Saturday, 6 July 2013

कुकूटपालन व्यवसायासाठी शासकीय अनुदान


         जळगांव, दि. 6 :- राज्यामध्ये मांसल कुक्कट पक्षी पालन करणे ही नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय योजना सन 2013-2014 या वर्षात पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यांत येत आहे. या योनजेत 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करण्यास शासनाकडून अनुदान देण्यांत येणार आहे.  ही योजना जळगांव जिल्हयासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जातींसाठी राबविण्यांत येणार आहे. या योजनेतील सर्वसाधारण बाबी पुढीलप्रमाणे आहे.
              30 टक्के महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात येणार आहे. उपलब्धतेनुसार अधिकतम 3 टक्के विंकलांग लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे. यासाठी अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक राहील. व विकलांग लाभार्थी उपलब्ध न झाल्यास इतर पात्र लाभार्थ्याची निवड करण्यांत येईल.
              जे लाभार्थी स्वत:चे पुरसे भांडवल उभारु शकतील किंवा बॅकेकडून  / वित्त संस्थेकडून कर्ज घेऊ शकतील अशाच लाभार्थीची निवड करण्यांत येणार आहे.
              लाभार्थीचे कमीत कमी 3 गुंठे इतकी स्वत:ची अथवा भाडेपट्टीवर घेतलेली जमीन आवश्यक आहे. (भाडेपट्टीबाबत अधिकृत कायदेशिर करारनामा आवश्यक असेल) अनुसूचित जातीसाठी सदरची अट शिथिलक्षम असून दीड गुंठे इतकी स्वत:ची किंवा भाडेपट्टीवर घेतलेली जमीन असणे आवश्यक असेल. जागेपर्यत दळणवळणाची व्यवस्था आवश्यक असून वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असेल.
              लाभार्थीने सदरचा व्यवसाय किमान 3 ते 5 वर्षे किंवा बँकेच्या कर्जांची पूर्ण परतफेड होईपर्यत करणे बंधनकारक राहील.
              बॅकेचे संपूर्ण कर्ज व व्याज वेळच्या वेळी परतफेड करण्याची जबाबदारी फक्त लाभार्थीची असेल, शासनाची नसेल. या योजनेचा लाभ लाभार्थ्यास एकदा घेतल्यावर पुन्हा घेता येणार नाही.
             या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हयातील सर्वसाधारण प्रवर्ग व अनुसूचित जाती प्रवर्गतील इच्छूक व सक्षम लाभार्थ्यानी विहित नमुन्यातील अर्ज पशुधन विकास अधिकारी (विस्तार) , पंचायत समिती यांचे कार्यालयात संपूर्ण आवश्यक अटी व शर्ती पूर्ण असल्याची खात्री झाल्यावरच स्विकारले जातील.
             अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2013 अशी राहील व लाभार्थी निवड प्रक्रिया 30 ऑगस्ट 2013 पर्यत पूर्ण करण्यांत येईल. अपूर्ण, चुकीची माहिती असलेले किंवा कागदपत्रांची पूर्तता न करण्यात आलेले अर्ज वगळण्यांत येतील. 
             ज्या लाभार्थ्यांची निवड होईल व जे स्वहिस्याची रक्कम स्वत: उभी करणार आहेत. त्यांना प्रथम स्वहिस्याची रक्कमेतून पक्षीगृहाचे संपूर्ण बांधकाम व इतर मुलभूत सुविधा उभाराव्या लागतील. सदर संपूर्ण बांधकामाचे व सुविधेची तपासणी तालुकयातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन हे करतील व विहित पध्दतीचे बांधकाम व सुविधा उपलबध असल्याचा अहवाल सादर केल्यावरच जिल्हा पशुसंवर्धन उपआयक्त हे उर्वरित कामासाठी शासकीय अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बॅक खात्यामध्ये जमा करतील.
              जे लाभार्थी बॅकेचे कर्जाव्दारे योजना घेणार असतील त्यांचे कर्ज मंजूर झाल्यावरच लाभार्थ्यास देऊन अनुदानाची रक्कम बॅकेत जमा करण्यांत येईल. पहिल्या टप्यात बॅक एकूण किंमतीच्य 50 टक्के रक्कम पक्षीगृह व इतर मुलभूत सुविधेसाठी लाभार्थ्यास अदा करेल व कामाच्या प्रगतीनुसार उर्वरित रक्कम 1 ते 2 टप्प्यात बॅक वितरीत करील.
             एक हजार पक्षांच्या संगोपनासाठी येणारा आवर्ती खर्च ज्यामध्ये एक दिवसीय पिल्लांची किंमत, पक्षी, खाद्य, लस, औषधे, तुस, विज व पाणी इत्यादी बाबींवर होणारा खर्च हा लाभार्थ्याला स्वत:लाच करावा लागेल. या योजने अंतर्गत लाभार्थी खाजगी कंपनीबरोबर करार करु शकेल. शेडचा उपयोग फक्त कुक्कुट पालनासाठीच करावा लागेल.
            लाभार्थ्याने स्वहिस्याच्या रकमेचा प्रकल्पासाठी योग्य प्रकारे विनियोग केला तरच अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बॅक खात्यात जमा करण्यांत येईल.
          लाभार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकत खाते असणे बंधनकारक असेल. पक्षीगृहाचे बांधकाम पशुसंवर्धन खात्याने निश्चित केलेल्या निकषानुसार व आराखडयानुसार करणे आवश्यक राहील.
           पक्षांच्या विम्याची रक्कम व प्रकल्पापेक्षा जास्त खर्च होणारी रक्कम लाभार्थ्यास स्वहिश्यातूनच करावी लागेल. अनुदानाचा गैरविनियोग केल्यास अनुदानाची व्याजासह एक रक्कमी वसूली महसूली कार्यपध्दतीने लाभार्थ्याकडून करण्यात येईल.
           जिल्हयातून प्राप्‍त झालेल्या सर्व पात्र्‍ व वैध अर्जाची निवड जिल्हाधिकारी जळगांव योचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीमार्फत करण्यांत येईल.
          योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या लाभार्थ्याना अर्जाचा विहित नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती यांचे कार्यालयात उपलब्ध होईल.
         जळगांव जिल्हयासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील 42 व अनूसूचित जातीतील12 लाभार्थ्यासाठी या योजने अंतर्गत अनुदान उपलब्ध करण्यात येणार नाही.
             लाभार्थ्याना निवडीची यादी संबंधीत पंचायत समिती, जिल्हाधिकारी , जळगांव यांचे कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. लाभार्थ्याला प्रत्येक बॅचच्या जमा  खर्चाचे (उत्पन्नाचे) अभिलेख (रेकॉर्ड) ठेवून याची माहिती संबंधीत पशुवैद्यकीय संस्थेमार्फत, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांना द्यावी लागेल.
         प्रत्येक संचाची एकूण किंमत अनुदान रक्कम रुपये 2 लाख 25 हजार 500 अशी असून सर्वसाधाणसाठी प्रवर्गास रुपये 1 लाख 12 हजार 500 अनुसूचित जाती प्रवर्गसाठी रु 1 लाख 68 हजार 750 अनुदान उपलब्ध होणार आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त जळगांव यांचेकडे संपर्क साधावा

No comments:

Post a Comment