नव मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा !
: प्रातांधिकारी शरद पवार
चाळीसगांव,दिनांक 25:- लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत निर्भय, मुक्त
व पारदर्शक वातावरणात पार पडणा-या निवडणुका आणि मतदारांचे मत या दोन्ही गोष्टींना
अनन्य साधारण महत्व आहे. एकीकडे आपल्या
आवडीचा सक्षम नेता निवडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमातून मतदारांना मिळत असतांना
दुसरीकडे सशक्त लोकशाहीची पायाभरणी होत असते. आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यांची
एक चांगली गुंतवणूक देखील मानली जाते. त्यामुळे मतदार असल्याचा अभिमान बाळगून प्रत्येक
मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत आपला सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन उप विभागीय
अधिकारी शरद पवार यांनी तहसिल कार्यालयातील सभागृहात आयोजित राष्ट्रीय मतदार
दिनाच्या कार्यक्रमात केले.
यावेळी तहसिलदार कैलास देवरे, पोलीस
निरीक्षक आदिनाथ बुधवंत, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, विशाल सोनवणे, गजानन भालेराव,
जे.आर.वाघ, गट विकास अधिकारी ए.बी.राणे, अव्वल कारकुन डी.जे.राजपुत, अमृतकार
यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले
मत हा आपला हक्क व अधिकार आहे. या बाबतीत जागरूक राहून मतदारांनी निर्भयपणे
मतदानासाठी बाहेर पडावे. मतदानाचा मुलभूत अधिकार बजवावा आणि मतदानाला न जाण्याची
आणि मतदान न करण्याची उदासिनता मनातून काढून टाकावी, सशक्त लोकशाहीचा पाया अधिक
मजबूत करावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार
दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले असून त्याचे सातवे वर्ष आज साजरा करतांना
मनस्वी आनंद होत आहे. या दिवसाचे महत्व व आपला मौल्यवान मताधिकार ओळखून निवडणूक
प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले.
सातव्या राष्ट्रीय
मतदार दिनानिमित्त 25 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11:00 वाजता तहसिल कार्यालयातील
सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून मतदार नोंदणी आणि मतदान
जनजागृतीसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेतील.
यावेळी
तहसिलदार कैलास देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन करत उपस्थित मतदार
व नवमतदारांना निवडणूकांचे पावित्र्य व निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. उप विभागीय
अधिकारी शरद पवार यांच्या हस्ते प्रातिनीधीक स्वरुपात दहा नवमतदारांना मतदान ओळख
पत्राचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत मतदार
जनजागृतीसाठी शहरातील तात्यासाहेब सामंत महाविद्यालय ते तहसिल कार्यालय अशी शालेय
विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सचिन परदेशी
यांच्या मार्गदर्शनाखाली ए.बी.हायस्कुल मध्ये शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले यामध्ये तालुक्यातील 26 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment