Thursday, 12 July 2012

महाराष्ट्र ठरले परदेशी पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे राज्य

हे यश महाराष्ट्राने राबविलेल्या प्रसिद्धी मोहिमेचे : भुजबळ

मुंबई, दि. 12 जुलै : भारताला भेट देणाऱ्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी सन 2011मध्ये सर्वाधिक परदेशी पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिली असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे. महाराष्ट्राने महाराष्ट्र अनलिमिटेडड ही संकल्पना घेऊन गेल्या काही दिवसांत जगभरात विविध माध्यमांतून जी प्रसिद्धी, प्रचार मोहीम राबविली, तिचेच हे यश असल्याची प्रतिक्रिया पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राखालोखाल तमिळनाडू आणि नवी दिल्ली यांचा क्रमांक लागतो. गतवर्षी महाराष्ट्राला 4.8 दशलक्ष, तमिळनाडूला 3.4 दशलक्ष तर नवी दिल्लीला 2.2 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भेट दिली.
महाराष्ट्राच्या या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जगभरातील पर्यटनविषयक प्रदर्शने आणि प्रचार मोहीमांमधून महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या पर्यटन संधींची पुरेपूर प्रसिद्धी करण्यावर भर दिला. धार्मिक पर्यटनाबरोबरच विरंगुळ्यासाठीची ठिकाणे, सागरी किनारा पर्यटन, ग्रामीण पर्यटन या संकल्पनाही परदेशी पर्यटकांच्या पसंतीला उतरल्या. महाराष्ट्र हे सर्व मोसमांसाठी उत्कृष्ट पर्यटन राज्य असल्याचे पर्यटकांच्या लक्षात आले आहे. परिणामी, त्यांची संख्या वाढली आहे. परदेशी पर्यटकांनी अधिक काळ महाराष्ट्रात वास्तव्य करावे, यासाठी यापुढील काळात प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अहवालानुसार, सन 2011 मध्ये 19.5 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी देशातल्या विविध राज्यांना/ केंद्रशासित प्रदेशांना भेटी दिल्या. सन 2010 मध्ये ही संख्या 17.9 दशलक्ष तर सन 2009 मध्ये 14.4 दशलक्ष इतकी होती. गतवर्षीपेक्षा ही संख्या 8.85 टक्क्यांनी वाढली आहे. सलग तिसऱ्या वर्षी परदेशी पर्यटकांची संख्या वाढती राहिली आहे. या यादीमधील पहिल्या दहा राज्यांनाच सुमारे 90.1 टक्के पर्यटकांनी भेट दिली. यापैकी महाराष्ट्रात 24.7 टक्के, तमिळनाडूत 17.3 टक्के, दिल्लीत 11.1 टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये 9.7 टक्के आणि राजस्थानमध्ये 6.9 टक्के पर्यटक आले.
एमटीडीसी विकसित करणार एकात्मिक संवाद प्रक्रिया
केंद्रीय मंत्रालयाच्या या अहवालाने उत्साह आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झालेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) आता महाराष्ट्रातील पर्यटनविषयक संधींची देशविदेशांत प्रचार, प्रसिद्धी करण्यासाठी एकात्मिक संवाद प्रक्रिया (Integrated Communications Practices) यंत्रणा विकसित करण्याचा निर्धार केला आहे. पारंपरिक प्रचार साधनांबरोबरच अत्याधुनिक नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या साह्याने महाराष्ट्रातील पर्यटनाचे मार्केटिंग करण्यासाठी अनुभवी एजन्सी नेमण्याची प्रक्रियाही महामंडळाने सुरू केली आहे. मार्केटिंग, प्रमोशनसाठी प्रचलित संवादमाध्यमांबरोबरच डिजिटल मार्केटिंग, इंटरनेट, स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, सोशल मिडिया (ब्लॉगिंग, मायक्रोब्लॉगिंग, ऑनलाइन प्रमोशन) आदी साधनांचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रदीर्घ अनुभव असलेल्या जाहिरात कंपन्या, एजन्सीज् यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्यातून सर्वोत्कृष्ट गुणवत्ताधारक कंपनी, एजन्सीला हे काम देण्यात येणार आहे.
--00--
 

No comments:

Post a Comment