कॅप्टन
लक्ष्मी सेहगल या राष्ट्रभक्तीचे मूर्तीमंत
प्रतिक -
मुख्यमंत्री
मुंबई, दि. 23 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये
महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या आणि राष्ट्रभक्तीचे मूर्तीमंत
प्रतिक असलेल्या रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्या निधनाबद्दल
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र
दु:ख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात की, “वैद्यकीय शिक्षण
पूर्ण केल्यावर 1940 साली त्या सिंगापूरला गेल्या. त्यांचा पिंडच समाजसेवेचा
असल्याने त्यांनी तेथे स्थलांतरित भारतीय मजुरांसाठी दवाखाना सुरु केला.
सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये त्यांनी 1943 साली
प्रवेश केला आणि राणी झाशी रेजिमेंटची स्थापना केली. सुभाषबाबुंनी त्यांना
या रेजिमेंटचे कमांडरपद दिले होते. कॅप्टन म्हणून लक्ष्मी सेहगल यांनी देशाच्या
स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.
पद्मविभूषण प्राप्त कॅप्टन लक्ष्मी यांनी डॉक्टर म्हणून आपले उर्वरित
आयुष्य सामाजिक सेवेत घालविले. 1971 मध्ये त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात
प्रवेश केला. या माध्यमातून त्यांनी राज्यसभेवरही सदस्य म्हणून काम केले.
त्यांच्या निधनाने सुभाषचंद्र बोस यांचा लढा जवळून अनुभवलेली त्यांची एक ज्येष्ठ
सहकारी आज आपल्यातून निघून गेली आहे.”
0 0 0 0 0
कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या निधनामुळे
स्वातंत्र्य संग्रामातील झुंजार व्यक्तिमत्त्व हरपले
-छगन भुजबळ
मुंबई, दि. 23 : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी
कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या निधनामुळे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक झुंजार
व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक
बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले
आहे की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटच्या
प्रमुख म्हणून कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धात प्रवेश केला.
ब्रह्मदेशामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही त्या
सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिल्या. डाव्या विचारसरणीचा अंगिकार त्यांनी केला.
बांगलादेशमध्ये निर्वासितांसाठी शिबिरे चालविण्याबरोबरच भोपाळ वायू दुर्घटना, 1984
मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगली अशा अनेक प्रसंगी त्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीला
त्वरेने दाखल झाल्या. त्यांच्यासाठी वैद्यकीय शिबिरे चालविण्याबरोबरच त्यांना
न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभे करण्याच्या कामीही त्या सदैव अग्रेसर असत.
स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजाच्या कल्याणासाठी हयात
वेचणारे लढाऊ व्यक्तिमत्व कॅप्टन सहगल यांच्या रुपाने हरपले आहे, असेही भुजबळ
यांनी म्हटले आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment