Friday, 6 January 2017

समाज व्यवस्था सुदृढ करण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे : प्रातांधिकारी शरद पवार


समाज व्यवस्था सुदृढ करण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे
: प्रातांधिकारी शरद पवार
चाळीसगांव, दिनांक 6 :-   मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिनम्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत समाज व्यवस्था सुदृढ करण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे असे आवाहन चाळीसगावचे उप विभागीय अधिकारी शरद पवार यांनी आज केले.
चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळ तसेच उप माहिती कार्यालय, चाळीसगांव यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेट बँकेच्या इमारतीमधील रिलायन्स हॉल येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, तहसिलदार कैलास देवरे, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, सहाय्यक निरीक्षक (वाहतुक) सुरेश शिरसाठ, जेष्ठ पत्रकार बी.एस.पाटील, किसनराव जोर्वेकर, बी.ए.पाटील, रविंद्र अमृतकार, संजय सोनार, आनंद खरात, प्र.माहिती सहाय्यक मनोहर पाटील, तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, एम.बी.पाटील, जिजाबराव वाघ यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रातांधिकारी श्री.पवार म्हणाले, सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमांव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला असून पत्रकारीतेला दिलेल्या स्वातंत्र्यानंतर आपले नैतिक मुल्ये जोपासून समाजहितासाठी प्रत्येक पत्रकाराने जागरूक राहणे ही काळाची गरज आहे. सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्याबरोबरच वैचारिक चळवळ उभारून समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी हेच आपले जीवनकार्य मानले तर समाज व्यवस्था सुदृढ होण्यास वेळ लागणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर प्रसिध्दी माध्यमांचेही मोठे योगदान लाभत असल्याचे यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर आपल्या मनोगतात म्हणाले.
यावेळी बोलतांना तहसिलदार श्री.देवरे म्हणाले, प्रसिध्दी माध्यमातील प्रत्येक व्यक्ती हा शब्दाने श्रीमंत असून त्यांनी आपल्या शब्द श्रीमंतीचा उपयोग समाजातील उपेक्षीत घटकांसाठी करावा. यामुळे शासनाच्या योजनांपासून कुठलाही घटक उपेक्षीत राहणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी चाळीसगांव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळातर्फे तालुक्यातील जेष्ठ पत्रकार बी.एस.पाटील, किसनराव जोर्वेकर, बी.ए.पाटील, रविंद्र अमृतकार, संजय सोनार, आनंद खरात यांच्यासोबत प्रभारी माहिती सहाय्यक मनोहर पाटील यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर सत्कारार्थींच्या वतीने जेष्ठ पत्रकार बी.एस.पाटील व किसनराव जोर्वेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत  उपस्थिती पत्रकारांना पत्रकारांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करुन दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी यांनी पत्रकारांना संघटीत करुन पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिजाबराव वाघ यांनी त्यांच्या काव्यात्मक शैलीतुन केले तर आभार सचिव एम.बी.पाटील यांनी मानले.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment