Wednesday, 25 July 2012

युवा पिढीच्या हितासाठी गुटखा व पानमसाल्यावर बंदी - सतेज पाटील

       मुंबई, दि. 25 : राज्याच्या युवा पिढीच्या आरोग्याचा विचार करुन शासनाने गुटखा व पानमसाला बंदीसाठी अंमलात आणलेल्या सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने कायदा 2003 (COTPA) ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
            अन्न व औषध प्रशासनातर्फे आज यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री.पाटील बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ.पंकज चतुर्वेदी, सलाम बॉम्बे स्वयंसेवी संस्थेच्या श्रीमती चड्डा, डॉ.पी.सी.गुप्ता व अन्य स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.       
            या बंदीमुळे तरुण पिढी तंबाखू सेवनामुळे कॅन्सरसारख्या घातक आजारापासून वाचणार असेल तर बुडणाऱ्या महसुलापेक्षा अधिक कोटींचा फायदा राज्याला होईल असे सांगून सतेज पाटील म्हणाले की हा निर्णय कठोरपणे अंमलात आणण्यासाठी आणि तंबाखुजन्य उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांचा यासाठीचा विरोध मोडून काढण्यासाठी सामाजिक आणि सेवाभावी संस्थांनी शासनाला सहकार्य करावे असे आवाहन सतेज पाटील यांनी यावेळी केले.
            तंबाखू बंदी संबंधी जनजागृती करण्यासाठी केवळ मुंबई-ठाण्यातच नाही तर गावोगावी साईन-बोर्डस, पोस्टर्स, होर्डिंग्स लावण्यात येणार आहेत अशी माहिती देऊन श्री.पाटील म्हणाले अन्न व औषध प्रशासनातर्फे 'धूम्रपान निषिद्ध! येथे धूम्रपान करणे गुन्हा आहे' असे घोषवाक्य लिहिलेले फलक सेवाभावी संस्थांना सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी देण्यात येतील. 'कोटपा' कायद्याचे कलम 6 अनुसार तंबाखू विकणे हा गुन्हा आहे' असे रंगीत अक्षरात लिहिलेला बोर्ड दुकानापुढे लावणे अनिवार्य आहे. असे फलक तंबाखू आणि बिडी व्यापारी संघटनांना प्रथम मुंबई देण्यात येतील.
            महाराष्ट्र शासनाने गुटखा व पानमसाला यावर बंदी घेलण्याचा घातलेला निर्णय ऐतिहासिक आहे. अशा शब्दात उपस्थित सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले या निर्णयामुळे कॅन्सरसारख्या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात तरी कमी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
0 0 0 0

No comments:

Post a Comment