भारत हा मनोरंजन आणि माध्यम उद्योगामध्ये आघाडीचा देश मानला जातो. डिजिटल प्रसारण सेवा, प्रादेशिक भाषांमधील आशय निर्मिती आणि वाढत्या तंत्रज्ञानस्नेही प्रेक्षकवर्गामुळे या क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारतर्फे मुंबईत १ ते ४ मे २०२५ या काळात 'वेव्हज् शिखर परिषद' आयोजित केली जात आहे. ही परिषद भारताच्या जागतिक पातळीवरील वाढत्या महत्त्वाचे प्रतिबिंब ठरणार आहे.
वेव्हज् बाजार – डिजिटल मनोरंजनासाठीचे क्रांतिकारक व्यासपीठ
या शिखर परिषदेचा एक प्रमुख घटक म्हणजे 'वेव्हज् बाजार' – एक अभिनव, ऑनलाइन व्यासपीठ, जे मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रातील विक्रेते, खरेदीदार, कलाकार, निर्माते, वितरक, गुंतवणूकदार यांना एकत्र आणते. या बाजारात आजवर सुमारे ५५०० खरेदीदार, २००० हून अधिक विक्रेते आणि १००० प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. वेव्हज् बाजाराला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील 'दावोस' बनवण्याचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला आहे.
संधींचा महासागर
या व्यासपीठावर एखादा दिग्दर्शक निर्मिती भागीदार शोधू शकतो, एखादा गेम डेव्हलपर गुंतवणूकदाराशी संपर्क साधू शकतो, तर एखादा कलाकार आपली कलाकृती जागतिक प्रेक्षकांसमोर सादर करू शकतो. ही संधी फक्त ऑनलाइन सादरीकरणापुरती मर्यादित नसून, लाइव्ह स्क्रीनिंग्स, बी2बी बैठका, वेबिनार्स, आणि गुंतवणूकदारांशी थेट संवाद अशा अनेक स्तरांवर संवाद साधता येतो.
तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रोफाइलिंगची नवी दिशा
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून प्रत्येक सहभागीचे प्रोफाइलिंग, जुळवणूक, त्याच्या गरजांनुसार संधींचा शोध हे या बाजारपेठेचे खास वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे, हे व्यासपीठ केवळ संपर्काचे नाही, तर परिणामकारक व्यावसायिक व्यवहार घडवणारे केंद्र बनले आहे.
सर्जनशीलतेला चालना देणारा मंच
चित्रपट, दूरचित्रवाणी, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन, जाहिरात, वर्धित वास्तव (XR), आभासी वास्तव (VR), पॉडकास्टिंग, वितरण, लायसन्सिंग अशा विविध क्षेत्रांतील सहभागींना येथे संवाद, सादरीकरण आणि भागीदारीसाठी एकत्र आणले जाते. पारंपरिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन हे व्यासपीठ जागतिक संधी उपलब्ध करून देते.
"वेव्हज् मनोरंजन परिषद २०२५" – भारताचा 'लगान' क्षण
माझ्या मते, 'वेव्हज्' ही फक्त परिषद नाही, तर एक चळवळ आहे. एक कलाकार म्हणून मी कायमच सर्जनशीलतेच्या, प्रेरणादायी विचारांच्या आणि चौकटीबाहेर जाणाऱ्या संधींचा शोध घेत आलो आहे. 'वेव्हज्' ही त्या शोधाची पूर्तता करणारी वाट आहे. ही परिषद केवळ भारतापुरती मर्यादित न राहता, जागतिक स्तरावर भारतीय दृष्टिकोनाचा प्रभाव पाडेल. ही भारतासाठीचा 'लगान' क्षण आहे – धैर्य, दृष्टिकोन आणि एकतेचा उत्सव, ज्याचा प्रतिध्वनी जगभरात ऐकू येत राहील.
No comments:
Post a Comment