Thursday, 1 August 2013

कृषि पिक विमा योजनेस दि. 16 ऑगस्ट 2013 पर्यत मुदतवाढ



         जळगांव, दि. 1 :- राष्ट्रीय कृषि विमा योजनेत खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविण्यासाठी 31 जुलै 2013 ही अंतिम तारीख होती. गतवर्षी राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी जवळपास रु. 65 कोटी विमा हप्ता भरला होता. या विमा हप्त्यामुळे राज्यातील शेतक-यांना खरीप 2012 हंगामासाठी रु. 201.43 कोटीची उच्चांकी नुकसान भरपाई मिळाली. कृषि क्षेत्र हे सातत्याने पावसाचा अनियमितपणा, अतिवृष्टी , अवर्षण, किड व रोगांचा प्रादुर्भाव यासारख्या विविध आपत्तींना सामोरे जात असल्याने शेतक-यांना आर्थिक संरक्षण मिळावे या हेतूने राष्ट्रीय कृषि विमा योजना ही अत्यंत महत्वपूर्ण योजना असून रब्बी 1999 -2000 पासून खरीप 2012 हंगाम अखेर शेतक-यांना रु. 2261.50 कोटी ची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. चालू वर्षी चांगले पाऊसमान असले तरी यापुढील हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या उत्पादनात येणा-या घटीमुळे होणा-या आर्थिक नुकसानीपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी पिक विमा योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. राज्यात काही ठिकाणी सतत असणा-या पावसामुळे वेळेत पेरणी शक्य होऊ शकली नाही . अशा भागातील शेतक-यांनी विमा योजनेत सहभागी होता यावे यावे या हेतूने या योजनेत भाग घेण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री (कृषि व पणन) यांनी विशेष प्रयत्न केले म्हणून केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून विमा योजने भाग घेण्याची मुदत वाढवून दिनांक 16 ऑगस्ट 2013 अशी करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषि व पणन मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
         असा घ्या सहभाग -जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखा, राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा व विविध कार्यकारी सोसायटयांमार्फत शेतक-यांना पिकांचा विमा उतरविता येईल. यासाठी दि. 16 ऑगस्ट 2013 पर्यत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत पिकांची नोंद असलेला 7/12/ उतारा व 8 अ चा उतारा जोडणे आवश्क आहे.                                                                       
              शेतक-यांना सदर योजनेत सहभागी होण्यासाठी असलेली मुदत खालील अटींच्या अधिन राहून वाढविण्यात आली आहे.
            सदरील मुदतवाढ दि. 1 ते 16 ऑगस्ट 2013 या दरम्यान पेरणी झालेल्या क्षेत्रासच लागू आहे. दि. 1 ते 16 ऑगस्ट 2013 या वाढीव कालावधीत पेरणी झालेल्या क्षेत्रास सर्वसाधारण विमा संरक्षण मर्यादेपर्यत म्हणजेच उंबरठा उत्पन्न पातळीपर्यतच विमा संरक्षण देय राहील ( वाढीव विमा संरक्षण देय राहणार नाही) शेतक-यांच्या पीक विमा प्रस्तावावर पीक पेरणीचा दिनांक नमूद केलेला असणे बंधनकारक आहे. तसे स्पष्टपणे नमूद केलेले प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. उडीद, तीळ, सुर्यफुल, भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग इत्यादी पिके
             योजनेच्या प्रमुख बाबी खालीलप्रमाणे आहेत
             विमा पात्र शेतकरी : कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे इत्यादी सर्व शेतकरी,
             विमा संरक्षीत बाबी : दुषकाळ, पूर, वादळ, अतिवृष्टी, किड, रोगराई इत्यादी नैसर्गिक आपत्तीपासून अधिसूचित क्षेत्र पातळीवर विमा संरक्षण अधिसूचित क्षेत्रात उंबरठा (हमी) उत्पादनापेक्षा चालू हंगामाचे उत्पादन कमी नोंदले गेल्यास नुकसान भरपाई रक्कम आपोआप शेतक-यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
           विमा हप्ता व अनुदान : मर्यादित विमा हप्ता दर शेतक-यांना भरावयाचा असून राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांना विमा हप्त्यात 10 टक्के अनुदान असून विदर्भ पॅकेजमधील सहा जिल्हयात अल्प व अत्यल्प भूधारकांना विमा हप्त्यात 50 टक्के अनुदान आहे.
            सहभाग प्रक्रिया : पिक कर्ज घेणा-या शेतक-यांनी अंतिम मुदतीपूर्वी त्यांच्या पिकांचा विमा केल्याची बॅकेत खात्री करावी / करावयास सांगावे, विमा हप्ता रक्कम ही कर्जाबरोबर अतिरिक्त मंजूर केली जाईल. बिगर कर्जदार शेतक-यांनी विमा प्रस्ताव पत्रक भरुन रोख विमा हप्त्यासह अंतिम मुदतीपूर्वी जवळच्या बॅक शाखेत जमा करावे. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या तसेच बॅकेच्या नजिकच्या शाखेशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment