Saturday, 21 February 2015

करमणुक कर वसुलीसाठी चाळीसगाव प्रशासनाने उगारला कारवाईचा बडगा

करमणुक कर वसुलीसाठी
चाळीसगाव प्रशासनाने उगारला कारवाईचा बडगा

चाळीसगांव, दिनांक 22 :-  आर्थिक वर्ष सन 2014-15 हे 31 मार्च अखेर पुर्ण होत असून चाळीसगाव विभागातील करमणुक कर वसुलीसाठी चाळीसगाव प्रशासनातर्फे थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे. थकीत महसुल वसुलीसाठी तालुक्यातील सन 2010-2011 या वर्षातील एकूण 16 केबल जोडणी धारकांनी एकूण 1 लाख 44 हजार 660 इतक्या करमणुक कराची रक्कम थकविली असून सन 2014-2015 या वर्षातील एकूण 41 केबल जोडणी धारकांनी 2 लाख 15 हजार 715 इतकी करमणुक कराची रक्कम थकविली असल्याने केबल जोडण्या खंडीत करण्याचे आदेश संचालक चाळीसगांव केबल नेटवर्क यांना पारित करण्यात येऊन वसुली मोहिम राबविण्यात आली.  सदर केबल जोडणी धारकांनी डिसेंबर-2014 अखेरचा करमणूक कराचा भरणा वेळेत न केल्याने सदर केबल जोडणी धारकांच्या पुढील आदेश होईपावेतो किंवा संबंधितांनी कराचा भरणा कोषागारात करेपर्यंत जोडण्या पुर्ववत करण्यात येणार नसल्याचे  दिनांक 21 फेब्रुवारी, 2015 च्या आदेशात म्हटले आहे. तालुक्यात असलेल्या अनधिकृत केबल जोडणी धारकांचा सर्व्हे करुन त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे प्रांताधिकारी घोडे यांनी कळविले आहे.
विश्वचषक क्रिकेट मॅचेसमुळे करमणुक कर वसुलीस फायदा
                     या कारवाईच्या अनुषंगाने सन 2010-2011 मधील करमणुक कराचे थकबाकीदार असलेले पंडीत पाटील यांनी रु 7 हजार 800, दिपक पाटील यांनी 2 हजार 250, रविंद्र वडनेरे यांनी 6 हजार, राकेश ठाकूर यांनी 6 हजार, तुलसिदास कदम यांनी 2 हजार 700 तर जितेंद्र गायकवाड यांनी 2 हजार 250 इतक्या करमणुक कराचा तात्काळ भरणा केला असून सन 2014-15 मधील प्रदीप जाधव यांनी 18 हजार 800 तर जितेंद्र गायकवाड यांनी 4 हजार 500 इतक्या रकमेचा तात्काळ भरणा केला आहे. एकंदरीत 2010-11 मधील थकबाकीदार असलेल्या केबल जोडणी धारकांनी थकीत कराचा भरणा रुपये 24 हजार 750 तर सन 2014-2015 मधील थकबाकीदार असलेल्या केबल जोडणी धारकांनी थकीत कराचा भरणा रुपये 23 हजार 300 इतक्या रकमेचा भरणा केल्याचे प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे. करमणुक कराची रक्कम ही दरमहा 5 तारखेपर्यंत भरण्याबाबतच्या सुचनाही संबंधितांना दिल्या असून उर्वरित थकबाकीदारांनी देखील करमणुक कराची थकीत रकमेचा तात्काळ भरणा करण्याच्या सुचना प्रातांधिकारी घोडे यांनी दिल्या आहेत.
महसुल वसुली बाबत प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आढावा
                     महसुल वसुलीबाबत प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी आढावा घेतला असता चाळीसगाव विभागास एकूण 7 कोटी 12 लाख 66 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून यापैकी 4 कोटी 92 लाख इतकी वसुली झालेली आहे. या वसुलीबाबत तहसिलदारांनी मंडळ अधिका-यांसह तलाठयांच्या दर आठवडयाला बैठका घेऊन महसुल वसुली वाढविण्यासाठी उपाय योजना करण्यासंदर्भात आदेश केले आहेत. महसुल वसुली मोहिमेत बिनशेती वरील महसुल, नगर परिषदेकडील वसुली, विटा भट्टी, स्टोन क्रेशर, गौण खनिज वरील कारवाया, मोबाईल टॉवर, एमएसईबी, बीएसएनएल या सरकारी संस्थांकडील वसुलीसह शहरातील चित्रपटगृहे, केबल जोडणी धारक, अवैध वाळु वाहतुक या बाबींवर गांभीर्याने लक्ष केंद्रीत करुन महसुल वसुली सक्तीने करावयाच्या सुचना केल्या आहेत. त्याच प्रमाणे शासकीय कामांवर वापर होणारे गौणखनिज यावरील रकमांचे समायोजन करण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत. तसेच महसुल वसुली ही मार्च-2015 अखेर शंभर टक्के पुर्ण करण्याच्या सुचना देऊन वसुली कामात हयगय करणा-या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशा सुचनाही प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी दिल्या आहेत.
                     या महसुली वसुली मोहिमेमध्ये थकबाकीदारांवर कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार असल्याने तालुक्यातील नागरिकांनी तसेच संबंधितांनी  विहीत मुदतीत कराचा भरणा करुन तालुका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही प्राताधिकारी मनोज घोडे पाटील व तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment