Thursday, 8 September 2016

घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण; 2600 पथके सज्ज

कुष्ठरोग शोध अभियान 2016-17 (19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर)
घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण; 2600 पथके सज्ज

        जळगाव दि.8- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती योजनेत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा समावेश केला असून त्याअंतर्गत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात हे अभियान 16 जिल्ह्यात राबविण्यात येणार असून त्यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत दि.19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत घरोघरी जाऊन तपासणी करुन सर्वेक्षण होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 2600 पथके सज्ज केली आहेत.
यासंदर्भात जिल्हा समन्वय समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. उपजिल्हाधिकारी साजिदखान पठाण हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर. पाटील, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉ. जयवंत मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. रावलानी, जिल्हा करमणूक कर अधिकारी महेश चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या माहिती नुसार, जळगाव जिल्ह्यात मार्च 2016 अखेर प्राप्त आकडेवारीनुसार 45 लाख 48 हजार 682 लोकसंख्येपैकी प्रत्यक्ष उपचाराखाली 659 रुग्ण असून नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या धरुन ही संख्या 1061 इतकी होते. जिल्ह्यात एकूण 15 तालुके असून सर्व तालुक्यात हे सर्वेक्षण होणार आहे. पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर हे सर्वेक्षण करण्यात येईल.  जिल्ह्यातील 9 लाख 9 हजार 737 घरांमधून हे सर्वेक्षण 14 दिवसात 2600 पथके करणार आहेत. या पथकांमध्ये एक पुरुष व एक महिला (आशा) असे दोन सदस्य राहणार आहेत. या पथकांचे प्रशिक्षण याआधीच पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय संनिरीक्षण व पर्यवेक्षणासाठी विशेष पथके नेमण्यात आले आहेत. या सर्वेक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग स्कूल,एन.सी.सी.व एन.एस.एस. विद्यार्थी, आशा, अंगणवाडी वर्कर आदींमधून मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठीही विविध माध्यमांचा वापर करुन हे अभियान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. आढळलेल्या कुष्ठ रुग्णांवर उपचार करुन कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यात येणार आहे. दर दहा हजार लोकसंख्येमागे कुष्ठरुग्णांचे प्रमाण एकापेक्षाही कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी  डॉ. जयवंत मोरे यांनी दिली.
या अभियानात सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. तसेच महानगरपालिका क्षेत्रात सर्वेक्षणासाठी मनपा कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, अशा सुचना उपजिल्हाधिकारी साजिदखान पठाण यांनी केल्या.

०००००

No comments:

Post a Comment