पाणीपुरवठ्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दिनांक 8 जुलै, 2024 : केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन आणि हर घर जल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला पाणी पुरवठ्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना व्यक्त केला.
सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी पालघर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राम शिंदे, गोपीचंद पडळकर, सत्यजित तांबे आदींनी सहभाग घेतला.
मंत्री श्री.पाटील म्हणाले की, पालघर जिल्ह्यात 4 लाख 45 हजार 697 कुटुंब संख्या असून सुमारे 85 टक्के नळ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत 562 पाणीपुरवठा योजना व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 26 अशा एकूण 588 योजना घेण्यात आल्या आहेत. यापैकी 92 योजनांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत जेथे योजना पूर्ण झाल्या आहेत त्या गावांमध्ये यावर्षी टँकर सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड व वाडा तालुका भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम क्षेत्रात वसलेला असून भूपृष्ठ खडकाळ असल्याने काही भागातील पाणी धारण क्षमता अत्यंत अल्प असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून भूजल पातळी खाली जाते. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे टंचाईची समस्या निर्माण झाली असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले. जल जीवन मिशनच्या कामांबाबत जिल्हानिहाय आढावा बैठक घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment