Thursday, 14 November 2013

केळी पिकावरील किड रोगाचे निर्मूलन करावे

केळी पिकावरील किड रोगाचे निर्मूलन करावे

           जळगाव, दि. 14 :- यावल, रावेर , मुक्ताईनगर तालुक्यातील केळी पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षण व किड नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे.
          सद्यस्थितीत केळी पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सदरचे किड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाने पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे. - फुलकिडीने प्रादुर्भाव झालेल्या केळी घडाचे निरीक्षण घेवून अपरीपक्व फळांवर खरचटल्या सारखा भाग दिसल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांची नोंद घेवून 10  टक्के  किंवा 10-15 फुलकिडी प्रति केळीच्या बेचक्यात आढळल्यास ॲसिटामीप्राईड 5 मिली किंवा फिप्रोनील 15 मिली किंवा व्हर्टीसिलीयम 30 ग्रॅम +  स्टिकर 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. किंवा 5 टक्के निंबोळी अर्क फवारावे.  पानाचा भाग जर करपाग्रस्त असेल तर प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे करपाग्रस्त पान पूर्णपणे न काढता फक्त करपाग्रस्त भागच काढावा. तसेच त्यावर प्रॉपीकोनॅझोल 5 मिली  +  खनीज तेल( मिनरल ऑईल ) 100 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.

* * * * * * * * *

18 नोव्हेंबर रोजी महिला लोकशाही दिन

           जळगाव, दि. 14 :-  जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 18 नोंव्हेबर 2013 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यांत आलेला आहे. तरी संबंधीत समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.                                                      
                                     
* * * * * * * * *

सहकार पुरस्कारासाठी  प्रस्ताव मागविणे !

           जळगाव, दि. 14 :- सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी शासनाने  सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. इच्छूक संस्थांनी सविस्तर प्रस्ताव तयार करुन ते संबंधित जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक कार्यालयात दिनांक 15 नोव्हेंबर 2013 पर्यत सादर करावेत. अधिक माहितीसाठी संस्थांनी संबंधित सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिंबधक, विभागीय सहनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.


* * * * * * * * *

No comments:

Post a Comment