Tuesday, 13 August 2013

19 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन



19 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय
महिला लोकशाही दिनाचे आयोजन

               जळगांव, दि. 13 :- समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी / अडचणी यांची शासकिय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येणार आहे.
             त्यानुषंगाने सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2013 रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात ठिक 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी संबंधीत समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सदर बाबींचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुसरा मजला, आकाशवाणीजवळ, जळगांव फोन 0257- 2228828 हे करीत आहेत.
* * * * * * *
वृत्त क्र  :-  542                                                                                       दिनांक  :- 13   ऑगस्ट 2013
अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम
अवयव व साधने वाटप शिबीराचे आयोजन

                  जळगांव, दि. 13 :- सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली महात्मा गांधी सेवा संघ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच मुंबई व जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 15, 16, व 17 ऑगस्ट 2013 रोजी जळगांव जिल्हयातील सर्व प्रवर्गातील गरजू अपंग बंधु भगिनींना आवश्यकतेनुसार लागणा-या कृत्रिम अवयव व साधने वाटप करण्यासाठी मोफत नांव नोंदणी व मोजमाप / तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
                  यासाठी लाभार्थ्यांनी येताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, / बीपीएल रेशनकार्ड, रहिवासी दाखला व अपंगत्व दिसेल असे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे  समाजकल्याण अधिकारी राकेश महाजन व प्रकल्प संचालक, समन्वयक यांनी केले आहे.
                    सदरील शिबीर दिनांक 15,16 व 17 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 10.30 ते 5.00 या वेळेत नेवे मंगल कार्यालय, बसस्टॅडजवळ यावल ता. यावल जि. जळगांव या ठिकाणी होणार आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी श्री. भरत चौधरी (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, समाजकल्याण विभाग) 09822961109 डॉ. साळुंखे 8275053244 व श्री. दत्तु कोळी 09561138916 व श्री. जितेंद्र दाभाडे 09881296833 येथे संपर्क साधावा.
                                                                    * * * * * *
                                                                                     
वृत्त क्र  :-  543                                                                                        दिनांक  :- 13   ऑगस्ट 2013

कृषी    पशुसंवर्धन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री
ना. संजय सावकारे यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम

              जळगांव, दि. 13  :- कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. संजय सावकारे यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
             बुधवार दिनांक  14 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7.00 वा.  महानगरी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वेस्थानक येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण संपूर्ण दिवस राखीव.
             गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7.30 भुसावळ येथुन शासकीय वाहनाने जळगांवकडे प्रयाण, सकाळी 9.05 वा. स्वातंत्र्य दिनाच्या 66 व्या वर्धापन दिन समारंभ निमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमास उपस्थिती स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव. सकाळी 10.00 वा. भुसावळकडे शासकीय वाहनाने प्रयाण, सकाळी 11.30 वा. बक्षीस वितरण समारंभ स्थळ - विठ्ठल मंदीर वॉर्ड, भुसावळ, सकाळी 1 ते 3 वा. रोटरी क्लब भुसावळ यांचे कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : हॉटेल तणारिका हॉल भुसावळ, दुपारी 3.00 वा. गुणगौरव समारंभ स्थळ : चितोडीया वाणी समाज हॉल, भुसावळ, दुपारी 4.00 वा. बाजरपेठ पो. स्टे. नवीन इमारतीचे उदघाटनास उपस्थिती.                                       

* * * * * * *
वृत्त क्र  :-  544                                                                                                                                  दिनांक  :- 13   ऑगस्ट 2013
वाघुर धरण पाटचा-यांचे कामासाठी
जळगांव तालुक्यातील गावांसाठी 15 ऑगस्टला
विशेष ग्रामसभांचे आयोजन

          जळगांव, दि. 13 :- वाघुर धरण अजिंठया लेण्यापासून उगम पावणा-या वाघुर नदीवर रायपूर गावाजवळ बांधलेले असुन, धरण शंभर टक्के पूर्ण झालेले आहे. वाघुर प्रकल्पासाठी धरणाच्या बुडीत क्षेत्रात 7 गांवे बाधीत होत असून त्यापैकी रायपूर हिंगणे, शिंगायत, खादगांव डोहोरी व चिंचखेडा ही 6 गांवे पूर्णपणे व हिवरखेडा गांव अशंत: पुर्नवसित होऊन त्यापैकी बहुतांशी सर्व नागरी सुविधांची कामे पूर्ण झालेली आहेत. जामनेर तालुक्यांतील खालील 17 गावांतील एकूण 4363 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे व त्या जमिनीवर पाणी साठा झालेला आहे.
            धरणास वेळोवेळी विरोध झाला होता परंतू प्रशासन व शेतकरी यांचेमध्ये वेळोवेळी चर्चा, बैठक होवून त्यांना धरणाचे महत्व पटवून देण्यात आले व धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे धरण पुर्णत्वास येवून त्यामध्ये पाणीसाठा झाला आहे.
         वाघुर धरणापासून वाघुर डावा कालवा 17 कि.मी. आहे व उजवा कालवा 23 कि.मी. चा आहे. सासाठी आतापर्यत 6 गावातील शेतक-यांची 170 हेक्टर जमिन संपादित केली आहे. या डाव्या कालव्यांचे 17 किमी भागातील काम पूर्ण झालेले आहे व सन 2011 साली सिंचनासाठी कालव्यातून दोन वेळा पाणी सोडले आहे.
         भादली वितरीकेचे 12 कि.मी. पर्यत कामे पूर्ण झालेली आहेत व त्यासाठी 54 हेक्टर जमिन संपादित केली आहे. असोदा शाखा कालवा वितरीकेसाठी 240 हेक्टर जमिन संपादित केली आहे. त्यामुळे असोदा गावापर्यत 2011 मध्ये दोन वेळा पाणी सोडलेले होते व यावर्षी धरणात दिनांक 12 ऑगस्ट 2013 रोजी 155 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला असून, पाणी साठयात सतत वाढ होत आहे व यापेक्षाही धरणात आणखी पाणीसाठा होणार आहे.
               धरणातील पाणी जळगांव शहराच्या पाणी पुरवठयासाठी व इतर वापरासाठी प्रकल्प अहवालानुसार 64 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षीत असून, उर्वरीत सर्व पाणी शेतीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे यावर्षी शेतीला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे व झालेल्या पाटचा-यांतूनही शेतक-यांचे मागणीनुसार पाणी सोडण्यात येणार आहे.
               वाघूर प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील असोदा शाखा कालवा व भादली शाखा कालव्याच्या गावांची जमीन अत्यंत सुपीक असून, 2  ते 3 मीटर खोली पर्यत काळी माती आहे. परंतू सिंचनाअभावी या भागातील सुमारे 11हजार 626 हेक्टर शेतजमीनीवर दुहंगामी अथवा बारमाही पिके घेता येत नाहीत.
               वाघुर प्रकल्पामुळे सदर असोदा व भादली शाखा कालव्यावरील सर्व सिंचन योग्य जमिनीला होणारे सिंचनाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
             वाघूर धरणाचे पाणी पाटचा-यांमधुन सोडल्यानंतर त्या भागातील जमिनींमध्ये पाणी मुरेल व त्याव्दारे भुजल पातळी उंचावेल., मागील वर्षी  कमी पावसामुळे भुजल पातळी सुमारे 2 मीटरने खाली गेली आहे. वाघूरचे पाणी न घेतल्यास व शेतक-यांनी टयुबवेलने सतत उपसा सुरु ठेवल्यास भुजलपातळी आणखी खाली जाईल, शेतक-यांनी कालव्याव्दारे पाणी घेतल्यानंतर शेतक-यांना कोणतीही पिके लावण्याची मूभा आहे. व प्रवाही पध्दतीने पाणी पुरवठयाचा दर ही अत्यल्प असून, ते टयुबवेलने पाणी घेण्याच्या खर्चापेक्षा खूपच कमी आहे. उदा : भुईमुग या पिकासाठी प्रति हेक्टरी 350 रुपये इतका दर आहे व उन्हाळी बारमाही पिकांसाठी 3 हजार 140 रुपये इतका दर आहे. हा शेतक-यांना हेक्टरी येणा-या वीज बिलापेक्षा कमी आहे, जमिनीतून जो पाण्याचा उपसा केला जातो त्यामध्ये क्षारांचे प्रमाण हे जास्त असते. असोदा व भादली परिसरातील पाणी हे काही प्रमाणामध्ये खारवट असून, ते पाणी सातत्याने उपसा केल्याने व जमिनीवर दिल्याने अनेक जमिनीस मीठासारखा थर काही भागांमध्ये दिसून येत आहे. हे क्षार जमिनीवर असाच राहिल्यास जमिनीची उत्पादनक्षमता कमी होईल व भविष्यामध्ये जमीनी नापिक होण्याचा धोका वाढेल. त्याउलट प्रवाही पध्दतीने कालव्यांचे पाणी घेतल्यानंतर ते पाणी जमिनीवर सोडल्यानंतर असे क्षार वाहून जाण्यास मदत होते. व जमिनीची उत्पादन क्षमता टिकून राहते., कालव्याव्दारे पाणी घेतल्यानंतर  शेतकरी धरणातील पाण्याचा अंदाज बांधेल व धरणाच्या पाण्यावर नगदी पिकांच्या लागवडीकडे  त्याचा कल राहिल. त्याचप्रमाणे त्यांचा  उत्पादनामध्ये भरीववाढ होवून शेतकरी सधन होईल. याबाबत पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांनी केलेली शेतीतील क्रांती हे उदाहरण पाहता येईल. कालव्यांचे पाणी न घेता टयुबवेलच्या पाण्याने शेतकरी पारंपारिक पिके उदा: ज्वारी, मका, उडीद इत्यादी पिके सतत लावत आहे. व त्या पिकांच्या बीयांण्याचा खर्च, लावणीचा खर्च, मशागतीचा खर्च, पिके काढण्याचा खर्च व विक्रीचा विचार करता शेतक-यांच्या हातामध्ये हेक्टरी फार कमी उत्पन्न मिळण्याचे जास्त चित्र आहे. याउलट कालव्यांव्दारे पाणी घेतल्यानंतर शेतक-यांना ऊस, कापूस, भाजी - पाला, फळे - फुले इत्यादी सारखी आधुनिक पध्दतीने शेती करता येईल व शेतक-यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होऊन तो अधिक सधन होईल.
              वरील कामासाठी जळगांव तालुक्यातील 32 गावातील खाली नमूद केल्याप्रमाणे जमीन संपादीत करावी लागणार आहे व त्यानंतर कालव्याची कामे पूर्ण करणे शक्य होईल. त्यामुळे सुमारे 8 हजार 717 खातेदारांच्या 11 हजार 626 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.
              वाघुर प्रकल्प / वाघुर डावा तट कालव्याचे लाभक्षेत्रातील गांवे - नशिराबाद, जळगांव खुर्द, कडगांव, शेळगांव, कानसवाडे, सुजदे, नांद्रे खुर्द, खापरखेडा, धामणगांव, तुरखेडा, आवार, विदगांव, डिकसाई, रिधुर, धारर्डी, आमोदे खुर्द, धानोरा खुर्द, करंज, सावखेडा खुर्द, किनोद, भादली खुर्द, भोकर, कठोरा, पळसोद, जामोद, आमोदा बु. गाढोदे, देवगांव, फुपणी, पिलखेडा, फेसर्डी, नंदगांव.
                 दिनांक 15 ऑगस्ट 2013 रोजी जळगांव तालुक्यासाठी गावांमध्ये विशेष ग्रामसभेचे नियोजन करण्यात आलेले आहे. या ग्रामसभेसाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी, कृषी विभागचे अधिकारी शेतक-यांच्या समस्या जाणून घेवून त्यांचे प्रश्नांना उत्तरे देतील व धरणाचे शेतीसाठी पाण्याचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत.
                 तरी शेतकरी बांधवांना या निवेदनाव्दारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी वाघुर प्रकल्पाचे पाटचा-यांस सर्व सहमतीने निर्णय घ्यावा. असे आवाहन कार्यकारी अभियंता वाघुर धरण विभाग, जळगांव यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * *

No comments:

Post a Comment