जळगाव दि. 29 ( जिमाका वृत्तसेवा ): – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या “जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय”चा शुभारंभ १ मे २०२५ रोजी सकाळी १०.१५ वाजता करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सामाजिक न्याय भवन, वित्त व महा मंडळ येथून कार्यान्वित होणार असून दिव्यांग व्यक्तींना एकत्रित सेवा-सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्हास्तरीय कार्यालये स्वतंत्रपणे सुरु करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागातील कार्यरत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडे त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळून "जिल्हा दिव्याग सक्षमीकरण अधिकारी" या पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात दिव्यांग कल्याण विभागाच्या दि. 15 एप्रिल, 2025 च्या कार्यालयीन आदेशान्वये सोपविण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव जिल्हयाकरीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, दिव्यांग कल्याण विभागातील कार्यरत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता माधुरी भागवत यांच्याकडे "जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी" या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. “१०० दिवसांचा कृती आराखडा” अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले असून, दिव्यांग व्यक्तींसाठी उपयुक्त निर्णय आणि सेवा एका ठिकाणी उपलब्ध होतील.
या कार्यालयाच्या स्थापनेमुळे दिव्यांग व्यक्तींसाठी शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, पुनर्वसन व अन्य सवलतींचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. विविध शासकीय यंत्रणा आणि समाजकल्याण विभागाच्या समन्वयातून दिव्यांगांसाठी आवश्यक सेवा सुलभ केल्या जाणार आहेत.
No comments:
Post a Comment