरोजगार अधिका-यांच्या कार्यालयातून तीन सेवा पुरवठादारांना त्यांनी केलेल्या कामाचे देयक अदा करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात सज्जता
             ही प्रणाली राबविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातही जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सर्व विभागाच्या आहरण संवितरण अधिका-यांशी संपर्कात राहून सर्व सज्जता करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालयातील 166 आहरण संवितरण अधिका-यांनी त्यांच्याकडील अदात्यांची माहिती आनलाईन नोंदणी केली आहे. 30 नोव्हेंबर 2013 ही त्यासाठी डेडलाईन ठरविण्यात आली होती. प्रत्येक आहरण संवितरण अधिका-यांना या प्रणालीवर काम करता यावे यासाठी युजर आयडी आणि पासवर्डही पूरविण्यात आले आहेत.
त्यामुळे आता येथून पुढे शासनाची देयके ( वेतन-भत्ते बिलेही या प्रणाली मार्फतच वितरीत होतील आणि रकमा थेट संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा होतील. त्यामुळे आता सर्व आहरण संवितरण अधिका-यांनी त्यांची बिले ही सीएमपी प्रणालीद्वारेच सादर करावित असे आवाहन जिल्हा कोषागार अधिका-यांनी केले आहे.
यानंतर पुढ़ील टप्प्यात याबाबत तालुकास्तरावर कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे, असेही जिल्हा कोषागार अधिका-यांनी सांगितले.
                                                         
           मिलिंद मधुकर दुसाने, माहिती अधिकारी, जळगाव

* * * * * * * * *