Friday, 27 February 2015

राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेच्या धनादेशांचे आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते वाटप


राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेच्या धनादेशांचे
आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते वाटप

चाळीसगांव, दिनांक 27 :-  केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत एकूण 74 लाभार्थ्यांना आज धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यात 66 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार प्रमाणे व 8 लाभार्थ्यांना 10 हजार या प्रमाणे एकूण 13 लाख 40 हजार रुपयांचे धनादेशांचे वाटप तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्याचबरोबर दहिवद येथील आत्महत्या केलेले शेतकरी कै.विजय दिनकर महाले यांच्या विधवा पत्नी श्रीमती गायत्री विजय महाले यांना अर्थसहाय्य म्हणून रुपये 1 लाख इतक्या रकमेचा धनादेशही प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आमदार पाटील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला धिर देत म्हणाले की, घटना घडून गेलेली आहे, नियतीच्यापुढे कोणाचेही काही चालत नाही. परंतु आलेल्या दु:खद प्रसंगातुनही मार्ग काढत कुटूंब सांभाळण्याची व त्यांचे संगोपन करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी तुमच्यावर येऊन पडलेली आहे. शासन आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. तेंव्हा ही वेळ रडायची नसून लढायची आहे असे बोलून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटूंबाचे मनोधैर्य वाढविण्याचे कामही त्यांनी यावेळी केले.
                     कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी अर्थसहाय्य योजनेची माहिती विषद करुन सांगतांना या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याची ग्वाही दिली. तर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात राबविलेल्या आधारवड योजनेतंर्गत मोठया प्रमाणात वंचित लाभार्थ्यांना या योजनेमध्ये समाविष्ठ करुन घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
                     या प्रसंगी संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार अनंत परमार्थी, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, माजी नगरसेवक सुरेश सवार, कृष्णेश्वर पाटील, भरत गोरे, वैभव गवारे, कैलास गावडे यांच्यासह अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

* * * * * * * *

Thursday, 26 February 2015

धरणातील गाळ हेच शेतीसाठी योग्य नैसर्गिक खत ! मन्याड धरणातील गाळ उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा :आमदार उन्मेश पाटील


धरणातील गाळ हेच शेतीसाठी योग्य नैसर्गिक खत !
मन्याड धरणातील गाळ उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा
:आमदार उन्मेश पाटील

चाळीसगांव, दिनांक 26 :-  राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर-2014 साली मांडलेली संकल्पना सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र -2019 या संकल्पनेतुन जलयुक्त शिवार अभियान राज्यात मोठया प्रमाणावर सुरु आहे. पिंपळवाड शिवारातील मन्याड धरणातील लोकसहभागातून पात्रातील 1 ते 1.5 चौरस कि.मी. परिसरातील सुमारे 50 हजार ब्रास इतका गाळ येत्या काही महिन्यात काढण्यात येऊन तो परिसर लवकरच पाण्याने व्याप्त होईल. यामुळे या परिसरातील हे अभियान केवळ जिल्हयातच नव्हे तर नाशिक विभागात एक आदर्श ठरेल असा विश्वास आमदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त करुन शेतीला रासायनिक खतांची नव्हे तर नदीपात्रातील गाळासारख्या जैविक खतांची खरी गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
                     तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ शिवारातील नदीपात्रातील लोकसहभागातुन गाळ उपसा मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, पिंपळवाड चे सरपंच शिरीष जगताप, जलसंपदाचे सहाय्यक अभियंता राहुल पाटील, जलसंपदाचे शाखा अभियंता जे.डब्ल्यु. सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी जे.आर.पाटील, कृषी अधिकारी ए.जे.येवले,  मंडळ अधिकारी राठोड, ग्रामसेवक चंद्रकांत गढरे, तलाठी डि.डि.अहिरे, नरेश जैन, भरत गोरे, कैलास गावडे आदि मान्यवर उपस्थित होते. 
                     यावेळी आमदार उन्मेश पाटील म्हणाले की, नविन प्रकल्प सुरु करावयाचा झाल्यास अनेक विभागांच्या तांत्रीक मान्यता, अनुदान शिवाय वेळ जातो म्हणून लोकसहभागातून स्वयंस्फुर्तीने अभियान राबविल्यास पैसा, वेळ वाचुन जनमान्य असे अभियान नक्कीच स्वागतार्ह आहे. लोकसहभागाला जोड म्हणून लोकप्रतिनीधी या नात्याने मी शासनस्तरावरुन तांत्रीक विभागाकडून काही अत्याधुनिक यंत्र सामुग्री मिळविण्यासाठी  सैदव प्रयत्नशिल असून जलयुक्त शिवार अभियानाच्या दृष्टीने नागरिकांच्या सुचना व संकल्पनांचे नेहमी स्वागतच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
                     उप विभागीय अधिकारी  मनोज घोडे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, राज्याच्या स्थापनेच्यावेळी राज्याची सिंचन क्षमता 5 टक्के एवढी होती. त्यात वाढ होऊन आताही ती केवळ 18 टक्के एवढीच आहे, आणि ही बाब समाधानकारक नसुन लोकसहभागातुन असे अभियान राबविल्यास सिंचन क्षमतेत वाढ होऊन परिसर टंचाईमुक्त होण्यास नक्कीच मदत होईल असे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी लोकसहभागातून गावक-यांनी स्वयंस्फुर्तीने सुरु केलेल्या या अभियानास शुभेच्छा देऊन हा परिसर मार्च-2016 पर्यंत जलमय होईल असा विश्वास व्यक्त केला.
                     अभियानातंर्गत गाळ काढण्याकामी हिरापुरचे संदीप पाटील यांनी त्यांच्या मालकीचे दोन जे.सी.बी. उपलब्ध करुन दिलेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पिंपळवाड निकुंभ चे सरपंच शिरीष जगताप, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवकांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार तालुका कृषी अधिकारी जे.आर.पाटील यांनी मानले

* * * * * * * *

Tuesday, 24 February 2015

मार्च अखेर महसुल वसुलीचे उध्दीष्ट पुर्ण करा : जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल


मार्च अखेर महसुल वसुलीचे उध्दीष्ट पुर्ण करा !
:जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल

चाळीसगांव, दिनांक 24 :- आर्थिक वर्ष सन 2014-2015 हे 31 मार्च अखेर पुर्ण होत असून चाळीसगाव विभागातील महसुल वसुली ही मार्च अखेर शंभर टक्के पुर्ण करण्याच्या सक्त सुचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज तहसिल कार्यालयात आयोजित महसुल प्रशासनाच्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी जे.आर.पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, विजय सुर्यवंशी,  वाघ, अनंत परमार्थी यांच्यासह मंडळ अधिकारी व  तलाठी उपस्थित होते.
                     आढावा बैठकीत चाळीसगांव महसुल प्रशासनाला यापूर्वी 7 कोटी 12 लाखाचे उध्दीष्ट देण्यात आले होते. त्यात सुधारणा करुन सुधारित उध्दीष्ट 7 कोटी 50 लाख रुपयांचे देण्यात आले आहे. यापैकी आजतागायत 5 कोटीचे उध्दीष्ट पूर्ण करुन महसुल प्रशासनाने सरासरी 72 टक्के महसुल वसुली पुर्ण केली असून उर्वरित उध्दीष्ट पुर्ण करण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचा आढावा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी घेतला. यावेळी जलयुक्त शिवार अभियानासह  कृषी विभाग, वनविभाग तसेच  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचाही आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला असता तालुका प्रशासनाच्या एकूण कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत उर्वरित उध्दीष्ट शंभर टक्के पुर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या. यावेळी कार्यालयातील अभिलेखाची दप्तर तपासणी तसेच सातबारा संगणकीकरणाची माहितीही त्यांनी संबंधितांकडून जाणून घेतली.
उध्दीष्ट पुर्ण न करणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई करणार
                     महसुल वसुलीचे काम करतांना कुठल्याही अधिकारी, कर्मचा-याने हयगय केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना आज जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी  मंडळ अधिकारी व तलाठयांच्या आढावा बैठकीत दिल्या. तालुक्यातील 67 गावांमध्ये जे खरीप अनुदानाचे वाटप महसूल प्रशासनातर्फे करण्यात येत आहे त्या अनुदान वाटपामध्ये ज्या लाभार्थ्यांचे बँक खात्याचा तपशिल अपुर्ण अथवा चुकीचा आहे अशा लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहचून त्यांच्या अचुक बँक खात्याचा तपशिल संबंधित गावाच्या तलाठयांनी प्राप्त करावा. तसेच अनुदान वाटपाची कार्यवाही देखील मार्च-2015 अखेर पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. तर खरीप अनुदानापासुन वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी देखील आपला बँक खात्याचा अचुक तपशिल महसूल यंत्रणेस देण्याचे आवाहन त्यांनी तालुक्यातील नागरिकांना यावेळी केले.


* * * * * * * *

Saturday, 21 February 2015

करमणुक कर वसुलीसाठी चाळीसगाव प्रशासनाने उगारला कारवाईचा बडगा

करमणुक कर वसुलीसाठी
चाळीसगाव प्रशासनाने उगारला कारवाईचा बडगा

चाळीसगांव, दिनांक 22 :-  आर्थिक वर्ष सन 2014-15 हे 31 मार्च अखेर पुर्ण होत असून चाळीसगाव विभागातील करमणुक कर वसुलीसाठी चाळीसगाव प्रशासनातर्फे थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे. थकीत महसुल वसुलीसाठी तालुक्यातील सन 2010-2011 या वर्षातील एकूण 16 केबल जोडणी धारकांनी एकूण 1 लाख 44 हजार 660 इतक्या करमणुक कराची रक्कम थकविली असून सन 2014-2015 या वर्षातील एकूण 41 केबल जोडणी धारकांनी 2 लाख 15 हजार 715 इतकी करमणुक कराची रक्कम थकविली असल्याने केबल जोडण्या खंडीत करण्याचे आदेश संचालक चाळीसगांव केबल नेटवर्क यांना पारित करण्यात येऊन वसुली मोहिम राबविण्यात आली.  सदर केबल जोडणी धारकांनी डिसेंबर-2014 अखेरचा करमणूक कराचा भरणा वेळेत न केल्याने सदर केबल जोडणी धारकांच्या पुढील आदेश होईपावेतो किंवा संबंधितांनी कराचा भरणा कोषागारात करेपर्यंत जोडण्या पुर्ववत करण्यात येणार नसल्याचे  दिनांक 21 फेब्रुवारी, 2015 च्या आदेशात म्हटले आहे. तालुक्यात असलेल्या अनधिकृत केबल जोडणी धारकांचा सर्व्हे करुन त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे प्रांताधिकारी घोडे यांनी कळविले आहे.
विश्वचषक क्रिकेट मॅचेसमुळे करमणुक कर वसुलीस फायदा
                     या कारवाईच्या अनुषंगाने सन 2010-2011 मधील करमणुक कराचे थकबाकीदार असलेले पंडीत पाटील यांनी रु 7 हजार 800, दिपक पाटील यांनी 2 हजार 250, रविंद्र वडनेरे यांनी 6 हजार, राकेश ठाकूर यांनी 6 हजार, तुलसिदास कदम यांनी 2 हजार 700 तर जितेंद्र गायकवाड यांनी 2 हजार 250 इतक्या करमणुक कराचा तात्काळ भरणा केला असून सन 2014-15 मधील प्रदीप जाधव यांनी 18 हजार 800 तर जितेंद्र गायकवाड यांनी 4 हजार 500 इतक्या रकमेचा तात्काळ भरणा केला आहे. एकंदरीत 2010-11 मधील थकबाकीदार असलेल्या केबल जोडणी धारकांनी थकीत कराचा भरणा रुपये 24 हजार 750 तर सन 2014-2015 मधील थकबाकीदार असलेल्या केबल जोडणी धारकांनी थकीत कराचा भरणा रुपये 23 हजार 300 इतक्या रकमेचा भरणा केल्याचे प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे. करमणुक कराची रक्कम ही दरमहा 5 तारखेपर्यंत भरण्याबाबतच्या सुचनाही संबंधितांना दिल्या असून उर्वरित थकबाकीदारांनी देखील करमणुक कराची थकीत रकमेचा तात्काळ भरणा करण्याच्या सुचना प्रातांधिकारी घोडे यांनी दिल्या आहेत.
महसुल वसुली बाबत प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आढावा
                     महसुल वसुलीबाबत प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी आढावा घेतला असता चाळीसगाव विभागास एकूण 7 कोटी 12 लाख 66 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून यापैकी 4 कोटी 92 लाख इतकी वसुली झालेली आहे. या वसुलीबाबत तहसिलदारांनी मंडळ अधिका-यांसह तलाठयांच्या दर आठवडयाला बैठका घेऊन महसुल वसुली वाढविण्यासाठी उपाय योजना करण्यासंदर्भात आदेश केले आहेत. महसुल वसुली मोहिमेत बिनशेती वरील महसुल, नगर परिषदेकडील वसुली, विटा भट्टी, स्टोन क्रेशर, गौण खनिज वरील कारवाया, मोबाईल टॉवर, एमएसईबी, बीएसएनएल या सरकारी संस्थांकडील वसुलीसह शहरातील चित्रपटगृहे, केबल जोडणी धारक, अवैध वाळु वाहतुक या बाबींवर गांभीर्याने लक्ष केंद्रीत करुन महसुल वसुली सक्तीने करावयाच्या सुचना केल्या आहेत. त्याच प्रमाणे शासकीय कामांवर वापर होणारे गौणखनिज यावरील रकमांचे समायोजन करण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत. तसेच महसुल वसुली ही मार्च-2015 अखेर शंभर टक्के पुर्ण करण्याच्या सुचना देऊन वसुली कामात हयगय करणा-या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशा सुचनाही प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी दिल्या आहेत.
                     या महसुली वसुली मोहिमेमध्ये थकबाकीदारांवर कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार असल्याने तालुक्यातील नागरिकांनी तसेच संबंधितांनी  विहीत मुदतीत कराचा भरणा करुन तालुका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही प्राताधिकारी मनोज घोडे पाटील व तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.

* * * * * * * *

Wednesday, 18 February 2015

पाचोरा उपविभागात गाळ उपसा मोहिमेस गती, विभागात एकूण 8 ठिकाणी गाळ उपसाकामे सुरु : प्रांताधिकारी गणेश मिसाळ


पाचोरा उपविभागात गाळ उपसा मोहिमेस गती
विभागात एकूण 8 ठिकाणी गाळ उपसाकामे सुरु 
                                                              : प्रांताधिकारी गणेश मिसाळ

चाळीसगांव, दिनांक 18 :- पाचोरा उपविभागात खरिप तथा रब्बीची पिके निघाल्यामुळे तसेच शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने जलस्त्रोतातील गाळ उपसा मोहिमेस गती मिळाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली आहे. गत दोन वर्षामध्ये विभागात पाचोरा तालुक्यातील 18 प्रकल्पातुन 4 लाख 17 हजार 930 ब्रास इतका गाळ उपसण्यात आला असून त्यामुळे 117 कोटी 2 लाख 4 हजार लिटर इतक्या जलसाठयात वाढ झाली आहे. तर भडगांव तालुक्यातील 14 प्रकल्पातुन 2 लाख 46 हजार 990 इतका गाळ उपसण्यात आल्याने 69 कोटी 15 लाख 72 हजार लिटर इतक्या मोठया प्रमाणात जलसाठयात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चाळीसगांव तालुक्यातील 12 प्रकल्पातून 6 लाख 36 हजार 285 ब्रास इतका गाळ उपसण्यात आल्यामुळे 178 कोटी 15 लाख 98 हजार लिटर इतका जलसाठा वाढला आहे. या  मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत असतांना याचा प्रत्यक्ष लाभ हा शेतक-यांना दोन प्रकारे होत असतो. या वाढीव जलसाठयामुळे टंचाईवर मात करणे शक्य होते तर गाळ टाकून बखळ जमिनींची पोत सुधारल्याने शेतीच्या उत्पन्नातही मोठया प्रमाणात वाढ होत असते.
                     पाचोरा तालुक्यातील गाळण येथील गाळ उपसा मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी प्रांताधिकारी गणेश मिसाळ म्हणाले की, दिनांक 19 मार्च 1999 च्या शासन निर्णयान्वये अस्तित्वात असलेल्या जलस्त्रोतातील गाळ हा करमुक्त केला आहे. म्हणजेच याला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लागत नसल्याने  ज्या शेतक-यांना आपल्या शेतात गाळ टाकायचा असेल त्यांना यावर्षीही कुठलीही रॉयल्टी न भरता नाला, धरण किंवा तलावातील गाळ मोफत उपसता येणार आहे. त्यामुळे उपविभागातील जास्तीत जास्त शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले आहे. गेल्या दोन वर्षापासून या मोहिमेला शेतक-यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून यावर्षीही या मोहिमेने गती घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावर्षी भडगांव तालुकयातील गोंडगांव शिवारातील पाझर तलाव, महिंदळे सिमेंट नालाबांध येथील गाळ उपसा तर पासर्डी येथील साठवण तलावातील गाळ उपश्याची कामे सुरु झाली असून पाचोरा तालुक्यातील गाळण, खडकदेवळा मध्यम प्रकल्प, तारखेडा-गारखेडा लघुपाटबंधारे तलाव, उमरदे-कुऱ्हाड लपा साठवण बंधारा, खेडगांव नंदीचे येथील साठवण तलावातील गाळ उपश्याची कामे सुरु झाली आहेत.
                     शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने यावर्षी गाळ उपसा मोहिमेस अधिक गती देऊन उपविभाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा व गत दोन वर्षाच्या तुलनेत अधिक भरीव कामे यावर्षी करण्याचे आवाहन करत कुठल्याही जलस्त्रोत जसे सिमेंट नालाबांध, साठवण बंधारे, लघु पाटबंधारे प्रकल्प, मातीनाला बांध व या सारखे इतर सर्व प्रकारचे जलस्त्रोतातील गाळ विनामुल्य उपसा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
                     गाळण येथील कार्यक्रमाप्रसंगी सरपंच उत्तमराव पाटील, नायब तहसिलदार राजेंद्र नजन, आबा महाजन, अनिल पाटील, सचिन पाटील, मंडळ अधिकारी रणजित पाटील, तलाठी विजय आगलावे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

* * * * * * * *

Tuesday, 17 February 2015

न्हावे येथील जवान अर्जुन पिलोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


न्हावे येथील जवान अर्जुन पिलोरे
यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चाळीसगांव, दिनांक 17 :- तालुक्यातील न्हावे येथील रहिवासी अर्जुन आनंदा पिलोरे हे हवालदार वायरलेस ऑपरेटर या पदावर आर्मी सेवेत कार्यरत होते त्यांचा दिनांक 15 फेब्रुवारी, 2015 रोजी सकाळी 06:45 वाजता ऱ्हदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु झाला असून त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार उन्मेश पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गट विकास अधिकारी मालती जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आर.एल.पाटील, माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील, शशीकांत साळुंखे, दिनेश बोरसे यांच्यासह न्हावे गावचे सरपंच श्रीमती दिपाली देवरे व पंचक्रोशीतील गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
                     यावेळी आमदार उन्मेश पाटील शोकसंदेश देतांना म्हणाले की विर जवान अर्जुन पिलोरेच्या अंत्यसंस्कारात एकीकडे अभिमान वाटतो तर दुसरीकडे दु:खही होते. चाळीसगांव तालुक्याने भारतीय सेनेला मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे अशा विर जवानांचा अभिमान बाळगून देशसेवेसाठी तरुणांनी उत्साही राहण्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
                     विर जवान अर्जुन पिलोरे यांची मुलगी कु रेश्मा हिच्या हातुन अग्निडाग देण्यात आला तर भुसावळ येथुन आलेले लेफ्टनन कर्नल परमार व रजत कुमार साका यांच्या पथकाने सलामी ‍दिली.  पोलीस प्रशासनाच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून विर जवान अर्जुन पिलोरे यास अखेरची मानवंदना दिली. यावेळी आमदार उन्मेश पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, शशिकांत साळुंखे, गटविकास अधिकारी मालती जाधव, आर.एल.पाटील पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. तर गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी पुष्प गुच्छ वाहून दोन मिनीटे एका जागेवर स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण केली.
                     विर जवान अर्जुन पिलोरे यांचा सेवेतील सहकारी माधव देवरे यांनी शोकसंदेशात सांगितले की,  विर जवान अर्जुन पिलोरे यांना जम्मु कश्मिर सेवा पुरस्कार, आसाम नागालँण्ड सेवा पुरस्कार, गुड सेवा पुरस्कार, दिर्घ सेवा पुरस्कार अशा चार प्रकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय सेनेतील दुरसंचार विभागात ऑपरेटर म्हणून दिनांक 28 फेब्रुवारी, 1996 रोजी दाखल झालेल्या अर्जुनने अभ्यास करुन परिक्षा उत्तीर्ण होत हवालदार पदापर्यंतची पदोन्नती प्राप्त केली होती आणि वरिष्ठ पदावर पोहचल्याने त्यांचा सेवाकालावधी देखील वाढविण्यात आला होता. आदर्श घेण्यासारखा आमचा सहकारी गेल्याचे दु:ख व्यक्त करतांना त्यांनी वरील बाबी आपल्या शोकसंदेशाव्दारे व्यक्त केल्या.
                     विर जवान अर्जुन पिलोरे यांच्या  पश्चात पत्नी रत्नाबाई अर्जुन पिलोरे वय 30, मुलगी  रेश्मा अर्जुन पिलोरे वय 8 व  भाऊ रामदास आनंदा पिलोरे वय 45 असा ‍ परिवार आहे.


* * * * * * * *

Monday, 16 February 2015

जलयुक्त शिवार मोहिमेचा लोकसहभागाव्दारे शुभारंभ


जलयुक्त शिवार मोहिमेचा लोकसहभागाव्दारे शुभारंभ

चाळीसगांव,दिनांक 16:- तालुक्यातील सोनगांव येथे आज जलयुक्त शिवार मोहिमेचा लोकसहभागाव्दारे प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच रामेश्वर पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी ‍रविंद्र जाधव, मंडळ अधिकारी ए.बी.जाधव, तलाठी डी.एन.पाटील, पोलीस पाटील देशमुख, कृषी सहाय्यक पाटील व सुर्यवंशी, ग्रामसेवक भावना पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                     चाळीसगांव तालुक्यातील एकूण 24 गावांची निवड ही जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली असून यामध्ये लोंजे, शेवरी, डोणदिगर, टाकळी प्र.चा, ओझर, खरजई, वाकडी, रोकडे, शिरसगांव, टाकळी प्र.दे, तळोंदे प्र.दे, म्हाळशेवगे, डामरूण, वडाळा-वडाळी, पिंप्री खु, परशराम नगर, रांजणगांव, सांगवी, खेर्डे, सोनगांव, आंबेहोळ, तळोंदे प्र.चा, बोढरे, भोरस बु. या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.
                     तालुक्यातील सोनगांव येथील नाल्यातील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून आज सुरवात करण्यात आली त्यावेळी प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी जलयुक्त शिवार अभियानात कोणकोणती कामे करता येतील याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शासनामार्फत राबविण्यात येणारी जलयुक्त शिवार अभियान ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून आपले गाव कायमस्वरुपी टंचाईमुक्त करण्यासाठी यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. विहीरींचे पुर्नभरण, गावातील पाणीसाठे वाढविणे, जलव्यवस्थापन या सारख्या मुलभूत गोष्टींमुळे गाव टंचाईमुक्त होऊ शकते. तरी गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी  गावातील विकासाला चालना देण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
                     यावेळी प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केवळ जलयुक्त शिवार मोहिमेतील गावांनीच नव्हे तर प्रत्येक गावातील लोकांनी आपल्या गावातील पाणी साठयांमधील गाळ काढून आपल्या शेतात टाकण्याचे आवाहन केले. यामध्ये पाणी साठयात वाढ होऊन ‍शेतीची पोत सुधारण्यास मदत होईल. यासाठी सर्व गावक-यांना गाळ उपसण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
                    या कार्यक्रमास उपस्थित सरपंच रामेश्वर पाटील यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानातील प्रत्येक योजना यशस्वी करण्याचे व गाव टंचाईमुक्त करण्यासाठी सहभाग देण्याचे गावक-यांतर्फे आश्वासन दिले.


* * * * * * * * *

न्हावे येथील जवानाचा मृत्यु


न्हावे येथील जवानाचा मृत्यु
तालुका प्रशासनातर्फे नायब तहसिलदार सोनवणे यांनी केले सांत्वन

चाळीसगांव,दिनांक 16:- तालुक्यातील न्हावे येथील रहिवासी अर्जुन आनंदा पिलोरे हे हवालदार वायरलेस ऑपरेटर या पदावर आर्मी सेवेत कार्यरत होते त्यांचा दिनांक 15 फेब्रुवारी, 2015 रोजी सकाळी 06:45 वाजता ऱ्हदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी रत्नाबाई अर्जुन पिलोरे वय 30, मुलगी  रेश्मा अर्जुन पिलोरे वय 8 व  भाऊ रामदास आनंदा पिलोरे वय 45 असा ‍ परिवार आहे. मयत अर्जुन पिलोरे हे 1996 मध्ये आर्मी सेवेत दाखल झाले होते तर त्यांचा शासकीय बॉण्ड असलेला कालावधी पुर्ण करुन सेवेत वाढ करुन ते आर्मी सेवेत कार्यरत होते. तालुका प्रशासनाच्या वतीने आज निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांच्यासह मंडळ अधिकारी काळोखे, तलाठी कुलकर्णी यांनी कुटूंबियांची भेट घेऊन सात्वंण केले. यावेळी अर्जुन पिलोरे यांचे नातेवाईक, गावातील सर्व प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

Tuesday, 10 February 2015

जळगावकरांना तीन दिवस वैचारिक,साहित्यिक,सांस्कृतिक मेजवानी ‘ग्रंथोत्सव’चे 17 फेब्रुवारीला उदघाटन


जळगावकरांना तीन दिवस वैचारिक,साहित्यिक,सांस्कृतिक मेजवानी
ग्रंथोत्सवचे 17 फेब्रुवारीला उदघाटन
जळगाव,दि.१० - महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे दिनांक १७,१८ १९ फेब्रुवारी रोजीजळगाव ग्रंथोत्सव २०१४-१५चे आयोजन करण्यात आले आहे. वैचारिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक मेजवानी ठरणा-या या ग्रंथोत्सवात जिल्ह्यातील जनतेने सहभागी होऊन वाचनसंस्कृती अधिक बळकट करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन ग्रंथोत्सव संयोजन समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले.
शहरातील लेवा बोर्डींगच्या सभागृहात आयोजित तीन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्रीमती अग्रवाल बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आस्तिककुमार पांडेय, जिल्हा माहिती अधिकारी श्री.किशोर गांगुर्डे यांचेसह ग्रंथोत्सव संयोजन समितीचे सदस्य आणि दैनिकपुण्यनगरीचे संपादक श्री.अनिल पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.चंद्रशेखर ठाकूर, माहिती अधिकारी श्री.मिलिंद दुसाने, उपशिक्षणाधिकारी श्री.अनिल सोनार आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जळगाव जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग देखील या ग्रंथोत्सवात संयुक्तपणे सहभागी होत असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन ती जोपासणे, वाचन संस्कृती निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे श्री. आस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी सांगितले.
ग्रंथदिंडीने प्रारंभ
            या ग्रंथोत्सवानिमित्त मंगळवार दि.17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाणार आहे. शहरातील काव्य रत्नावली चौक ते लेवा बोर्डींग असा या दिंडीचा मार्ग असेल. दिंडीचे पूजन लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष डॉ.सुभाष चौधरी यांच्या हस्ते होऊन दिंडीचा प्रारंभ होईल. दिंडीचा समारोप लेवा बोर्डींग या ग्रंथोत्सवस्थळी होईल.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आस्तिककुमार पांडेय,  डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक, श्री.गुलाबराव खरात, अप्पर जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथोत्सव-2014-15’ चे शानदार उदघाटन
            सकाळी साडेदहा वाजता राज्याचे महसूल, पुनर्वसन मदत कार्य, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ, कृषी आणि फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास मत्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य तथा जळगावजिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथराव खडसे यांच्या शुभहस्ते या  ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून राज्याचे जलसंपदामंत्री ना. श्री.गिरीश महाजन या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक, लेखक श्री.प्रभाकर श्रावण चौधरी हे भूषविणार आहेत.
            याप्रसंगी जिल्हा परिषद  अध्यक्षा श्रीमती प्रयागताई कोळी, महापौर श्रीमती राखीताई सोनवणे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मो.हुसेन खान उर्फ अमीरसाहब, राज्यसभेचे खासदार श्री. ईश्वरलाल जैन, खासदार श्री..टी. नाना पाटील, रावेरच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसेविधानपरिषद सदस्य . गुरुमुख जगवाणी, . डॉ.श्री. सुधीर तांबे, . डॉ. अपूर्व हिरे, . श्रीमती स्मिताताई वाघविधानसभा सदस्य सर्वश्री . गुलाबराव पाटील, .सुरेश भोळे, .चंद्रकांत सोनवणे,. हरिभाऊ जावळे, . संजय सावकारे, . शिरीष चौधरी, . डॉ. सतिश पाटील, .उन्मेश पाटील, . किशोर पाटील, पाचोरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शिक्षण आरोग्य समिती सभापती सुरेश धनके, समाजकल्याण सभापती सौ.दर्शना घोडेस्वार, सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती सौ. नीता चव्हाण, कृषि पशुसंवर्धन समिती सभापती सौ.मीनाताई पाटील, महाराष्ट्र  राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्य सचिव श्रीमती मीनाक्षी पाटील, जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री.आस्तिककुमार पांडेयपोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, शिक्षण उपसंचालक श्री.बी.एस. सूर्यवंशीजिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय.सी.शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
वैचारिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
            उद्घाटन सत्रानंतर, दुपारी 2 वाजताविद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृती-संवर्धनासाठी शिक्षक-पालकांची भूमिकाया विषयावर परिसंवाद होईल. त्याच्या अध्यक्षस्थानी  डॉ.किसन पाटील हे राहतील तर डॉ. हारुन शेख, प्रा.आशुतोष पाटील, निर्मला फालक, वैजयंती तळेले हे मान्यवर त्यात आपले विचार मांडतील. सायंकाळी चार वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सायंकाळी सहा वाजता कथाकथनाच्या कार्यक्रमात माया धुप्पड, दीपक कासोदे, पौर्णिमा हुंडीवाले, गोकुळ बागुल हे कथाकार आपल्या कथा सादर करतील.
            बुधवार दि.18 रोजी सकाळी 9 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन, गीतगायन आणि एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 11 वाजतासोशल मिडिया आणि वाचनसंस्कृतीया विषयावर परिसंवाद होईल.परिसंवादाचे अध्यक्षस्थानी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार श्री.युवराज मोहिते हे राहतील. या परिसंवादात दैनिक सकाळचे निवासी संपादक श्री.भालचंद्र पिंपळवाडकर, दै. जनशक्तीचे  कार्यकारी संपादक श्री. विक्रांत पाटील यांचेसह अमोल बाविस्कर, कु.किरण महाजन हे युवा प्रतिनिधी सहभागी होतील. दुपारी 2 वाजता साहित्यिकांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात डॉ.किसन पाटील, अशोक कोतवाल, प्रकाश किनगावकर, उत्तम कोळगावकर, अशोक कोळी आदी साहित्यिक सहभागी होतील.
स्पर्धा परीक्षेसाठी वाचनविशेष सत्र
            स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठीस्पर्धा परीक्षेसाठी वाचनया विषयावर जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री.आस्तिककुमार पांडेयपोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर हे मान्यवर अधिकारी दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आपले अनुभव सांगतील. या सत्रात सहभागी मान्यवर  अधिका-यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना  वक्त्यांकडून पाहिजे असलेली माहिती, स्पर्धा परीक्षा सरावातील त्यांच्या अडचणी, शंका जिल्हा माहिती कार्यालयाकडे पाठविल्यास या व्याख्यानात या शंकांचे, प्रश्नांचे निरसन करणे सोयीचे होईल   असेही  जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे अथवा djdiojalgaon@gmail.com या इमेलवर आपले स्पर्धा परीक्षांविषयक प्रश्न, शंका पाठविण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री.गांगुर्डे यांनी यावेळी केले.
खान्देशी लोककलांचे दर्शन
            बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. तसेच विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी खान्देशी लोककलांचा अविष्कार हा कार्यक्रम सादर करतील.
वाचनसंस्कृतीवर वादविवाद स्पर्धा परिसंवाद
            शेवटच्या दिवशी सकाळी 9 वाजतासंगणकक्रांतीमुळे वाचनसंस्कृतीवर विपरित परिणाम झाला आहे काय?’ या विषयावर शिक्षकांसाठी वादविवाद स्पर्धा होईल.त्यानंतर सकाळी 11 वाजतावाचनसंस्कृतीची जोपासना-वृत्तपत्रांचे योगदानया विषयावर परिसंवाद होईल.या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी दैनिक गावकरीचे संपादक धों.. गुरव राहणार आहेतया परिसंवादात देशदूतचे संपादक हेमंत अलोने, लोकमतचे आवृत्तीप्रमुख मिलिंद कुलकर्णी, दिव्यमराठीचे आवृत्तीप्रमुख त्र्यंबक कापडेतरुण भारतचे आवृत्तीप्रमुख दिलीप तिवारी, महाराष्ट्र टाईम्सचे ब्युरो चीफ गौतम संचेती, देशोन्नतीचे आवृत्तीप्रमुख मनोज बारी, साईमतचे संपादक  प्रमोद -हाटे, हे वृत्तपत्रक्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. दुपारी दोन वाजता शालेय विद्यार्थी काव्यवाचन सादर करतील.
संतसाहित्यावर विशेष व्याख्यान ग्रंथपालांच्या सत्काराने समारोप
            सायंकाळी पाच वाजता मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार तथा ... श्री.श्यामसुंदर सोन्नर यांचेसंतसाहित्य आणि प्रबोधनया विषयावर व्याख्यान होईल.त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता जलसंपदा मंत्री ना.श्री. गिरीश महाजन यांच्या हस्ते  वाचनसंस्कृती वाढविण्यास योगदान देणा-या ज्येष्ठ ग्रंथपालांचा बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि बहिणाबाई चौधरी यांच्या वारसांचा सत्कार करुन समारोप करण्यात येईल. यावेळी  जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री.आस्तिककुमार पांडेयपोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, महापालिका आयुक्त संजय कापडणीस हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
स्टॉल बुकींगसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
            या ग्रंथोत्सवात विविध प्रकाशकांच्या पुस्तक विक्रीचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. स्थानिक पुस्तक विक्रेते प्रकाशकांनी तसेच बाहेरगावच्या प्रकाशकांनी स्टॉल बुकींगसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टप्पा क्रमांक 3, पहिला मजला, जळगाव. संपर्क क्रमांक 0257-2229628 2221078 वर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिका-यांनी केले.
दुर्मिळ ग्रंथ खरेदीची पर्वणी
            तीन दिवस चालणा-या ग्रंथप्रदर्शनात विविध विषयांवरचे ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. खाजगी प्रकाशकांसोबतच शासकीय प्रकाशनांचे दालनही उभारण्यात येणार आहे.त्यातील अनेक दुर्मिळ शासकीय प्रकाशने जिज्ञासू वाचकांना पाहता खरेदी करता येतील.
वाचक, अभ्यासक- साहित्यप्रेमींना आवाहन
            तीन दिवसीयजळगाव ग्रंथोत्सव 2014-15’ चा  जळगाव जिल्ह्यातील साहित्यप्रेमी वाचक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी आणि जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, तसेच  ग्रंथोत्सव संयोजन समितीचे सदस्य श्री. अनिल पाटील, डॉ.किसन पाटील, रंगराव पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.चंद्रशेखर ठाकूर, शिक्षणाधिकारी श्री.शशिकांत हिंगोणेकर, माहिती अधिकारी श्री.मिलिंद दुसाने, उपशिक्षणाधिकारी एस.टी.वराडे आणि समितीचे सदस्य सचिवजिल्हा माहिती अधिकारी श्री. किशोर गांगुर्डे  यांनी केले आहे.

* * * * * * * * * * *