Tuesday, 24 January 2017

ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी कार्यशाळा संपन्न तहसिलदार कैलास देवरे यांनी उपस्थितांना केले मार्गदर्शन


ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी कार्यशाळा संपन्न
तहसिलदार कैलास देवरे यांनी उपस्थितांना केले मार्गदर्शन

            चाळीसगांव, दिनांक 24 :-  जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2017 साठी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यापुर्वी स्वत:च्या नावाची नोंदणी करुन लॉग-इन व पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. अर्ज भरतांना काही चुका होऊ नयेत, उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरु नयेत,  ऑनलाईन अर्ज कसा भरावा यासाठी आज तहसिल कार्यालयात ऑनलाईन नामनिर्देशन भरण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करतांना तहसिलदार कैलास देवरे बोलत होते.
            यावेळी निवडणूक नायब तहसिलदार विजय सुर्यवंशी, अवल कारकून डी.जे.राजपूत, अमृतकार यांच्यासह विविध पक्षाचे उमेदवार, संग्राम कक्ष, ई-सेवा केंद्र, मदत कक्षातील संगणक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 साठी वेबपेज पुढील सर्व प्रक्रियेसाठी वापरावयाचे असून यामध्ये निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली स्वत:ची नोंदणी करुन नामनिर्देशन भरतांना कुठलाही रकाना रिकामा ठेवू नये. ज्या पर्यायाचे उत्तर नसेल त्या ठिकाणी रेष ओढावी, मात्र ती जागा रिक्त ठेवू नये. अन्यथा अर्ज बाद होईल अशा सूचना चाळीसगांव तालुक्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार कैलास देवरे यांनी आज दिल्या.
            सर्वोच्च न्यायालयाच्या 2002 च्या निर्णयानुसार मतदारांना मतदानाचे कर्तव्य बजावण्याआधी उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभुमी, संपत्ती व शैक्षणिक अर्हतेबाबत माहिती मिळण्याचा त्यांना हक्क आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवाराला नामनिर्देशनासोबत प्रतिज्ञापत्र दाखल करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ऑनलाईन नामनिर्देशनासाठी असलेल्या चार टप्प्यांपैकी, पहिले तीन टप्पे हे संगणकीय प्रणालीचे असून चौथा टप्पा हा उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र/घोषणापत्राचा आहे.
            नामनिर्देशनपत्र नोंदविण्यासाठी आधार क्रमांकाची जागा दर्शविली आहे. त्या ठिकाणी आधार क्रमांक भरावा, तथापि आधार क्रमांक एच्छिक आहे, तो न दिल्यास नामनिर्देशपत्र फेटाळले जाणार नाही. नामनिर्देशपत्रावर आपणास ज्या पध्दतीने नाव आवश्यक आहे त्या पध्दतीने स्वत:चे नाव, वडीलांचे/पतीचे नांव, आडनाव भरा. माहिती भरतांना आडनावाच्या जागी आडनाव व स्वत:च्या नावाच्या ठिकाणी स्वत:चे नाव येईल याची खात्री करा. आपल्या नावाचे मराठीकरण संगणकाव्दारे केले जाईल. नावाची अक्षरे योग्य नसल्यास आलेल्या पर्यायांमध्ये सिलेक्ट करुन योग्य नावाची खात्री करा. अर्ज भरतांना लिंग, जन्म तारीख, व्यवसाय, पिनकोडसह पत्ता भरा. आपले वय जन्म तारखेनुसार संगणकाने अचूक दर्शविले आहे, याची खातरजमा करा. नसल्यास योग्य जन्म तारीख पुन्हा भरून खात्री करा. यासारख्या विविध सुचना देऊन उपस्थितांच्या शंकाचे निरसनही या कार्यशाळेत करण्यात आले.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment