पाचोरा उपविभागात गाळ उपसा मोहिमेस गती
विभागात एकूण 8 ठिकाणी गाळ उपसाकामे सुरु
: प्रांताधिकारी गणेश मिसाळ
चाळीसगांव, दिनांक 18 :- पाचोरा उपविभागात खरिप तथा रब्बीची पिके
निघाल्यामुळे तसेच शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने जलस्त्रोतातील
गाळ उपसा मोहिमेस गती मिळाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली
आहे. गत दोन वर्षामध्ये विभागात पाचोरा तालुक्यातील 18 प्रकल्पातुन 4 लाख 17 हजार
930 ब्रास इतका गाळ उपसण्यात आला असून त्यामुळे 117 कोटी 2 लाख 4 हजार लिटर इतक्या
जलसाठयात वाढ झाली आहे. तर भडगांव तालुक्यातील 14 प्रकल्पातुन 2 लाख 46 हजार 990
इतका गाळ उपसण्यात आल्याने 69 कोटी 15 लाख 72 हजार लिटर इतक्या मोठया प्रमाणात
जलसाठयात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चाळीसगांव तालुक्यातील 12 प्रकल्पातून 6 लाख
36 हजार 285 ब्रास इतका गाळ उपसण्यात आल्यामुळे 178 कोटी 15 लाख 98 हजार लिटर इतका
जलसाठा वाढला आहे. या मोहिमेचे सर्वत्र
कौतुक होत असतांना याचा प्रत्यक्ष लाभ हा शेतक-यांना दोन प्रकारे होत असतो. या
वाढीव जलसाठयामुळे टंचाईवर मात करणे शक्य होते तर गाळ टाकून बखळ जमिनींची पोत
सुधारल्याने शेतीच्या उत्पन्नातही मोठया प्रमाणात वाढ होत असते.
पाचोरा
तालुक्यातील गाळण येथील गाळ उपसा मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी प्रांताधिकारी गणेश
मिसाळ म्हणाले की, दिनांक 19 मार्च 1999 च्या शासन निर्णयान्वये अस्तित्वात
असलेल्या जलस्त्रोतातील गाळ हा करमुक्त केला आहे. म्हणजेच याला कुठल्याही प्रकारची
रॉयल्टी लागत नसल्याने ज्या शेतक-यांना
आपल्या शेतात गाळ टाकायचा असेल त्यांना यावर्षीही कुठलीही रॉयल्टी न भरता नाला,
धरण किंवा तलावातील गाळ मोफत उपसता येणार आहे. त्यामुळे उपविभागातील जास्तीत जास्त
शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले आहे. गेल्या दोन
वर्षापासून या मोहिमेला शेतक-यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून यावर्षीही या
मोहिमेने गती घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावर्षी भडगांव तालुकयातील
गोंडगांव शिवारातील पाझर तलाव, महिंदळे सिमेंट नालाबांध येथील गाळ उपसा तर पासर्डी
येथील साठवण तलावातील गाळ उपश्याची कामे सुरु झाली असून पाचोरा तालुक्यातील गाळण,
खडकदेवळा मध्यम प्रकल्प, तारखेडा-गारखेडा लघुपाटबंधारे तलाव, उमरदे-कुऱ्हाड लपा
साठवण बंधारा, खेडगांव नंदीचे येथील साठवण तलावातील गाळ उपश्याची कामे सुरु झाली
आहेत.
शासनाच्या
जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने यावर्षी गाळ उपसा मोहिमेस अधिक गती देऊन
उपविभाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा व गत दोन वर्षाच्या
तुलनेत अधिक भरीव कामे यावर्षी करण्याचे आवाहन करत कुठल्याही जलस्त्रोत जसे सिमेंट
नालाबांध, साठवण बंधारे, लघु पाटबंधारे प्रकल्प, मातीनाला बांध व या सारखे इतर सर्व
प्रकारचे जलस्त्रोतातील गाळ विनामुल्य उपसा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले
आहे.
गाळण
येथील कार्यक्रमाप्रसंगी सरपंच उत्तमराव पाटील, नायब तहसिलदार राजेंद्र नजन, आबा
महाजन, अनिल पाटील, सचिन पाटील, मंडळ अधिकारी रणजित पाटील, तलाठी विजय आगलावे
यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment