Wednesday, 27 November 2013

पालकमंत्री थेट जनतेपर्यंत… माणूसकीचे अनोखे दर्शन


पालकमंत्री थेट जनतेपर्यंत… माणूसकीचे अनोखे दर्शन
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            
जनता दरबार; अनेक प्रयत्न करुनही शासन दरबारी सामान्य जनतेची काही प्रकरणे प्रलंबित राहतात. अशावेळी जनतेने दाद मागावी तरी कोणा कडे? तर ती आपल्याच लोकप्रतिनिधींकडे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारल्यापासून जिल्ह्यातील अनेक  प्रश्नांची निर्गत करण्याचा सपाटा चालवलाय. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी  सुरु केलेल्या जनता दरबार या उपक्रमाकडे पाहता येईल. सामान्य जनता आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्रीमहोदयांकडे सादर करते आणि याच दरबारात संबंधित विभागाच्या अधिका-यांना त्या तक्रारीची सोडवणूक करण्याच्या सुचना दिल्या जातात. हा उपक्रम सुरु झाल्यापासून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या जनतादरबार कार्यक्रमास नागरिकांनी मोठया प्रमाणावर प्रतिसाद देवून आपली गा-हाणी  पालकमंत्र्यांच्या  समक्ष मांडली आहेत आणि यातून अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात विविध पतसंस्थांत अडकलेल्या  ठेवींचा प्रश्नही असाच बिकट. या प्रश्नांची गुंतागुंत आणि त्याच्याशी  निगडीत सामाजिक बाजू लक्षात घेता पालकमंत्र्यांनी या प्रश्नाची सोडवणूक करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याचे दृष्य परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. आता अनेक ठेविदारांचे अडकलेले पैसे मिळू लागले आहेत, हा पालकमंत्र्यांच्या धडाडीचाच परिणाम.
मंगळवार दि.26 नोव्हेंबर 2013 रोजी आयोजित जनता दरबारालाही लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला. पालकमंत्री जनतेची निवेदने स्विकारत होते, त्या त्या विभागाकडे निवेदन सोपवित होते. प्रत्येक तक्रारदाराला प्रश्नाची सोडवणूक करण्याचे ठोस आश्वासन मिळत होते. खरेतर जनता दरबारात सामान्यतः जनतेने पालकमंत्र्यांच्या समोर जावून निवेदन देणे हे अपेक्षित होते. मात्र बाहेर निवेदने घेऊन लोकांची रांगच लागली होती. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक, महिलांचा समावेश होता. गर्दी वाढतच होती.
बाहेरच्या गर्दीचा पालकमंत्र्यांना अंदाज आला. त्यांनी आतून सुचना पाठविली. ‘ठेवीदार संघटनेने बाहेर हिरवळीवर बसा, मी तेथे येतो.’ ठेवीदार संघटनेचे लोक बाहेर गेले. तरीही गर्दी कायम होती. अखेर पालकमंत्री स्वतः बाहेर आले. आणि एक अनोखेच दृष्य पहावयास मिळाले. लोक आपल्या तक्रारी, निवेदने घेऊन उभे होते आणि पालकमंत्री संजय सावकारे स्वतः प्रत्येकाजवळ जाऊन त्यांचे निवेदन स्विकारत त्यांची गा-हाणी  ऎकत होते. पालकमंत्र्यांचा हा पवित्रा पाहून उपस्थितांना आश्चर्यच वाटले. निवेदने घेऊन आलेल्या जनतेच्या आश्चर्याला तर पारावारच उरला नव्हता. कारण थेट जनतेपर्यंत येऊन पोहोचणारा आणि आस्थेवाईकपणे विचारपूस करणारा पालकमंत्री ते प्रथमच पाहत होते.
रांगेतल्या लोकांची निवेदने स्विकारल्यानंतर पालकमंत्री थेट विश्रामगृहाच्या हिरवळीकडे निघाले. तेथे बसलेल्या ठेवीदार संघटनेच्या लोकांनी पालकमंत्री आपल्याकडे येतायेत, असे पाहून एकच जयजयकार सुरु केला. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली होती. परंतू त्यांनी ही खूर्ची नाकारली आणि थेट ठेविदारांमध्ये  मांडी घालून बसले. मंत्रीमहोदयांसमवेत असणा-या अधिका-यांनाही मग मांडी घालून बसावे लागले. यथासांग चर्चेनंतर ठेविदारांना ठोस आश्वासन मिळालेच पण जनतेप्रती  बांधिलकी असणारा आणि ती प्रत्यक्ष कृतीतून जपणा-या पालकमंत्र्यांतल्या ‘माणूसकी’च्या दर्शनाने सारेच भारावले होते.
यावेळच्या जनता दरबारात  सहकार विभागाच्या -42 , महसूल -35 जिल्हा परिषद -14, जिल्हा रुणालय-01, शिक्षण -03,  पोलीस विभाग -04, एस. टी. 04, सार्वजनिक बांधकाम - 02, लघुसिंचन -01,   महानगर पालिका- 02 कृषी विभाग- 01 ,    महाराष्ट्र वीज. वितरण कंपनी- 03, भूमि अभिलेख - 03, पाणी पुरवठा- 01, समाजकल्याण -01,  वन विभाग-  01, - वीज निर्मिती 02 -अशा  एकूण 120 तक्रारी दाखल झाल्यात.


             ·         मिलिंद मधुकर दुसाने, माहिती अधिकारी, जळगाव

No comments:

Post a Comment