संत
मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
शेतक-यांना पाच लाख सोलरपंप
उपलब्ध करुन देणार
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुक्ताईनगर, जि.जळगाव, दि.30- शेतीसाठी अखंडित वीज मिळावी,
वीजेअभावी शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने शेतक-यांना पाच अश्वशक्तीचे
पाच लाख सोलरपंप उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला असून केंद्र शासनाच्या ग्रामीण
विद्युत महामंडळाच्या अर्थसहाय्याने हे पंप उपलब्ध करुन दिले जातील, अशी घोषणा
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
मुक्ताईनगर
येथे संत मुक्ताई शुगर ॲण्ड एनर्जी लि. घोडसगाव येथील कारखान्याच्या पहिल्या गळीत
हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित
शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि
सहकार,पणन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कारखान्यातील
12 मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, कृषी, दुग्धविकास व पशुसंवर्धन, राज्य
उत्पादन शुल्क, मत्स्यपालन, अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे हे होते.
यावेळी
मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात 35 लाख शेतीपंपधारक असून
अधिकाधिक पंपधारकांना सोलर पंप पुरवून शेतीच्या वीजपंपांची संख्या निम्म्यावर
आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात रोहित्रे
जळाल्यामुळे अनेक ठिकाणी वीजेचा पुरेसा पुरवठा होत नाही हे लक्षात आल्यावर तातडीने
दोन हजार रोहित्रे लावण्याची कार्यवाही सुरु केली असून पुढील आठवड्यात उर्वरित
सातशे रोहित्रे देखील लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वीजेचे दोन
तासांनी वाढवलेले भारनियमन रद्द केले असून कोळशाअभावी बंद असलेली वीजनिर्मिती
केंद्र शासनाकडून कोळसा मागवून पुन्हा सुरु केली आहे, त्यामुळे काही दिवसात शेतक-यांसाठी
सलग आठ तास वीज देणे शक्य होणार आहे. रोहित्रांवरील भार कमी करण्यासाठी ज्यांनी
अवैधपणे वीजेच्या जोडण्या घेतल्या असतील त्यांच्याकडून पैसे भरल्यानंतर त्या जोडण्या वैध
करण्याचा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
लहरी
हवामानाचा अचूक अंदाज यावा म्हणून राज्यात मंडळस्तरावर 2065 हवामान यंत्रे
लावण्यात येणार असून त्याची माहिती
ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम लवकरच सुरु होणार असल्याचेही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कापूस खरेदी केंद्र सुरु करताना पणन महासंघाला
सबएजंट नेमण्याबाबत केंद्राला विनंती करण्यात आली आहे. कापूस उत्पादक शेतक-यांना योग्य भाव देतानाच बोनस देता येईल का?याबाबत सरकार
विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
जळगाव
व परिसर केळीचा प्रदेश असून या भागात केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु
करण्याचा विचार आहे. केळी पिकासाठी स्वतंत्र धोरण ठरविण्यात येत असून केळी अधिक
काळ टिकविण्यासाठी भाभा अणूसंशोधन केंद्राने विकसित केलेले रेडियशन स्टोअर सेंटरचे
तंत्रज्ञान या भागात आणण्यास सरकार अनुकूल असल्याचेही श्री. फडणवीस यांनी
सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील शहादा, शिंदखेडा, शिरपूर येथील उपसा सिंचन
योजनांबरोबरच कु-हा वरोरा, शेळगाव-पाडळसे, नार-पार गिरणा या सिंचन योजनांसाठी निधी
उपलब्ध करुन देण्यात येईल. मुक्ताईनगर परिसरातील युवकांना कौशल्यपूर्व तंत्रशिक्षण
देण्यासाठी मुक्ताईनगर येथे शासकीय कृषि महाविद्यालय व तंत्रनिकेतन सुरु
करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत लवकरच
निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जळगाव,
भुसावळ, चाळीसगाव येथील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी उद्योजकांना
आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील. लवकरच उद्योजकांशी याबाबत चर्चा करणार
असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. सुरत-नागपूर राष्ट्रीय
महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही
त्यांनी सांगितले.
यावेळी
बोलताना सहकारमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले की, साखर कारखाने हे केवळ
साखरेच्या आधारावर वाचणार नाहीत, त्यासाठी सहवीजनिर्मिती, डिस्टिलरी आणि इथेनॉलचा
पर्याय या कारखान्यांना स्वीकारावा लागेल. सहकारी साखर कारखाने हे शेतक-यांची
जीवनदायिनी असून हे कारखाने बंद पडले तर शेतकरी उद्धवस्त होतो, म्हणून हे कारखाने
चांगले चालावेत, अशी शासनाची भूमिका आहे.
वर्षानुवर्षे
बंद राहिलेला कारखाना आज सुरु होत असून शेतक-यांच्या स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस
असल्याचे महसूलमंत्री ना. श्री. एकनाथराव खडसे यांनी सांगितले. जिल्ह्यात वीजेचा
प्रश्न गंभीर असून केळी उत्पादक व
शेतक-यांना किमान आठ तास अखंडित वीज देण्याची मागणी त्यांनी केली. सिंचनासाठी पाणी देऊन धरणांची अपूर्ण कामे पूर्ण
करण्याबरोबरच उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यास दहा हजार एकर जमीन बागाईत होईल असे
सांगून तापी नदीवरील सुलवाडे-सारंगखेडा येथील बॅरेजेसमधून दरवर्षी 9 टीएमसी पाणी सोडून
द्यावे लागते म्हणून या भागातील सिंचन योजना लवकर कार्यन्वित करण्याची मागणीही
महसूलमंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुक्ताईनगर येथे कृषि
महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन सुरु करण्याबरोबरच मुक्ताईनगर व रावेर येथे
मिनी एमआयडीसी सुरु करुन चाळीसगाव,
भुसावळऔद्योगिक वसाहतींमध्ये मोठे उद्योग सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्याचे
आवाहनही श्री. एकनाथराव खडसे यांनी यावेळी केले.
या
सोहळ्यास व्यासपीठावर विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर, खासदार
ए.टी. ऩाना पाटील, खा. डॉ. सुभाष भामरे,
खा. श्रीमती रक्षाताई निखिल खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती
प्रयाग कोळी, आमदार सर्वश्री गिरिश महाजन,
चैनसुख संचेती, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे,
प्रा. राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, अनिल गोटे, राजूमामा भोळे, उन्मेश पाटील, उदेसिंग पाडवी, आकाश फुंडकर, आमदार श्रीमती देवयानी फरांदे,
श्रीमती स्नेहलता कोल्हे, श्रीमती मोनिका राजळे, विधानपरिषद सदस्य डा. गुरुमुख
जगवानी, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक डॉ.
जालिंदर सुपेकर, अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, डॉ. राजेंद्र फडके, श्रीमती
स्मिताताई वाघ, प्रा. सुहास फरांदे, सुनिल बढे, किशोर काळकर, अशोक कांडेलकर, उदय
वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक कारखान्याच्या व्हाईस चेअरमन ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव
जाधव, व्हा. चेअरमन ॲड. रोहिणीताई खडसे खेवलकर, मंदाताई खडसे, डॉ. प्रांजल खेवलकर सदस्यांसह उत्तर महाराष्ट्र परिसरातील शेतकरी बहुसंख्येने
उपस्थित होते.
0000000
मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले….
§
शेतक-यांना
5 लाख सोलरपंप उपलब्ध करुन देणार
§
नादुरुस्त
2700 रोहित्रे नव्याने बसविण्याची कार्यवाही सुरु
§
शेतीसाठी
सलग आठ तास वीज पुरवठा
§
अवैध
वीजजोडण्या रक्कम भरुन वैध करणार
§
हवामानाच्या
अचूक अंदाजासाठी मंडळस्तरावर 2065 हवामान यंत्रे
§
कापूस
उत्पादकांना बोनस देण्याचा सरकारचा विचार
§
केळीसाठी
स्वतंत्र धोरण,रेडियशन स्टोअर सेंटरच्या तंत्रज्ञानास अनुकूलता
§
उत्तर
महाराष्ट्रातील सिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध करुन देणार
§
मुक्ताईनगर
येथे शासकीय कृषि महाविद्यालय व तंत्रनिकेतन सुरु करण्याचा लवकरच निर्णय
§
मोठे
उद्योग आणण्यासाठी उद्योजकांशी चर्चा करणार
§
सुरत-नागपूर
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे लवकरच भूमिपूजन
0000000
No comments:
Post a Comment