राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेच्या धनादेशांचे
आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते वाटप
चाळीसगांव, दिनांक 27 :-
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत
एकूण 74 लाभार्थ्यांना आज धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यात 66 लाभार्थ्यांना
प्रत्येकी 20 हजार प्रमाणे व 8 लाभार्थ्यांना 10 हजार या प्रमाणे एकूण 13 लाख 40
हजार रुपयांचे धनादेशांचे वाटप तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते आज
तहसिल कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्याचबरोबर दहिवद येथील आत्महत्या
केलेले शेतकरी कै.विजय दिनकर महाले यांच्या विधवा पत्नी श्रीमती गायत्री विजय
महाले यांना अर्थसहाय्य म्हणून रुपये 1 लाख इतक्या रकमेचा धनादेशही प्रदान करण्यात
आला. याप्रसंगी आमदार पाटील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला धिर देत
म्हणाले की, घटना घडून गेलेली आहे, नियतीच्यापुढे कोणाचेही काही चालत नाही. परंतु
आलेल्या दु:खद प्रसंगातुनही मार्ग काढत कुटूंब सांभाळण्याची व त्यांचे संगोपन
करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी तुमच्यावर येऊन पडलेली आहे. शासन आपल्या पाठिशी
खंबीरपणे उभे आहे. तेंव्हा ही वेळ रडायची नसून लढायची आहे असे बोलून
आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटूंबाचे मनोधैर्य वाढविण्याचे कामही त्यांनी
यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसिलदार बाबासाहेब
गाढवे यांनी अर्थसहाय्य योजनेची माहिती विषद करुन सांगतांना या योजनेपासून कोणीही
वंचित राहणार नाही याची ग्वाही दिली. तर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या
मार्गदर्शनाखाली जिल्हयात राबविलेल्या आधारवड योजनेतंर्गत मोठया प्रमाणात वंचित
लाभार्थ्यांना या योजनेमध्ये समाविष्ठ करुन घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी
सांगितले.
या प्रसंगी संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार अनंत
परमार्थी, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, माजी नगरसेवक सुरेश सवार, कृष्णेश्वर
पाटील, भरत गोरे, वैभव गवारे, कैलास गावडे यांच्यासह अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थी
मोठया संख्येने उपस्थित होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment