साखर कारखानदारी
जगविण्यासाठी शासन प्रयत्नशिल : आर.आर.पाटील
जळगाव, दि.18- राज्यातील सहकारी साखर
कारखानदारीपुढे आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत काही धोरणात्मक
निर्णय घेऊन राज्याला सहकाराने समृद्ध अशी
देशस्तरावर ऒळख देणा-या साखर
कारखानदारीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे, असे
प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज चोपडा येथे केले.
राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते चोपडा शेतकरी सहकारी साखर
कारखान्याच्या 20 व्या गळीत हंगामाचा
प्रारंभ करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सहकाराने
समृद्ध अशीही महाराष्ट्राची ओळख आहे. आज या सहकारी साखर कारखानदारी समोर अनेक
प्रश्न उभे राहिले आहेत. परंतू त्यातून मार्ग काढून हे क्षेत्र वाचवायचे आहे, कारण
त्यावर अवलंबून असणारा शेतकरी आम्हाला जगवायचा आहे. यासाठी साखरेची आयात कमी करणे,
निर्यात अनुदान वाढविणे, सहकारी कारखान्यांना खरेदी करातून सवलत देणे, मळीवरचे निर्बंध उठविणे, अशा उपायांची
अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करु असे त्यांनी यावेळी उपस्थितांना
आश्वस्त केले.
चहार्डी, ता.चोपडा जि. जळगाव येथील चोपडा
शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 20 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गृहमंत्री
आर.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई
गुजराथी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते वजन काटा
पूजन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील काळी ज्वारी खरेदी
करण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरही
गृहमंत्र्यांनी शेतक-यांना न्याय देण्याचीच आपली भूमिका असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास आमदार जगदिशचंद्र वळवी,
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, माजी आमदार डॉ. सुरेश जी. पाटील, दिलीपराव
सोनवणे, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश
शामराव पाटील, व्हॉ. चेअरमन चंद्रहास गुजराथी, कार्यकारी संचालक उद्धव दिवेकर ,
ॲड. रविंद्र पाटील तसेच संचालक मंडळ व सभासद तसेच ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
*
* * * * * *
No comments:
Post a Comment