Wednesday, 18 July 2012

मराठी व उर्दू भाषांना जवळ आणण्यासाठी शासनामार्फत व्यापक प्रयत्न : मुख्यमंत्री

उर्दू साहित्य अकादमीचा निधी आता 1 कोटी
मराठी व उर्दू भाषांना जवळ आणण्यासाठी
शासनामार्फत व्यापक प्रयत्न
                                                - मुख्यमंत्री
मुंबई,दि.18: उर्दू भाषा समृद्ध करण्याबरोबरच मराठी आणि उर्दू या भाषांना जवळ आणण्यासाठी शासनामार्फत व्यापक प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा निधी वाढवून तो आता 1 कोटी रुपये इतका करण्यात आला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री  श्री. चव्हाण यांनी दिली. 
उर्दू साहित्य अकादमीमार्फत काल येथील यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, आमदार एम. एम. शेख, आमदार एस. क्यू. जमा, अकादमीचे कार्यकारी अध्यक्ष खुर्शिद सिद्दीकी यांच्यासह अकादमीचे सदस्य, उर्दु साहित्यिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की,  उर्दू भाषेला चालना देण्यासाठी शासन स्तरावर व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरावर उर्दू घर उभारण्याचे शासनाने ठरविले आहे. यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.   उर्दू ही देशाला जोडणारी भाषा आहे. त्यामुळे याचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उर्दू ही विशिष्ट धर्म किंवा पंथाची भाषा नसून ती संपूर्ण देशाची भाषा आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या भाषेच्या संवर्धनासाठी राज्यात कार्यरत असलेल्या उर्दू साहित्य अकादमीला भविष्यात जास्तीत जास्त स्वायत्तता देण्याचा प्रयत्न केला जाईल. अकादमीचा निधीही वाढविण्यात आला असून आता तो 1 कोटी रुपये करण्यात आला आहे. अकादमीला यापुढील काळात निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 
उर्दू ही जोडणारी भाषा - नसीम खान
अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यावेळी म्हणाले की, उर्दू शाळांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या शाळांना 2 लाख रुपये देण्याची योजना राज्यात राबविण्यात येत असून दरवर्षी साधारण 2 ते 3 हजार उर्दू शाळांना या योजनेतून लाभ देण्यात येत आहे. उर्दू भाषेला चालना देण्यासाठी मुंबई, नांदेड, औरंगाबाद, नागपूर, मालेगाव आदी शहरांमध्ये अत्याधुनिक सभागृह, अद्ययावत ग्रंथालय, साहित्यिकांसाठी निवास व्यवस्था, अभ्यासिका आदी सुविधांनी युक्त अशी उर्दू घरे बांधण्यात येणार आहेत. उर्दू ही तोडणारी नसून जोडणारी भाषा आहे, असे गौरवोद्‌गार काढून श्री. खान म्हणाले की उर्दू भाषा बोलणारे, लिहिणारे, वाचणारे आणि शिकणारे अशा सर्वांना जवळ आणण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न केले जातील.
याप्रसंगी राज्य शासन व केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कल्याणविषयक विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.  
याप्रसंगी जुबेर रिझवी व सलाम बीन रझाक यांना संत ज्ञानेश्वर राष्ट्रीय पुरस्कार (प्रत्येकी 51 हजार रुपये), इफ्तिकार इमाम सिद्दीकी व अली इमाम नक्वी यांना वलिदक्नी राष्ट्रीय पुरस्कार (प्रत्येकी 30 हजार रुपये),  नुरुल हसनैन व मनसूर एजाज यांना सिराज औरंगाबादी राज्य पुरस्कार (प्रत्येकी 25 हजार रुपये), मोईउद्दीन उस्मानी व श्रीमती मनिषा पटवर्धन यांना सेतू माधवराव पगडी मराठी-उर्दू अनुवाद पुरस्कार (प्रत्येकी 15 हजार रुपये), शफी अहमद शफी व अजिज नबील यांना साहिर लुधयानवी नवलेख पुरस्कार (प्रत्येकी 10 हजार रुपये), मो. अब्दुलहई अन्सारी, शोएब हाश्मी, लतीफ जाफरी, खान शमीम, मो. अकलीम, मो. नकी शादाब, काजी इरशाद, श्रीमती फिरोजा फिदा हुसेन तसबी यांना हारुन रशीद पत्रकारिता पुरस्कार (प्रत्येकी 10 हजार रुपये) तसेच 2009 आणि 2010 या वर्षांच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
0 0 0 0 0

No comments:

Post a Comment