स्मरणशक्तीला सलाम
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी
महोत्सवाचा सांगता समारोप राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख
उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे.
त्यानिमित्ताने विशेष लेख. . .
|
यशवंतराव
चव्हाण साहेबांची भाषणे ते मुख्यमंत्री झाल्यापासून मी ऐकत आलो आहे. साहेब हे
शब्दांचे जादुगार होते. त्यांची भाषणे मी आवाजांच्या चढउतारासह व लकबींसह
तल्लीनतेने ऐकत असे. ज्या ज्या वेळी मित्रमंडळी जमत त्या त्या वेळी मी त्यांच्या
हावभावांची नक्कल करून दाखवी. यामुळे कार्यकर्ते मित्रही खूष अन मलाही प्रसिध्दी
मिळे. मनात अनेक वेळा येत असे, या शब्दसम्राटाबरोबर आपली व्यक्तिगत ओळख झाली तर
काय मजा येईल. हा शब्दांचा जादूगार खासगी मैफलीत कसा बोलत असेल, असे औत्सुक्य व
त्या मैफलीत आपल्याला प्रवेश मिळावा अशी इच्छा मी अनेक वर्ष बाळगून होतो. हळूहळू
जाणे वाढू लागले. बरोबर अनेक लोक असत त्यामुळे साचेबध्द बोलणे होई. मनातील ही
सुप्त इच्छा मात्र शांत बसू देत नव्हती.
चांगली
गोष्ट घडण्यासाठी नेहमी वेळ लागतो पण ती अतिशय थेट असते यावर माझा विश्वास होता.
त्यामुळे माझी ही इच्छा पूर्ण होणार याची खात्री होती. अन एक दिवस ही संधी आयतीच
चालून आली. दिल्लीतील माझी कामे आटोपून परत निघण्यापूर्वी साहेबांना भेटण्यासाठी
गेलो. दोन मिनिटे भेटण्यासाठी वेळ मिळाला होता. मी बैठकीच्या खोलीत उभा राहिलो.
बोलायची संधी मिळाली होती पण काय बोलावे हे सुचेना. बसा विनायकराव या त्यांच्या
वाक्याने बसलो. नेहमीप्रमाणे जिल्ह्यात
कोणाचे काय सुरू आहे, याबाबत विचारणा होईल अन पाचव्या मिनिटात आपली रवानगी होईल
असा विचार मनात सुरू होताच; पण त्याचवेळी साहेब काय प्रश्न विचारताहेत याची वाट
पहात होतो. साहेबांनी थेट विचारले "हं काय त्या अमुक माणसाची तुम्ही चांगली
नक्कल करता हे ऐकलय मी !" या प्रश्नाने माझी मात्र भंबेरी उडाली. कारण मी त्यावेळच्या एका महाराष्ट्राच्या
मंत्रीमंडळातील एका मंत्र्याच्या भाषणातील
चुका व त्यात माझी भर टाकून नक्कल करीत
असे. माझे हे प्रयोग स्थळकाळाचे बंधन झुगारून मुक्तपणे चालले होते. माझ्या या
प्रयोगांबाबत शरद पवारांनी त्यांना माहिती दिली हे कळायला वेळ लागला नाही कारण
सर्वात जास्त या प्रयोगांचे ते साक्षीदार होते. आता जरा जपून बोलण्याचा सल्ला
मिळणार याची वाटत पहात असतांनाच "साहेबांनी बघू या तुमचे प्रयोग! म्हणून
अनपेक्षित धक्का दिला". प्रथम या
धक्क्यातून सावरलो अन घाम पुसला. सगळा उत्साह परत आणला उभा राहिलो. प्रयोगास
सुरूवात केली. पहिल्या दोनतीन वाक्यातच साहेब खळाळून हसले. टोपी बाजूला काढून
लक्षपूर्वक ऐकू लागले अन अगदी मुक्तपणाने हसत होते. अक्षरश: हसता हसता त्यांच्या
डोळ्यात पाणी आले. वीस पंचवीस मिनिटे कशी गेली ते कळलेच नाही. अशाप्रकारे माझी
इच्छा पूर्ण झाली होती. पहिल्याच बैठकीत औपचारिकतेची बंधने गळून पडली होती. मी खूप आनंदी होतोच शिवाय दिल्लीत आलात की भेटत
जा हे आमंत्रण होतेच. मीही जेव्हा संधी मिळेल तेव्हा भेटत होतो. मनमोकळेपणाने संवाद
साधत होतो. अगदी शेरोशायरी, गझलांची देवाण घेवाण, प्रवासातील अनुभव, व्यक्तिचित्रे
व किस्से एकमेकांना सांगत होतो. त्यांची विलक्षण स्मरणशक्ती, शब्दांचे वेड व
संभाषण चातुर्य प्रत्येक भेटीत जाणवत होते.
यशवंतराव
चव्हाण साहेब हे अतिशय रसिक मनोवृत्तीचे होते. नवीन चांगले पुस्तक असो वा चांगला
चित्रपट ते आर्वजून पहात असत. देशाचे संरक्षणमंत्री असणारा माणूस चित्रपटगृहात
जावून चित्रपट पहाणे हे अतिशय दुर्मिळ. सुरक्षा आणि लोक
यामुळे अनेकदा इच्छा
असूनही ते शक्य नसते. पण एकदा मी आणि चव्हाण
साहेब माधवराव आपटे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा माधवरावांनी रिगल चित्रपटगृहात
सुरू असलेल्या एका इंग्रजी चित्रपटाचा उल्लेख केला आणि तो साहेबांनी आर्वजून पहावा
असेही सुचविले. मुळातच रसिक असलेले साहेब ही संधी कशी दवडणार. त्या दिवशी ते जरा
निवांतही होते. त्यांनी कुणालाही न सांगता आमच्या दोघांसाठी तिकीट
मागविले तीन ते सहाच्या खेळाचे. मला पावणेतीनला सांगितले विनायकराव आपण एका खास
मोहिमेवर जातो आहोत. सुरक्षा अधिकारी वा अन्य कुणालाही न सांगता चित्रपट सुरू
झाल्यानंतर अंधारात आम्ही चित्रपटगृहात जावून बसलो . आपल्याला कुणीही ओळखू नये
यासाठी साहेब टोपी काढून बसले होते. आम्ही दोघांनी त्या चित्रपटाचा आनंद घेतला.
चित्रपट संपल्यावर लोकांच्या लक्षात आले की साहेब आहेत मग लोकांची गर्दी झाली पण
चांगल्या कलाकृतीचा आस्वाद घेतलाच पाहिजे मग त्यासाठी ते आर्वजून वेळ राखून
ठेवायचे. हा साहेबांचा मूळ स्वभाव होता.
ते
कलावंतांना आणि साहित्यिकांना नेहमी प्रोत्साहन देत. मला 1 जानेवारी 1977 चा तो
दिवस आजही आठवतो. साहेब संरक्षणमंत्री
झाल्यानंतर त्यांनी मराठी तरूणांनी सैन्यात जावे असे आवाहन केले होते. त्यासाठी
आम्ही गावोगावी जावून मेळावे घेतले होते अन तरूणांना आवाहन केले होते. त्यानुसार
नांर्दुडी गावचा कुंभार्डे नावाचा तरूण सैन्यात दाखल झाला होता. चीन युध्दात तो कामी आला. त्याच्या स्मरणार्थ
त्या गावाच्या लोकांनी वाचनालय सुरू केले. हा अतिशय छोटा कार्यक्रम होता तरीही
साहेब या वाचनालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांच्या जेवणाचा कार्यक्रम आमच्या
घरी होता. जेवण आणि कार्यक्रम यांमध्ये बराच वेळ होता. तेव्हा ना. धों. महानोर ही
तेथे उपस्थित होते. मधल्या वेळात काय करायचे हा विचार माझ्या मनात सुरू होता. साहेबांनी
आराम करावा असे मी सुचविणार होतो तेवढ्यात साहेबांनी महानोरांना "नामदेवराव,
तुमच्या कविता ऐकवा! अशी फर्माइश केली. मग आमच्या हॉलचे रुपांतर काव्य संमेलनात
झाले. त्यांच्या कवितांना साहेब अतिशय उत्स्फुर्तपणे दाद देत होते. साहेब
कलावंतांचा नेहमी सन्मान करत असत. हे करणे केवळ साहेबांनाच शक्य होते, कारण
त्यांच्या वागण्यात कृत्रिमता नव्हती सर्व कसं साध सरळ होते.त्यांना माणसं
मनापासून आवडत व ही माणसं करीत असलेल्या कामावर त्यांची नितांत श्रध्दा होती.
ते
चांगल्या साहित्यकृतींना केवळ दादच देत
नसत पण त्या लेखनामागे काय कारण असेल याची
कारणमीमांसा करत. उपराकार लक्ष्मण माने यांच्या 'उपरा' या पुस्तकात एक
वाक्य आहे 'ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर
वाटतं की जावून पार्लमेंटवर बॉम्ब टाकावा' तेव्हा साहेब म्हणाले माझ्या गावच्या
एका मुलाला मी ज्या पार्लमेंटचा सदस्य आहे त्या पार्लमेंटवर समाजव्यवस्थेमुळे
बॉम्ब टाकावासा वाटतो तेव्हा या मुलांच्या भावना समजावून घेतल्या पाहिजे. अन
त्यानुसार समाजव्यवस्थेत बदल केले पाहिजे असे मला वाटते. ते गप्पा मारतांना अनेकदा असे पुस्तकांचे दाखले
देत आणि त्यासाठी काय करायला हवे याचीही चर्चा करीत असत. त्यांच्या खूप कविता
तोंडपाठ होत्या. एकदा आमच्या गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. बालपण आणि शालेय जीवनातील आठवणी सांगत असतांना साहेबांनी झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी
पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जावू या हे गाणं गाता गाता साहेब एकदम मामा माझा
तालेवार रेशीम घेईल हजारवार या ओळीवर येवून थांबले. मी विचारले काय झाले ते
म्हणाले "विनायकराव, हे गाणे माझं गाणं आहे." या गाण्याचं व्यक्तिगत
आयुष्यात खूप महत्व आहे. लहानपणी बिकट
आर्थिक परिस्थितीमुळे मामाच्या गावाला रहावे लागले होते मग मामांनी केलेली मदत आणि
बालपणीच्या आठवणींना साहेबांनी उजाळा दिला होता.
साहेबांची
स्मरणशक्ती अतिशय तल्ल्ख आहे याची प्रचिती मला एका प्रसंगाने आली. ते मुंबईला आले
आहेत असे समजल्याने मी भेटण्यास गेलो.ते बाहेर पडण्याच्या विचारात होते. मी
नमस्कार करून बाजूला उभा राहिलो. त्यांनी चला म्हटल्यावर
गाडीत बसलो. नंतर
समजले की पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे कार्यक्रमास निघाले होते. हक्काचे तीन तास
गप्पांसाठी मिळाले. प्रवासात अमीर खुश्रू यांची कविता तर काही शेर सांगितले.
तळेगावला पोहचल्यावर सभा सुरू झाली. भाषणात एक संदर्भ देतांना त्यांनी अमीर खुश्रूंच्या
काव्यपंक्ती जशाच्या तशा म्हणून दाखविल्या.एकदा सहज ऐकल्यानंतर या काव्यपंक्ती
लक्षात ठेवणाऱ्या त्यांच्या स्मरणशक्तीला मी मनातल्या मनात सलाम केला.
साहेबांचा
व माझा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. मी त्यांच्या नातवासारखा असल्याने त्यांना
काहीही विचारण्याचे मला स्वातंत्र्य होते.
जे प्रश्न पत्रकार विचारू शकत नाही ते प्रश्न मी त्यांना विचारण्याचे ठरविले.
त्यानुसार मी बत्तीस प्रश्न विचारायचे ठरविले. बत्तीस प्रश्न विचारण्यामागे मुळ
प्रेरणा होती सिंहासन बत्तीशीची. साहेबांनी ही त्याला परवानगी दिली होती.
वेगवेगळया निमित्ताने हे प्रश्न विचारण्याचे ठरविले. असेच एकदा आम्ही त्यांच्या
दिल्लीतील घरी गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात त्यांचे स्वीय सहायक डोंगरे यांनी
साहेबांना सांगितले कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री देवराज अरस यांचे निधन झाले.
तेव्हा पटकन उत्तरले 'अरेरे ,वाईट झाले'. अन मूळ विषयाकडे वळले. तेव्हा मी त्यांना
मृत्यूविषयी त्यांना काय वाटते असे विचारले. त्यांनी ते जीवनाचे वास्तव आहे असे
सांगितले. मृत्युशी माझी पहिल्यांदा ओळख
माझ्या वडीलांच्या मृत्युने झाली. तेव्हा
त्याची दाहकता जाणवत होती पण वाढत्या वयाबरोबर याबाबतचा दृष्टीकोन त्रयस्थ होत
गेला. पण काही मृत्यु जीवाला चटका लावणारे असतात. माझा सहकारी किसन वीर याचा
मृत्यु असाच मला चटका लावणारा होता. तेव्हा खूप काही गमावल्याची जाणीव झाली अन मी
ओक्साबोक्शी रडलो ही अगदी वैयक्तिक बाबही साहेबांनी मला सांगितली होती.
असेच
एकदा मी त्यांना वेणुताई आणि साहेबांच्या नातेसंबंधाविषयी छेडले. तेव्हा एक made
for each other अशी स्लोगन असलेली जाहिरात होती. मी त्यांना तुम्ही made for each
other वाटतात असे म्हटले तेव्हा साहेबांनी त्याला दुजोरा दिला आणि एक अनुभवही
सांगितला. मी गृहमंत्री असतांना संसदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. तेव्हाच
बातमी आली की कऱ्हाडमध्ये जातीय दंगल उसळली होती. तो तास संपवून घरी आलो अन वेणूताईंना विचारले बातमी ऐकली का त्यावर
त्या उत्तरल्या "हो बातमी ऐकली आणि तुमची बॅग भरून तयार आहे".
अशाप्रकारे आम्हाला एकमेकांना काय हवे आहे याची चांगली जाणीव आहे.अनेकदा काहीही न
बोलता मनातले भाव आम्ही ओळखतो. विनायकराव
तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही खरोखरच made for each other आहोत.
या
प्रश्नांना साहेबांकडून मिळणारा प्रतिसाद माझा उत्साह वाढविणारा होता. तेव्हा अशाच
एका गप्पांमध्ये मी त्यांना भाषेविषयी विचारले. तुमचे काही सातारी आघात सोडले तर
भाषा पुणेरी आहे पण बाकी सर्वांची भाषा टिपीकल सातारी आहे याचे कारण काय, असं
विचारलं; यावर त्यांनी केवळ एकाच शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले "मातृभाषा."
साहेब
एकदम स्पष्टवक्ते पण मनमिळावू होते.ते समोरच्या माणसाचा अहंकार न दुखवता एखादी
गोष्ट अतिशय समर्पक शब्दात समजावून सांगत. बोलतांना व ऐकतांना त्यांचा चेहरा अतिशय
बोलका असे. आपण उच्चारलेल्या प्रत्येक
वाक्यागणिक त्यांच्या चेहऱ्यावर सहमत असल्याच्या, नसल्याच्या रागाच्या, आनंदाच्या,
मिश्किलपणाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असत. असेच एकदा मी माझ्या भाषणात ब्रम्हपुत्रा
नदी असा उल्लेख केला त्या भाषणानंतर मला माझा तो उल्लेख कसा चुकला आहे हे समजावून सांगितले.
ब्रमहपुत्रा ऐवजी ब्रम्हपुत्र असा उल्लेख असून तो नदी नद आहे हे सांगितले. त्यांनी
माझी ही चूक सुधारलीच पण मला अगदी सविस्तर माहिती दिली. साहेबांनी असे नेहमीच मला
मार्गदर्शन करीत त्यामुळे माझ्यातील उत्तम वक्ता घडत गेला. साहेबांची माया आणि
मार्गदर्शन नेहमीच मला लाभले हे मी माझे भाग्यच मानतो.
- विनायकदादा
पाटील
* * * * * * * *
No comments:
Post a Comment