Sunday, 1 February 2015

पिकपैसेवारी पद्धतीत सुधारणा करणार : ना.खडसे


पिकपैसेवारी पद्धतीत सुधारणा करणार
महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची जळगाव येथे घोषणा

           जळगाव, दि.1 :- विविध नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांना मदत देण्यासाठी आधार मानली जाणारी पिकपैसेवारी ठरविण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीच्या शिफारशी प्राप्त झाल्यानंतर राज्यात पिकपैसेवारी ठरविण्याच्या पद्धतीत शासन सुधारणा करेल, अशी घोषणा राज्याचे महसूल. कृषी, उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, अल्पसंख्याक व औकाफ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव खडसे यांनी आज येथे केली. येथील जैन हिल्स येथे आयोजित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांच्या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेचा समारोप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.
                                 येथील दैनिक पुण्यनगरी तर्फे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेत महत्त्वाचे घटक असणारे ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील आणि तलाठी  यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रात ही कार्यशाळा संपन्न झाली. त्यात उद्घाटन सोहळ्याला ना. खडसे उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भंवरलाल जैन हे होते. यावेळी आ. गुरुमुख जगवाणी, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल,पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, तलाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक कोकाटे, जालना, पोलीस पाटील संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भिकाजीराव पाटील, कोल्हापूर, पाणलोट तज्ज्ञ सुभाष इथापे, म्हसवंडी, अहमदनगर हे उपस्थित होते.
                                यावेळी बोलतांना ना. खडसे म्हणाले की, ग्रामिण विकासाचे चार प्रमुख आधारस्तंभ म्हणून सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांच्याकडे पाहता येईल. राज्यात ग्रामिण विकासासाठी शासनाने प्रयत्नांची दिशा ठरवून वेगाने वाटचाल सुरु केली आहे. गावातील सामान्य माणसाला लागणारे विविध दाखले देण्यासाठी संगणकिकरण करुन इंटरनेटच्या माध्यमातून घरपोच सेवा देण्याचा धडक कार्यक्रम शासनाने सुरु केला आहे.  लहान लहान कामांसाठी लागणारे दाखले मिळवितांना शपथपत्र सादर करतांना आता स्टॅम्पपेपरची अट शिथील करण्यात आली आहे. खरेदी विक्रीचे व्यवहारासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब आम्ही करीत आहोत. यामुळे सामान्य माणसाचा वेळ, मनस्ताप आणि पैसा सगळेच वाचून गैरप्रकारांना आपोआप आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                                या सगळ्या सेवांमुळे शेतक-यांना, सामान्य नागरिकांना शासनाबद्दल आपुलकी वाटली पाहिजे. जमिनींबाबत अनेक दावे न्यायालयात प्रलंबित असतात. अनेक प्रकरणात पिढ्यान पिढ्या प्रकरणे प्रलंबित असल्याची उदाहरणे असतात. आता शासन दिवाणी दाव्यांसाठी स्वतंत्र फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार आहे. सहा महिन्याच्या आत प्रकरणे निकाली निघाली पाहिजेत अशी व्यवस्था यातून निर्माण होईल. सामान्य माणसाचा त्रास कमी करणे हा या मागचा हेतू आहे. राज्यात भाकड गाईंचा प्रश्न मोठा आहे. या प्रश्नाकडे शासन म्हणून आम्ही फार संवेदनशिलतेने पाहत आहोत. ज्या गाईने आयुष्यभर आपल्या कुटूंबाला दूध देऊन पोषण केले, तिची उपयुक्तता संपल्यावर बेदखल करणे योग्य नाही. अशा सर्व गाई शासन दत्तक घेईल. त्यासाठी लवकरच आम्ही गोधाम योजना आणणार आहोत. गोसेवेत कार्य करणा-या आणि करु इच्छीणा-या व्यक्ती, संस्थांची मदत आम्ही घेणार आहोत. राज्यातील शेतीचे प्रश्न सोडवितांना शेतकरी सुखी व्हावा ही आमची भूमिका आहे. त्यासाठी पिक पद्धतीतही सुधारणा करण्याची शासनाची भूमिका आहे.  या सर्व योजना ग्रामपातळीवर राबविणा-या सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. या सर्व घटकांनी ग्रामविकासाच्या योजनांना वेग आणावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
                          आपल्या अध्यक्षीय समारोपात भवरलाल जैन यांनी ग्रामविकास करतांना केवळ भौतिक सुविधांची उपलब्धता करुन चालणार नाही. तर त्यासाठी चारित्र्य संपन्न, निर्व्यसनी माणूसही उभा करावा लागेल, असे प्रतिपादन केले.
ग्रामविकासाचे विश्वस्त असल्याची भूमिका ठेवा - ना. गिरीश महाजन
                           शासनाच्या योजना गाव पातळीवर राबविण्याची जबाबदारी आपली असून ग्रामविकासाचे विश्वस्त असल्याची भूमिका काम करतांना ठेवा, असे आवाहन या कार्यशाळेस उपस्थित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांना राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
                           यावेळी अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, आ. हरीभाऊ जावळे, आ. उन्मेष पाटील, आ. किशोर पाटील  जि.प. शिक्षण सभापती सुरेश धनके, सरपंच संघटनेचे कार्याध्यक्ष किसनराव जोर्वेकर आदी उपस्थित होते.
                        यावेळी बोलतांना ना. महाजन म्हणाले की, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील हे ग्राम विकासाचा आत्मा आहेत. आरोग्य, पाणी, शिक्षण या जबाबदा-या आपण पार पाडतात. आपणावर जबाबदारी असलेल्या योजना पूर्ण करा. यावेळी त्यांनी राज्यशासन ग्रामीण भागातील लोकांचे आणि शेतक-यांचे जीवन सुखी करण्यासाठी घेत असलेल्या विविध योजनांची माहीती दिली.
                        त्यांनी सांगितले की, शेतीचे विजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी व्हावे म्हणून पाच लाख शेतक-यांना सोलरपंप देणार आहोत. जलयुक्त शिवार उपक्रमातून पहिल्या टप्प्यात राज्यात पाच हजार गावे टॅंकरमुक्त करणार आहोत. शेती ही शाश्वत होण्यासाठी शेत मालावर प्रक्रिया होऊन शेतमालाला अधिक भाव मिळण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. राज्यात राबविण्यात येत असलेल्या जलसंपदा विभागाच्या विविध कामांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपणप्रयत्न सुरु केले आहेत. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रीमंडळस्तरावर आपण प्रयत्न करु,असेही त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले.
                        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर आभारप्रदर्शन  ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव निकम यांनी केले. या कार्यशाळेस जिल्ह्याभरातून 1500 हून अधिक प्रतिनिधी तसेच राज्यभरातून विविध मान्यवर उपस्थित होते.
                        ००००००

No comments:

Post a Comment