Tuesday, 25 June 2024

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 मतदान साहित्याचे वाटप : अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना





 नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024
मतदान साहित्याचे वाटप : अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

 

धुळे, दिनांक 25 जून 2024 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिंक निवडणूकीसाठी बुधवार, दि.26 जून, 2024 रोजी  सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होत असून याकरीता धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 3, शिंदखेडा तालुक्यात 2, साक्री तालुक्यात 2 तर धुळे तालुक्यात 5 अशा एकूण 12 मतदान केद्र आहे. जिल्ह्यात 8 हजार 159 शिक्षक मतदार असून त्यात 6 हजार 203 पुरुष तर 1 हजार 956 स्त्री मतदार आहे. मतदानासाठी 70 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक केंद्रासाठी  केंद्राध्यक्ष, कर्मचारी, सुक्ष्म निरीक्षक, एक शिपाई, तसेच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून आज कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहे.  मतमोजणी सोमवार, 1 जुलै, 2024 रोजी केंद्रीय वखार महामंडळ, वेअर हाऊस, अंबड, ता. जि. नाशिक येथे होणार आहे.

 

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 करिता सर्व शिक्षक मतदारांनी 26 जून, 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आपल्याशी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, तसेच मतदानावेळी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ईपीक) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी पर्यायी पुरावा म्हणून भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 10 अतिरिक्त ओळखपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावेत.  या निवडणूकीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गोयल यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0 0 0 

No comments:

Post a Comment