Saturday, 17 September 2016

तालुक्यात राबविणार कुष्ठरोग शोधमोहिम : आरोग्य अधिकारी डॉ.लांडे

तालुक्यात राबविणार कुष्ठरोग शोधमोहिम
                                                         : आरोग्य अधिकारी डॉ.लांडे

चाळीसगाव दि. 17 (उमाका वृत्तसेवा) :  केंद्र शासनाच्या प्रगती योजनेतंर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन मोहिमेच्या अनुषंगाने तालुक्यात 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर, 2016 या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत तालुक्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह 2 ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संशयीत रुग्णांचे मोफत निदान व उपचार केले जातील, या मोहिमेचा तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांनी केले आहे.
            या त्वचारोग व कृष्ठरोग शोध मोहिमेत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांचे पथक प्रत्येक घरोघरी जाऊन कृष्ठरोगाबाबत माहिती देऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करणार आहेत. सर्व्हेक्षणादरम्यान संशयीत रुग्ण आढळल्यास त्याचे मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन संपुर्ण कुटूंबाची तपासणी करण्यासाठी योगदान द्यावे.
            या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले असून ग्रामीण भागात 255 तर शहरी भागात 14 पथकांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे. प्रत्येक गावनिहाय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी 538 आशा व स्वयंसेवक 14 दिवस घरोघरी जावून घरातील सर्व सदस्यांची फिक्कट लालसर न खाजवणारा,  न दुखणाऱ्या बधीर चट्टयाची तपासणी करणार आहेत. तालुक्यातील 130 पर्यवेक्षक या मोहिमेवर देखरेख ठेवणार असून बाधीत रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहेत.
            त्वचारोग व कुष्ठरोगावर वेळीच उपचार घेतल्यास तो बरा होत असल्यामुळे समाजामध्ये या रोगाविषयी असलेले समज गैरसमज बाजूला सारुन संशयीत रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घेत तात्काळ निदान व उपचार घेतल्यास रोगप्रसाराला आळा बसू शकेल. तालुक्यातून अशा रोगांना हद्दपार करण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            प्रगती योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन मोहिम ही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्याचे सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.जयवंत मोरे यांचे आदेशानुसार आयोजित करण्यात आली आहे. ही मोहिम यशस्वी होण्यासाठी तालुका स्तरावरुन आरोग्य विस्तार अधिकारी प्रदीप सोनवणे, तालुका पर्यवेक्षक भागवत देवरे, श्रीमती नरवाडे, तालुका कृष्ठरोग तंत्रज्ञ हमीद पठाण, धनंजय जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभणार असल्याचेही श्री.लांडे यांनी कळविले आहे.



* * * * * * * *

No comments:

Post a Comment