आमदार उन्मेश पाटलांनी घेतला महावितरणचा आढावा
चाळीसगांव,दिनांक 7:-
शासनाच्या ध्येय धोरणानुसार दारिद्रय रेषेखालील ग्राहकांना रुपये 15 भरुन विज कनेक्शन दिल्यास विज चोरी व
विज गळतीवर प्रभावी उपाय सापडू शकतो परंतु महावितरणच्या नाकर्तेपणामुळे सदर योजना
प्रभावीपणे राबविण्यात न आल्याने तालुक्याला भारनियमणाला सामोरे जावे लागत असल्याचे
प्रतिपादन आमदार उन्मेश पाटील यांनी आज साठे मंगल कार्यालयात आयोजित महावितरणच्या
आढावा बैठकीत केले.
शहरातील साठे मंगल कार्यालयात महावितरणच्या
आढावा बैठकीस राजेंद्र चौधरी, के.बी.साळुंखे, सतिष पाटे, राजेंद्र पाटील, दिनेश बोरसे,
संजय पाटील यांच्यासह महावितरणचे कार्यकारी अभियंता डी.के.मोहोड, उप कार्यकारी अभियंता धिरज चव्हाण, ठाकरे, एस.के.पिंपळे यांच्यासह
महावितरणचे कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता व तक्रारदार ग्राहक मोठया संख्येने उपस्थित
होते.
या आढावा बैठकीत तालुक्याचा पायाभुत
आराखडयासाठी (इन्फ्रा स्कीम) खाली मिळालेल्या 103 कोटीच्या कामाचा आढावा घेतांना
यात केवळ 71 कोटीची कामे झाली असून 32 कोटीची कामे प्रलंबीत असल्याने आमदारांनी
नाराजी व्यक्त केली तर पायाभुत आराखडयात 497 कि.मी. पैकी केवळ 285 कि.मी. इतक्याच लाईनचे काम झाले असून उर्वरित
212 कि.मी. लाईनचे रखडलेल्या कामाबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.
बैठकीसाठी उपस्थित असलेल्या शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांच्या तक्रारी जाणून
घेतल्या व यावर महावितरणने एक महिन्यात या तक्रारींचे निवारण करण्याच्या सुचनाही
त्यांनी सर्व संबंधीतांना यावेळी दिल्या. ग्राहक विजबिल भरण्यास तयार असतो परंतु
त्याला बिल भरणा करण्यासाठी तासंतास रांगेत उभे रहावे लागते करिता महावितरणने विज बिल भरणा केंद्रांची
उभारणी करावी, तालुक्यात असलेल्या 225 जनमित्र (लाईनमन) यांच्या मोबाईल क्रमांकासह
यादी तयार करुन ती प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये डकविण्यात यावी. अशा विविध
प्रकारचे मार्गदर्शनपर सुचना आमदार पाटील यांनी यावेळी दिल्या.
आमदार आपल्या दारी !
यापुढे आता ग्रामीण भागातील जनतेला
तक्रारींसाठी तालुक्यात न बोलवता महावितरणच्या अधिका-यांसमवेत आमदार उन्मेश पाटील
हे प्रत्येक गावात स्पॉट व्हिजीट करणार असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगीतले.
राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, सिंगल फेझींग योजना, लघुदाब योजना या सारख्या
महावितरण मार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आता यापुढे
जनता दरबार भरविणार असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगीतले.
* *
* * * * * *
No comments:
Post a Comment