Wednesday, 21 September 2016

डेंग्यु आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी . . .


डेंग्यु आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी . . .
               
 सध्या जिल्ह्यात किटकजन्य आजाराचे आणि तापाचे डेंग्यु सदृश्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतांना दिसतात. काही भागात अतिवर्षा तर काही भागात दुर्भिक्ष, वाढते शहरीकरण, कचऱ्याचे अपुरे व अयोग्य व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याचे सदोष व्यवस्थापन, मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणातील व जीवनशैलीतील बदल या व अशा अनेक कारणांमुळे किटकजन्य (डेंग्यु) आजाराचे प्रमाण विविध भागात आढळून येत आहे. या पार्श्वभुमीवर डेंग्यु आजारावर प्रतिबंध व नियंत्रण मिळविण्यासाठी थोडे . .

            जगामध्‍ये डेंग्‍यूचा उद्रेक मागील तीन शतकापासून शितोष्‍ण, समशितोष्‍ण व उष्‍ण कटीबंधात आढळून आलेला आहे. डेंग्‍यूचा पहिला उद्रेक इसवी सन 1635 मध्‍ये फेंच वेस्‍ट इंडीज येथे आढळून आला. डेंग्‍यू ताप व एडिस इजिप्‍टाय डास प्रामुख्‍याने जगातील शितोष्‍ण कटिबंधात पसरलेला आहे. सध्‍या 25 दशलक्ष लोक डेंग्‍यू संवेदनशील भागात वास्‍तव्‍य करतात. आजतागायत जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या (डब्‍ल्‍यू.एच.ओ.) सहा विभागात (युरोप व्‍यतिरिक्‍त) डेंग्‍यूचा मोठया प्रमाणात उद्रेक आढळून आलेला आहे. डेंग्‍यू हा विषाणू पासून होणारा आजार असून त्‍याचा प्रसार एडीस ईजिप्‍टाय डासांमार्फत होतो. मागील दोन दशकांपासून डेंग्‍यू, ताप, डेंग्‍यू रक्‍तस्‍त्रावीताप व डेंग्‍यू शॉक सिंड्रोमचे रुग्‍ण संपूर्ण जगात आढळून आलेले आहेत व त्‍यात सातत्‍याने वाढ होत आहे. डेंग्‍यू हा डासापासून पसरणारा गंभीर विषाणूजन्‍य आजार आहे. डेंग्‍यूताप (डी.एफ.) व डेंग्‍यू रक्‍तस्‍त्रावी ताप (डी.एच.एफ.) हा डेंग्‍यू विषाणू 1,2,3 व 4 पासून होतो व त्‍यांचे सर्वसाधारण गुणधर्म सारखेच असतात.
            हा आजार कोणाही व्‍यक्तिला होऊ शकतो, मात्र प्रामुख्‍याने लहान मुलांना डेंग्‍यू संसर्गाचा धोका अधिक असतो.  डेंग्‍यू उद्रेकासाठी पर्यावरणातील खालील विविध घटक कारणीभूत आहेत.
Ø  अनियंत्रित लोकसंख्‍या वाढ.
Ø  अनियोजित व अनियंत्रित शहरीकरण.
Ø  कच-याचे अपुरे व अयोग्‍य व्‍यवस्‍थापन.
Ø  पाणीपुरवठयाचे सदोष व्‍यवस्‍थापन – पाण्‍याचे दुर्भिक्ष्‍य आणि अनियमित पाणीपुरवठा.
Ø  जागतिक पर्यटनात होणारी वाढ.
Ø  ग्रामीण भागातील मानवी हस्‍तक्षेपामुळे पर्यावरणातील व जीवनशैलीतील बदल
 रोगाचा प्रसार 
मानवातील संसर्ग हा विषाणू बाधित एडिस एजिप्‍टाय डास चावल्‍यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा प्रसार मानव – डास –मानव असा असतो. या डासांची उत्‍पत्‍ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्‍या व टाकाऊ वस्‍तू (मोटारीचे टायर, नारळाच्या करवंट्या,फुलदाणी, झाडांच्या कुंड्या, कुलर व फ्रीज मध्ये साठणारे पाणी) यात साठविलेल्‍या स्‍वच्‍छ पाण्‍यात होते.
 अधिशयन काळ 
विषाणू बाधित डासाने चावा घेतल्‍यानंतर लक्षणे 5 ते 6 दिवसांच्‍या अधिशयन काळात दिसून येतात. मात्र हा काळ 3 ते 10 दिवसांपर्यतचा असू शकतो.
रोगांची सर्वसाधारण चिन्‍हे व लक्षणे
डेंग्‍यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्‍य गंभीर तापाच्‍या लक्षणांसारखीच असतात. उदा. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळयांच्‍यामागे दुखणे इ. रक्‍तस्‍त्रावित डेंग्‍यू ताप हा डेंग्‍यू तापाची गंभीर अवस्‍था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्‍याच्या सोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्या काही दिवसात याची लक्षणे साध्‍या डेंग्‍यू तापासारखी असतात व क्‍वचित त्‍वचेवर पुरळ दिसून येतात. रक्‍तस्‍त्रावित डेंग्‍यू तापाचे निदान अंगावरील दर्शनिय भागावर (हातपाय, चेहरा व मान) यावर आलेल्‍या पुरळांवरुन केली जाते. नाकातून, हिरडयातून व गुदव्‍दारातून रक्‍तस्‍त्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.
रोग निदान
Ø  DF व DHF चे निदान रक्‍तजल चाचणीव्‍दारे (Serology) निश्चित केले जाते. IgM अॅन्‍टीबॉडी लक्षणे दिसू लागल्‍यानंतर आठवडयाने दिसून येतात आणि त्‍यानंतर सुमारे 1 ते 3 महिन्‍यांपर्यत आढळतात.
Ø  10 दिवसानंतर घेतलेल्‍या दुस-या रक्‍तजलनमून्‍यात IgG अॅन्‍टीबॉडीजमध्‍ये वाढता आलेख दिसून आल्‍यास निश्चित निदान ग्राहय धरले जाते.
Ø  IgGअॅन्‍टीबॉडीजआढळून येणे हे पूर्वीचा संसर्ग असल्‍याचे लक्षण असून रक्‍तजल चाचणीव्‍दारे रोगाची सदयस्थिती व रुग्‍णाची प्रतिकारशक्‍ती यांचा स्‍थानिक पातळीवर अभ्‍यास करण्‍यासाठी उपयोग केला जातो.
औषधोपचार
डेंग्‍यू तापावर निश्चित असे औषधोपचार नाहीत, तथापि रोगलक्षणानुसार उपचार करावे. या रुग्‍णांना अॅस्प्रिन, वेदनाशामक आणि झटके प्रतिबंधक औषधे देऊ नयेत.  
Ø  डेंग्‍यू तापाची तीव्र लक्षणे आढळल्‍यास त्‍या रुग्‍णाला संपूर्ण विश्रांती (बेड रेस्‍ट ) घेणेबाबत सल्‍ला देणे.
Ø  रुग्‍णाचे तापमान 39 डिग्री सेल्सिअसच्‍या खाली राहण्‍यासाठी ताप प्रतिबंधक (केवळ पॅरासिटेमॉल) औषधे देणे
  व रुग्‍णांना ओल्‍या कपडयाने पुसून घेणे.
Ø  ज्‍या रुग्‍णांना मोठ्या प्रमाणात वेदना होतात त्‍यांना वेदनाशामक औषधे देण्‍याची आवश्‍यकता भासू शकते.
Ø  ज्‍या रुग्‍णांना मोठया प्रमाणात उलटया, जुलाब, मळमळ व घाम येतो अशा रुग्‍णांच्‍या शरीरातील क्षार / पाणी
  कमी होऊ नये यासाठी घरी बनविलेल्‍या फळांचा रस व ओ.आर.एस.चे द्रावण दयावे.
Ø  डेंग्‍यू तापाच्‍या व्‍यवस्‍थापनाप्रमाणेच डेंग्‍यू शॉक सिंड्रोमचे व्‍यवस्‍थापन करावे.
Ø  शरीरात जास्‍त प्रमाणात पातळ द्रव जातील याची काळजी घ्‍यावी.
Ø  वैदयकिय आवश्‍यकतेनुसार रक्‍त /रक्‍तद्रव संक्रमण
प्रतिबंधात्‍मक उपाययोजना
Ø  नियमित सर्वेक्षण (अ) प्रत्‍यक्ष (ब) अप्रत्‍यक्ष
Ø  उद्रेकग्रस्‍त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण.
Ø  हिवतापासाठी रक्‍तनमूने गोळा करणे आणि त्‍याची तपासणी करणे.
Ø  उद्रेकग्रस्‍त भागातील संशयित डेंग्‍यूच्‍या रुग्‍णांपैकी ५ टक्‍के रुग्‍णांचे रक्‍तजलनमूने सर्वेक्षण रुग्‍णालयामध्‍ये  
  विषाणू परिक्षणासाठी पाठविणे.
Ø  उद्रेकग्रस्‍त गावात धूरफवारणी.
Ø  डेंग्‍यूचा रोगवाहक शोधण्‍यासाठी (एडीस ईजिप्‍टाय) किटकशास्‍त्रीय सर्वेक्षण करावे.
Ø  भांडी तपासणी सर्वेक्षण करुन घर निर्देशांक (हाऊस इंडेक्‍स) व ब्रॅटयू निर्देशांक (ब्रॅटयू इंडेक्‍स) काढणे.
Ø  ज्‍या भांडयामध्‍ये एडीसच्‍या अळया आढळून आलेल्‍या आहेत ती सर्व भांडी रिकामी करणे.
Ø  जी भांडी रिकामी करण्‍यायोग्‍य नाहीत अशा भांडयामध्‍ये टेमिफॉस अळीनाशक टाकणे.
Ø  आरोग्‍य शिक्षण
आरोग्य संदेश
1.      आठवडयातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी.
2.      पाणी साठवलेल्‍या भांडयाना योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्थित झाकून ठेवावे.
3.      घरा भोवतालची जागा  स्‍वच्‍छ आणि कोरडी ठेवावी.
4.    घरांच्‍या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकऊ साहित्‍य ठेऊ नये.
                                                                                       संकलन :
मनोहर पाटील,
प्र.माहिती सहाय्यक,
उप माहिती कार्यालय, चाळीसगांव


* * * * * * * *

No comments:

Post a Comment