Tuesday, 6 September 2016

मुद्रा बॅंक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘उद्योग भेट’ उपक्रम राबविणार- जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल


जिल्हास्तरीय मुद्रा बॅंक समन्वय समितीची बैठक
मुद्रा बॅंक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
‘उद्योग भेट’ उपक्रम राबविणार- जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
जिल्ह्यात 15 हजार लाभार्थ्यांना 164 कोटींचे कर्ज वितरीत

जळगाव दि.6- मुद्रा बॅंक योजनेच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारलेल्या युवक युवतींचे उदाहरण  अन्य होतकरु तरुणांसमोर आणून त्यांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यात ‘उद्योग भेट’ हा उपक्रम राबविण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज येथे दिले.
मुद्रा बॅंक योजनेचा जास्तीत जास्त युवकांना लाभ मिळावा यासाठी या योजनेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय  समन्वय समितीची  बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या होत्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. पी.सी. शिरसाठ, जिल्हा अग्रणी बॅंकेचे बी.एस. मराठे  जिल्हा उद्योग अधिकारी एस.एच. पाटील,  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य डी.एम कोठावदे,  सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रभाकर हरदे,  प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने आदी उपस्थित होते.
 यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी अग्रवाल म्हणाल्या की, जिल्ह्यात मुद्रा बॅंक योजनेचे काम चांगले झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत शिशुगटात 9351 पुरुष 7571 महिला असे 16 हजार 922 जणांना तर किशोर गटात765 पुरुष, 561 महिला अशा 1326 जणांना, आणि तरुण गटात 313 पुरुष तर 193 महिला अशा 506 जणांना लाभ देण्यात आला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 15 हजार 917 जणांना एकूण 164 कोटी 13 लाख 41 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून उद्योग सुरु केलेल्या होतकरु युवकांना लोकांसमोर आणण्यासाठी आणि त्यातून इतरांना उद्योग व्यवसायाची प्रेरणा मिळावी यासाठी उद्योग भेट हा उपक्रम राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी या बैठकीत सुचना केली.
मुद्रा बॅंक योजनेअंतर्गत बॅंकांना दरमहा 15 जणांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याचा नियमित आढावा घेऊन  येत्या जिल्हा अग्रणी बॅंक समन्वय समितीच्या सभेत आढावा घेतला जाईल, असेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी शासकीय संस्थांमधुन उद्योग व कौशल्य विकासाचे प्रशिक्षण प्राप्त करणाऱ्या बेरोजगार युवक- युवतींना कर्ज तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी व ही योजना अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचविण्यासाठी  जिल्हा उद्योग केंद्र, रोजगार व कौशल्य विकास विभाग, जिल्हा अग्रणी बॅंक या विभागांनी एकत्रित कार्य करावे. जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांचा आणि बेरोजगार युवकांचा प्रेरक संवाद घडवून आणावा, यादृष्टीने आगामी काळात समन्वय करावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बैठकीचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी केले.

* * * * * * *

No comments:

Post a Comment