Monday, 16 January 2017

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा: प्रातांधिकारी शरद पवार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा
: प्रातांधिकारी शरद पवार
चाळीसगांव, दिनांक 16 :-  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पडण्यासह सर्व यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश शरद पवार, उप विभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक-2017 यांनी दिले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार कैलास देवरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, गट विकास अधिकारी अे.बी.राणे, पोलीस निरिक्षक (शहर) आदिनाथ बुधवंत, पोलीस निरिक्षक (ग्रामीण) एस.पी.गायकवाड, सहा.पोलीस निरिक्षक (मेहुणबारे) डि.के.शिरसाठ, उप अधिक्षक भुमी अभिलेख बी.सी.अहिरे, नायब तहसिलदार (निवडणुक) विजय सुर्यवंशी, नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांच्यासह तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला  आहे. याबरोबरच तक्रार निवारणकक्ष, व्हिडीओ ग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेक पोस्ट पथक तात्काळ सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. 
या निवडणूका मुक्त, निर्भय, शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडाव्यात यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आप-आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशी सूचना करुन उप विभागीय अधिकारी श्री.पवार म्हणाले, आचारसंहिता कालावधीमध्ये निवडणूकीच्या क्षेत्रात घडणाऱ्या महत्वाच्या घटना, मिरवणूका, प्रचार फेऱ्या, सभा अथवा आचारसंहितेचा भंग होईल अशा घटनांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे. भरारी पथक स्थापन करुन रोख रकमेसह मद्याची अवैध मार्गाने वाहतूक, मतदारांना प्रलोभन ठरतील अशा व अन्य संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी यावेळी नामनिर्देशनपत्र व शपथपत्र ऑनलाईन भरण्यात येणार असून या फॉर्मची प्रत स्वाक्षरी करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित वेळेत व विहित पध्दतीने दाखल करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशन पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदत कक्षांची स्थापना देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995 व मा.राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणे यावर बंदी घालण्यात आली असून अशी वर्तणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही सर्व संबंधितांना यावेळी देण्यात आल्या.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment