डेंग्यु
आजार नियंत्रणासाठी लोकसहभाग महत्वाचा
: तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लांडे
चाळीसगाव दि. 21 (उमाका वृत्तसेवा) : तालुक्यात
किटकजन्य आजाराचे डेंग्यु सदृश्य रुग्ण आढळून येत आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यातील
शहरी व ग्रामीण भागामध्ये किटकजन्य (डेंग्यु) साथरोग प्रतिबंध पंधरवाडा राबविण्यात
येत असून या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे तालुका
आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शहरातील काही भागात अतिवर्षा तर काही
भागात दुर्भिक्ष, वाढते शहरीकरण, स्थलांतरांचे प्रश्न विविध विकास कामे या व अश्या
अनेक कारणांमुळे किटकजन्य (डेंग्यु) आजाराचे प्रमाण विविध भागात आढळते. या
पार्श्वभुमीवर किटकजन्य आजारांचे प्रभावी पणे प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी 20
सप्टेंबर ते 04 आक्टोंबर 2016 दरम्यान चाळीसगाव तालुक्यात शहरी व ग्रामिण
भागामध्ये किटकजन्य (डेंग्यु) साथरोग प्रतिबंध पंधरवाडा साजरा करण्याचे निश्चित करण्यात
आले आहे.
साथरोग पंधरवाडा आयोजनाच्या
अनुषंगाने तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांची कार्यशाळा
संपन्न् झाली. कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम
लांडे यांनी डेंग्यु आजाराच्या नियंत्रणासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे सांगत तालुक्यातील
ग्रामिण/शहरी भागात डासांचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक गावात वार्डनिहाय
स्वच्छता मोहिम राबविणे, निरुपयोगी टायर्स, नारळाच्या करवंट्या, प्लास्टीकच्या
वस्तु या अशा अनेक अनावश्यक गोष्टी नष्ट करणे, गावातील खतांचे खड्डे व उकिरडे गावाबाहेर नेणे पाण्याची डबकी बुजवणे तसेच साचणारे
पाणी नेहमी प्रवाहित ठेवणे, शौचालयाच्या पाईपला व घरांच्या खिडक्यांना जाळया बसविणे. आठवडयातील 1 दिवस
कोरडा दिवस पाळणे, या दिवशी घरांतील सर्व भांडी धुवून पुसून कोरडी करणे,
डबक्यांमध्ये साचलेल्या पाण्यात गप्पी मासे साडणे, इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांना
झाकणे बसविणे, पिंप व सिमेंट टाक्यांत अनावश्यक पाणी साठा करू नये. शहरी/निमशहरी
भागात साप्ताहिक अळ्या नाशकाचा (ॲबेट) वापर करावा, गप्पी मासे पैदास केंद्राची
सुयोग्य देखभाल करावी, उद्रेकजन्य परिस्थितीत गावात, वार्डात धुरळणी करणे इत्यादी
उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधितांना यावेळी सुचना देण्यात आल्या.
लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य शिक्षण
देऊन व्यापक प्रमाणात जनजागृती मोहिम आरोग्य विभागामार्फत राबविली जात आहे. आरोग्य
कर्मचारी व आशा स्वयंसेवीका घरोघरी गृहभेटी देऊन प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती
देत आहेत. प्रत्येक दिवशी काय कार्यवाही करावी व धडककृती कार्यक्रम राबवून या
आजारावर कसे नियंत्रण मिळवीता येईल याबाबत चर्चा व नियोजन या कार्यशाळेत करण्यात
आले. कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना जिल्हा साथरोग शास्त्रज्ञ डॉ.बाळासाहेब वाबळे,
तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* * * * * * *
*
No comments:
Post a Comment