जळगांव दि. 14 :- धरणगांव शहरातील महिला बचत गटांचे कर्ज मंजुरी प्रकरणे, अनुदान, बँकांकडून नामंजूर होणारी प्रकरणे आदि समस्या प्राथमिक स्वरुपात ऐकून त्या समस्यांवर संबंधित अधिकारी, बँका यांनी त्वरित कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले जातील असे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी आज दुपारी मजूर फेडरेशनच्या सभागृहात आयोजित महिला बचत गटांच्या चर्चासत्रात सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गफार मलिक, जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक वाल्मिक पाटील, सौ. तिलोत्तमा पाटील, जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मिनल कुटे, धरणगांवचे गट विकास अधिकारी श्री. तडवी, धरणगांव स्टेट बँक शाखेचे अधिकारी श्री. जाधव, आदिसह सुमारे दिडशे महिला सदस्या उपस्थित होत्या.
धरणगांवचे गटविकास अधिकारी श्री. तडवी यांनी धरणगांव तालुक्यातील 321 महिला बचत गटाची स्थापना झाल्याची माहिती चर्चासत्रात दिली. तसेच मागील वर्षी महिला बचत गटांना कर्ज मंजुरीचे दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये 40 महिला बचत गटांना 91 लाख रुपये कर्जाचे वाटप तर 95 लाख रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहेत. या उद्दिष्ट पूर्ती करिता धरणगांव मधील राष्ट्रीयीकृत व जेडीसीसी बँकांनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर पालकमंत्री ना. देवकर यांनी चर्चासत्रास उपस्थित 70 ते 80 महिला बचत गटांच्या सुमारे 200 महिलांना आपल्या बचत गटाच्या असलेल्या समस्या सांगण्याचे आवाहन केले. या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करण्याकरिता संबंधितांशी पाठपुरावा करुन सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे त्यांनी सांगितले.
धरणगांव शहरातील आदर्श महिला बचत गट, हुमा महिला बचत गट, सुफिया राजा महिला बचत गट, संघर्ष, एकता आदर्श, संत रोहिदास, ओंकार, स्वामी आदि बीपीएल धारक महिला बचत गटातील सदस्यांनी त्यांना येणा-या अडचणी ना. देवकर यांच्या समोर मांडल्या. यात बहुतांश महिला बचत गटांनी स्थापना पाच वर्षापूर्वी होऊन ही आजपर्यंत कर्ज न मिळाल्याचे सांगितले. तसेच अनुदान मिळाल्यानंतर नगरपालिकेच्या प्रकल्प अधिकारी हेमलता सोनवणे यांनी ते वापस घेतल्याचे सांगितले. तसेच यातील अनेक बचत गट नियमितपणे आपली वर्गणी जमा करत असून ही त्यांची बँकेकडील कर्ज प्रकरणे मंजूर होत नसल्याची प्रमुख समस्या महिलांनी आजच्या चर्चासत्रात व्यक्त केली. महिला बचत गटाच्या सदस्यांनी प्रकल्प अधिकारी हेमलता सोनवणे यांच्या कार्यपध्दती विषयी नाराजी व्यक्त केली.
धरणगांव मुख्याधिका-यांवर कारवाई :-
सदरचे चर्चासत्र धरणगांव शहरातील महिला बचत गटांच्या समस्येविषयी असल्याने धरणगांव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती. प्रतिभा पवार व प्रकल्प अधिकारी हेमलता सोनवणे यांनी बोलविण्यात आलेले होते. परंतु त्या ह्या चर्चासत्रास उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांना वारंवार भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून ही त्या चर्चासत्रास गैरहजर राहिल्या. यावर बचत गटांच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री ना. देवकर यांनी नाराजीची दखल घेऊन मुख्याधिकारी श्रीमती प्रतिभा पवार व प्रकल्प अधिकारी हेमलता सोनवणे यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
तसेच धरणगांव तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या व त्यावर उपाययोजना करिता विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर दर गुरुवारी धरणगांव मध्ये येणार असल्याचे ना. देवकर यांनी सांगितले. आजच्या चर्चासत्राप्रमाणेच धरणगांव तालुका व जळगांव तालुक्यातील महिला बचत गटांसाठी स्वतंत्र चर्चासत्रे लवकरच आयेजित करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
धरणगांवचा पाणी प्रश्न :-
आजच्या चर्चासत्रात महिला बचत गटांच्या सदस्य आपल्या समस्या मांडत असतांना धरणगांव शहरातील एका महिला बचत गटाच्या सदस्या असलेल्या महिलेने पालकमंत्री महोदयांना शहरात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची विनंती केली. यावर चर्चासत्रास उपस्थित सर्व महिलांनी टाळयांचा कडकडाट करुन अनुनोदन दिले.
याविषयी ना. देवकर यांनी धरणगांव शहराला वर्षभरात शुध्द पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. तसेच मागील आठवडयात नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी अशुध्द पाणी पुरवठया विषयी जी दिशाभूल केली आहे. त्यासंबधी मुख्याधिकारी प्रतिभा पवार यांचेवर लवकरच निलंबनाची कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सद्यस्थितीत पाण्यामध्ये क्लोरिन पावडर व तुरटीचा मुबलक प्रमाणात वापर करुन धरणगांववासियांना चांगला पाणी पुरवठा करण्याच्या सूचना नगरपालिकेच्या अधिका-यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
*****
No comments:
Post a Comment