Thursday, 5 February 2015

आपत्ती वर मात करण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे : तहसिलदार बाबासाहेब गाढवे


आपत्ती वर मात करण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे
: तहसिलदार बाबासाहेब गाढवे
चाळीसगांव,दिनांक 5:- आपत्ती सांगून येत नसते तर आलेल्या आपत्तीवर मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण गरजेचे असल्याचे प्रतिपादन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचातर्फे आयोजित आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमातंर्गत  राष्ट्रीय विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे एन.पी.रावळ, एनडीआरएफ चे निरीक्षक एम.प्रभु, एच.ए. गिरी, महेश कुमार, श्रीनिवासन, अर्जुना संस्था भुसावळचे प्रशिक्षक उपस्थित होते.
                     जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दिनांक 29 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या दरम्यान जिल्हयातील सात उपविभागात प्रत्येकी दोन या प्रमाणे  ‍जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमानिमीत्ती तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, होमगार्ड व पोलीस प्रशासनास सदर प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासह ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचेही काम सुरु असल्याचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यावेळी म्हणाले.
                      यावेळी एन.पी.रावळ यांनी मार्गदर्शन करतांना आपत्तीवर मात करण्यासाठी ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची टिम तयार करण्याचे सुतोवाच केले. यामध्ये गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह पट्टीचे पोहणा-या व्यक्तींचा समावेश करण्यात यावा. आपल्या परिसरातील खुल्या बोअरवेल मध्ये लहान बालके पडून दगावण्याची प्रकरणे मोठया प्रमाणावर घडत असतात असाच अमळनेर तालुक्यातील एका अनुभवाचे चित्रीकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केलेल्या कार्यवाही बाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन घ्यावयाची खबरदारी बद्दल माहिती दिली.
                     एनडीआरएफ पुणे येथील संस्थेचे निरीक्षक एम.प्रभु यांनी या प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करतांना प्रथम आपत्ती मध्ये पिडीत झालेल्या व्यक्तीवर प्रथमोपचार कशा प्रकारे करावयाचे त्याचे प्रात्याक्षिक दाखविले, पाण्यात बुडालेल्या व्यक्तीवर, इलेक्ट्रीक शॉक लागल्यावर अशा व्यक्तीवर औषधोपचारासाठी लागणा-या वेळेदरम्यान प्रथमोपचार गरजेचे असतात त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो, आणि या साठी काही आपत्ती व्यवस्थापनातील मुलभूत गोष्टींची माहिती सर्वाना आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. इमारतीला लागलेल्या आगी दरम्यान इमारतीच्या वरील मजल्यावरील  व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी रोप वे च्या सहाय्याने कसे उतरविले जाते याचेही प्रात्याक्षीक त्यांच्या चमूने राष्ट्रीय विद्यालयात दाखविले यावेळी  महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
                     या कार्यक्रमासाठी सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा टाकळी प्र.चा. चे सरपंच किसनराव जोर्वेकर यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळअधिकारी, होमगार्ड, पोलीस आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
* * * * * * * *

No comments:

Post a Comment