Friday, 31 January 2025

जळगाव जिल्हा प्रशासन गिलियन बॅरे सिंड्रोम नियंत्रणासाठी सज्ज; प्रशासनाने तयारीसाठी घेतली कार्यशाळा




जळगाव, दिनांक 31 जानेवारी ( जिमाका ) : गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) तसेच अन्य आरोग्य संकटांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, GBS वर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी ठोस कृती आराखडा तयार करून, उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करावा. मनुष्यबळाची कमतरता असली तरी नियोजनबद्ध काम केल्यास आरोग्याशी संबंधित संकटांवर यशस्वीरित्या मात करता येईल.

डॉ. सचिन भायेकर यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन करताना, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सेवा प्रभावी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनावर घेतले, तर सकारात्मक बदल घडवता येईल, असे सांगितले.

कार्यशाळेत 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना GBS संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यात लक्षणे, उपचार, सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन झाले. जिल्ह्यात औषधसाठा पुरेसा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच ग्राम पातळीवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण व तपासणी नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.

GBS नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार असून, जनजागृतीसाठी तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. "स्वच्छता, शुद्ध पाणी, योग्य आहार आणि सुदृढ जीवनशैली हीच GBS नियंत्रणाची गुरुकिल्ली आहे," असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील

 





जळगाव, दिनांक 31 जानेवारी ( जिमाका ) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत आर्थिक लाभ पोहोचावा यासाठी राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

शुक्रवार, 31 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित बँक प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार,लीड बँक व्यवस्थापक प्रणव झा, कौशल्य विकास सहआयुक्त संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.

बँकांनी अधिकाधिक लाभार्थ्यांना कर्ज द्यावे
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध जातींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने राज्यभरात जातनिहाय महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.

नरेंद्र पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असल्याने येथे लाभार्थ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. बँकांनी अधिकाधिक प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देऊन लाभार्थ्यांना आर्थिक सक्षम करावे व त्यांना नवनवीन व्यवसाय संधी उपलब्ध करून द्याव्यात.

राज्यातील व जळगाव जिल्ह्यातील अनेक सहकारी बँका महामंडळाच्या माध्यमातून कर्जाचा पुरवठा करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करीत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांनी देखील या गोष्टीची दखल घेऊन लाभार्थ्यांना अधिकाधिक मदत करावी.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महामंडळाच्या कर्ज वाटपाचा आढावा घेत राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना कर्ज देण्याचे आवाहन केले.या बैठकीस जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न सुरक्षा आणि स्वच्छता या विषयावर १ दिवसीय कार्यशाळा संपन्न व्यावसायिकांना अन्न परवाण्यासाठी अर्ज करण्याचे सहायक आयुक्तांचे आवाहन


जळगाव, दिनांक 31 जानेवारी ( जिमाका ) : अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव कार्यालयामार्फत 30 जानेवारी रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव व सहायक आयुक्त्, समाज कल्याण, जळगाव विभागाच्या अधिपत्या खालील कार्यरत असणाऱ्या सर्व अनुदानित वसतिगृहे तसेच निवासी शाळा यामध्ये देण्यात येणा-या भोजन आहार यांच्या गुणवत्ता नियंत्रण करण्याकरिता त्या सर्व वसतिगृहे व शाळा यांना अन्न व औषध विभाग महाराष्ट्र शासन अन्न सुरक्षा आणि स्वच्छता या विषयावर १ दिवसीय कार्यशाळा ए.टी.आर. लॅबोरेटरी येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण कीट भारत सरकार मार्फत प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी सं.कृ. सं.कृ., सहायक आयुक्त (अन्न) यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना विनापरवाना अन्न व्यवसाय करणे कायदयानुसार गुन्हा असून १० लाखापर्यंत दंडाचे कायदयात प्रावधान आहे, विनापरवाना अन्न व्यवसाय करणा-यांविरुद्ध कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी परवाना/नोंदणी करावी. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांकडे परवाना आहे, त्यांनी मुदतीच्या पूर्वी ऑनलाईन नूतनीकरण करुन घ्यावे. अन्यथा रुपये ६०००/- इतका दंड असून मुदत संपल्यानंतर परवाना रद्द होत असून व्यवसाय विना परवाना गृहित धरुन त्यांच्या विरुदध कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येते असे सांगितले.
तसेच अन्न परवाना व नोंदणीसाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाखाच्या आत असेल अशा दुकानांनी अन्न नोंदणी करणे व ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा अन्न व्यावसायिकांनी अन्न परवानासाठी अर्ज करावा. असे आवाहन या कार्यशाळेत केले.
या कार्यक्रमास व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ. कांबळे, अन्न सुरक्षा श.म. पवार, स.न.बारी, वरिष्ठ लिपीक हे उपस्थित होते.

राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे क्रीडा आयुक्तांचे आवाहन


जळगाव, दिनांक 31 जानेवारी ( जिमाका ) : राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग / संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याच्या युवा धोरणा अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार देण्यात येतात.
सन २०२३-२४ या वर्षात्त राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. युवक-युवती यांना रोख रु.५०,०००/- संस्थेस रु. १,००,०००/- तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे.
राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांनी गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज दि१५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे.
अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी केलेले आहे.

Thursday, 30 January 2025

पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची 'दिलखुलास', 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत


मुंबई दिनांक 30 जानेवारी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन विभागाचा 'शंभर दिवसाच्या कामकाजाचा आढावा आणि अंमलबजावणी' या विषयावर पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दिनांक 3, मंगळवार दिनांक 4, बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली डीएलसीसीची बैठक संपन्न महिला बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट ; बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद


जळगाव, दिनांक 30 जानेवारी (जिमाका) : जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून "लखपती दीदी" उपक्रमाला गती मिळेल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले.


जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय समन्वय समिती (DLCC) ची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, जिल्हा लीड बँक व्यवस्थापक प्रणवकुमार झा, तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत परतफेड करावी, जेणेकरून पुढील हंगामासाठी त्यांना कर्ज सहज मिळू शकेल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या बैठकीत जिल्ह्यातील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेताना विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये . . . .
✔
ठेवी आणि कर्ज वाटपातील तफावत
✔
नाबार्ड कर्ज सहाय्य
✔
क्रेडिट-डिपॉझिट रेशो
✔
किसान क्रेडिट कार्ड वाटप
✔
पीक कर्ज वितरण
✔
वार्षिक पत आराखडा (ACP)
✔
महिला बचत गट आणि वैयक्तिक कर्ज सुविधा
कर्ज वितरण व उद्दिष्टपूर्तीबाबत सूचना
🔹
पीक कर्ज वाटप: बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज सहज उपलब्ध करून द्यावे.
🔹
वार्षिक पत आराखड्याअंतर्गत (ACP) नियोजन: ठरवलेल्या उद्दिष्टांनुसार कर्ज वितरण व्हावे.
🔹
लघु व मध्यम उद्योगांना मदत: उद्योग आणि बँक यांच्यात समन्वय राखण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने विशेष बैठक घेण्यात यावी.
🔹
भांडवली मदत: लघु व मध्यम उद्योगांना भांडवली सहाय्य मिळावे यासाठी बँकांनी सक्रिय भूमिका घ्यावी.

१० वी व १२ वी परिक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता रद्द होणार


जळगाव, दिनांक 30 जानेवारी (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सर्व परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/ उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यामधून करण्याची कार्यवाही करण्यात यावी हे १७ जानेवारी रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.
मात्र या निर्णयाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत, त्यामुळे या निर्णयात अंशतः बदल करण्यात येत असून फेब्रुवारी-मार्च २०२५ व्या उत्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.
कोरोना काळातील सन २०२१ च सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षाच्या म्हणजेच फेबुवारी-मार्च २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी सबंधित व्यक्तीची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्हयात इ. १० वी व इ. १२ वीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहणार आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकायनि परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथकांच्या भेटी होतील याचे नियोजन केले जाणार आहे.

वाळू धोरणावर 3 फेब्रुवारी रोजी अल्प बचत भवन मध्ये खुली चर्चा; नागरिकांना होता येणार सहभागी


जळगाव, दिनांक 30 जानेवारी (जिमाका) : जिल्ह्यातील वाळू उपसा आणि त्यासंदर्भातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता अल्प बचत भवन, जळगाव येथे खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या चर्चेत नागरिक, पर्यावरणप्रेमी, वाळू उपसा व्यावसायिक, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधित घटक सहभागी होऊ शकतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

वाळू उपसा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. शासनाच्या वाळू धोरणात सुधारणा, नियमावलीतील अंमलबजावणी, स्थानिक समस्यांवर तोडगा आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला जाणार आहे.

या चर्चेत सर्वसामान्य नागरिकांना आपले मत मांडण्याची संधी मिळणार असून, प्रशासनाकडूनही धोरणात्मक भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिक, वाळू उपसा व्यावसायिक आणि संबंधित हितधारकांनी चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ५ फेब्रुवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय आयोजन


जळगाव, दिनांक 30 जानेवारी (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय करण्यात आले आहेत.

येत्या ५ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
नोकरी करु इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असुन सर्वसाधारण १०वी, १२ वी / सर्व शाखेतील पदवीधारक / आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए/एम.बी.ए तसेच सर्व डिग्री धारक पात्रता धारकासाठी ५०० पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

या मेळाव्यात जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील जैन फॉर्म फ्रेश, युवा शक्ती, नाशिक, धुत ट्रान्समिशन, छ. संभाजीनगर, हिताची अॅस्टींमो ब्रेक सि.प्रा.लि. जळगाव, किरण मशिन टुल्स, जळगाव, गुजरात अंबुजा, चाळीसगाव, फ्युबर टेक्स, जळगाव, टी. डब्लयु.जे, जळगाव, उत्कर्ष स्मॉल बँक, जळगाव, प्रतिभा प्लास्टिक, जळगाव, मानराज मोटर्स, जळगाव असे नामांकित आस्थापनाकडुन ऑनलॉईन पद्धतीने रिक्तपदे कळविण्यात आले आहेत.

या मेळाव्याची लाभ घेण्याकरीता उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर लॉग-इन करुन रिक्तपदांसाठी अल्पाय करावे, तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे.

थकित कर्ज वसुलीकरिता ओबीसी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार एकरक्कमी परतावा (OTS) योजना


जळगाव, दिनांक 30 जानेवारी (जिमाका) : महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांना स्वंयरोजगारासी कर्ज वितरीत करण्यात आले आहे. कर्ज घेतलेल्या लाभार्थीना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात येते. विहित मुदत संपल्यानंतर देखिल बऱ्याच लाभार्थीनी महामंडळाकडे शिल्लक रकमेची परतफेड अद्याप केलेली नाही. थकीत कर्ज वसुलीसाठी सर्व वैधानिक प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत आहेत.

ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना राबविण्यात येत आहे.

त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

जलजीवन मिशन योजनेतील कामे गतीने पूर्ण करावी

मुंबई, दिनांक 29 जानेवारी : ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे यासाठी जलजीवन योजनेतील कामे गतीने व्हावीत. केंद्र शासनामार्फत या योजनेतील कामांचा नियमित आढावा घेतला जात असल्याने योजनेची कामे कालमर्यादेत व गुणवत्ता पूर्ण करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालय येथे नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील विविध कामांसंदर्भात बैठक झाली.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, संचालक ई रवींद्रन, सहसचिव बी.जी पवार, मुख्य अभियंता तथा विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरे, दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना क्षेत्रीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देणे आवश्यक आहे. या कामांमध्ये येणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन योजनेच्या कामांना गती द्यावी.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्ण करुन आदिवासी पाड्यातपर्यंत नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा. जल जीवन मिशन योजनेची कामे कालमर्यादेत पूर्ण होऊन नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी यंत्रणांनी त्यांच्याकडील विषय, अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
बैठकीत जल जीवन योजनेतील कामांच्या भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या चिंचवड व सहा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, वाघेरा व 14 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, चिखलपाडा व आठ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि घोटी बुद्रुक पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. याबरोबरच हर घर जल योजनेचाही आढावा घेण्यात आला.

नर्सिंग GNM, ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दिनांक 29 जानेवारी (जिमाका वृत्त ) : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यत्ता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (होम बेस केअर गिव्हर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी http://maharashtrainternational.com/job.aspx या अधिकृत संकेतस्थळावर आपली माहिती भरावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगावचे सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

२५ ते ४५ वर्षे वयोगटातील इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणारे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहेत. उमेदवारांकडे घरगुती सहाय्यक सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र (ऑन जॉब ट्रेनिंग सह) असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण, जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
इस्राईल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून केली जाणार आहे. मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना १ लाख ३१ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परीसर, जी. एस. ग्राऊंड शेजारी, जळगाव येथे संपर्क साधावा.

अनुसूचित जमाती प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृती / फ्रीशीप योजनेंतर्गत अटींची पुर्तता करुन 31 जानेवारी पर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दिनांक 29 जानेवारी (जिमाका वृत्त ) : ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे आधार प्रमाणपत्र सादर करून ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी कार्यालयात शिष्यवृत्ती/फ्रीशीपकरिता 31 जानेवारी पर्यंतच्या मुदतीत ऑफलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.

तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे महाडीबीटी प्रणालीवर महाडीबीटी एडमीन कडून अर्ज नामंजूर झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना देखील ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहे. मात्र त्यांना कोणत्या कारणांमुळे ऑनलाईन अर्ज रिजेक्ट झाला त्याची कारणमीमांसा व त्याबाबतच्या पूर्ततेसह ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना महाडीबीटीवरील नामंजूर झालेल्या अर्जांचा क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. सदर अर्ज क्रमांक नमूद नसेल अशा अर्जांचा शिष्यवृत्तीकरिता विचार करण्यात नाही.
ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे (उदा. उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाणपत्र इ.) महाविद्यालय स्तरावरुन अथवा प्रकल्प अधिकारी स्तरावरुन नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार नाहीत.
जे विद्यार्थी काही विशिष्ट कारणांमुळे महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरु शकले नाहीत अथवा अर्जाची नोंदणी करुनही ज्यांचे अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना कारणमीमांसासह ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. तथापि, या प्रकरणी विद्यार्थ्यांनी नमूद केलेली कारणमीमांसा समर्पक असल्यास शिष्यवृत्ती देय ठरणार आहे व याबाबतचा अंतिम निर्णय शासनाचा असणार आहे. ऑफलाईन अर्ज सादर करताना महाडीबीटी प्रणालीवर लागू असलेले सर्व निकष संबंधित विद्यार्थ्यांना लागू राहतील त्याचप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे नोंदविणे आवश्यक असणार आहे. (उदा. उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाण, कॅप राऊंड प्रमाणपत्र इ.).
ज्या अभ्यासक्रमाचे मॅपिंग त्या त्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती / फ्रीशीपसाठी महाडीबीटी प्रणालीवर करण्यात आले आहेत. असेच अभ्यासक्रम शिष्यवृत्ती/फ्रीशीपचे ऑफलाईन अर्जाकरिता लागू राहतील. महाडीबीटी प्रणालीवर त्या त्या शैक्षणिक वर्षांत मॅपिंग न झालेल्या अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती/फ्रीशीपच्या ऑफलाईन पध्दतीने सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच एकाच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर होणार नाहीत याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. याप्रकरणी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचे प्रतिज्ञापत्र संबंधित विद्यार्थ्यांने द्यावे. या प्रकरणी दोन्ही प्रकारात विद्यार्थ्यांने अर्ज सादर केलेला असल्याची बाब निष्पण्ण झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत अर्जांची मंजूरी करण्यास अडचणी आल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत. शिष्यवृत्ती देण्यामागे केवळ होतकरु व गुणवंत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असा मुख्य उद्देश असल्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी कार्यालयास शिष्यवृत्ती/फ्रीशीपकरिता ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 31 जानेवारी 2025 असेल.
दिनांक 31 जानेवारी 2025 नंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जांना शासनाकडून मंजूरी देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी व अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जि. जळगांव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.

मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न


जळगाव, दिनांक 29 जानेवारी (जिमाका) : मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात "मराठी भाषा: उगम आणि भाषा संवर्धन" या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विभागाचे कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे होते. विद्यार्थ्यांसह अधीक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
युवराज पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, मराठी भाषेचा उगम महाराष्ट्री प्राकृत भाषेतून झाला. भारतभर प्रचलित असलेल्या प्राकृत भाषांची लिपी ब्राम्ही होती. पुढे या लिपीचा विकास होत जाऊन देवनागरी लिपीचा उपयोग वाढला. यावेळी त्यांनी "गाथा सप्तशती" या राजा हाल यांनी संपादित केलेल्या प्राचीन ग्रंथाचा उल्लेख करत, त्यातून मराठी भाषेच्या प्राचीनतेवर प्रकाश टाकला. तसेच "विवेकसिंधू," "ज्ञानेश्वरी," "लीळाचरित्र" यांसारख्या ग्रंथांचे दाखले देऊन मराठी भाषा समृद्ध कशी झाली, याचे विवेचन केले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे तिच्या संवर्धनाला आणखी चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या भविष्यासंबंधी तसेच शासनाच्या भाषा धोरणाविषयी प्रश्न विचारले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी त्यांच्या शंका स्पष्ट करून मराठी भाषेच्या जतन आणि वृद्धीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले. त्यांनी मराठी भाषा संवर्धन सप्ताहामागील शासनाची भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली.
कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाच्या वतीने श्री अरुण वाणी वरिष्ठ लिपिक,श्रीमती वैशाली पाटील गृहपाल मुलींचे शासकीय वसतिगृह जळगाव, श्री बाळू बोरसे मुलांचे शासकीय वस्तीग्रह ते हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जितेंद्र धनगर तालुका समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वैशाली पाटील गृहपाल मुलींचे शासकीय वस्तीग्रह जळगाव यांनी केले.
कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीग्रह जळगाव, गुणवंत मुलांचे शासकीय वस्तीग्रह जळगाव, तसेच मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीग्रह जळगाव येथील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती वैशाली पाटील, श्री एस आर पाटील, श्री बाळु बोरसे, श्री दीपक सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS)ची सद्यस्थिती व पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे 31 जानेवारी रोजी आयोजन

जळगाव, दिनांक 29 जानेवारी ( जिमाका ) : जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारा गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) ची सद्यस्थिती व पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 31 जानेवारी रोजी नियोजन भवन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव पार पडणार आहे.

या कार्यशाळेत जीबीएसचा परिचय आणि साथीचे रोग या विषयावर डॉ. पराजी बाचेवार, प्राध्यापक, जनरल मेडिसिन, जीएमसी, जळगाव मार्गदर्शन करतील. जीबीएसचे इटिओपॅथोजेनेसिस, क्लिनिकल वैशिष्ट्ये आणि प्रकार या विषयावर डॉ. गोपाळ घोलप, न्यूरोलॉजिस्ट, जीएमसी, जळगाव हे तर बालरोग लोकसंख्येमध्ये जीबीएसचे क्लिनिकल सादरीकरणे यावर डॉ. कौस्तुभ चौधरी, बालरोगतज्ञ, जीएमसी, जळगाव मार्गदर्शन करणार आहेत.
जीबीएसचे निदान, विभेदक निदान, मूल्यांकन आणि उपचार यावर डॉ अभिजित पिल्लई, न्यूरोलॉजिस्ट, जीएमसी, जळगाव मार्गदर्शन करणार आहेत.
जीबीएससाठी उच्च दर्जाचे उपचार या विषयावर डॉ. अमित भंगाळे, नेफ्रोलॉजिस्ट आणि सहाय्यक प्राध्यापक, जीएमसी, जळगाव व जीबीएसच्या गुंतागुंत यावर डॉ. सायली पाटील, सहाय्यक प्राध्यापक, जनरल मेडिसिन, जीएमसी, जळगाव आणि जीबीएससाठी प्रतिबंधात्मक धोरणे यावर डॉ. व्ही. व्ही. पुजारी, प्राध्यापक, श्वसन चिकित्सा, जीएमसी, जळगाव या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे वेळापत्रक तात्पुरते आहे आणि जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या सूचनांनुसार बदल होऊ शकतात. त्यासोबतच सर्व प्रेक्षकांच्या सोयीसाठी सत्र इंग्रजी आणि मराठी भाषेत वापरण्यात येणार आहे .

Tuesday, 28 January 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


              जळगाव, दिनांक 29 जानेवारी (जिमाका वृत्त ) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक  3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे. 

           तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनांक अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

               जळगाव, दिनांक 29 जानेवारी (जिमाका) : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या ०२ ते ०४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सायंकाळी ६ ते १० या वेळेत वाजता भैय्यासाहेब गंधे सभागृह, जिल्हा पेठ, जळगाव या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

                   या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांची असून,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव ( सांस्कृतिक कार्य विभाग विकास) खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

            या महोत्सवात 02 फेब्रुवारी, 2025 रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक गायक चैतन्य परब, ख्यातनाम गायिका अमृता काळे, विख्यात सारंगीवादक साबीर खान, ज्येष्ठ गायक पंडित हरीश तिवारी यांचे सादरीकरण होणार आहे तर 3 फेब्रुवारी रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक ऋतुराज धुपकर व कृष्णा साळुंखे, प्रसिध्द गायक अनुरत्‍न रॉय, बासरीवादक चिंतन कट्टी व ज्येष्ठ गायक धनंजय जोशी यांचे सादरीकरण होणार आहे.

                  मंगळवारी 4 फेब्रुवारी 2025 रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक जगन्‍मित्र लिंगाडे व यश खडके यांची जुगलबंदी, प्रसिध्द गायिका रौकिंणी गुप्ता यांचे गायन होणार आहे तर पद्मश्री पंडित रोणू मुजुमदार व ऋषिकेश मुजुमदार यांची बासरी जुगलबंदी व ज्येष्ठ गायक पंडित आनंद भाटे यांचे गायन असे नामवंत भारुड कार आपली शास्त्रीय संगीत गायन व वादन कला सादर  करणार आहेत.

              या कार्यक्रमास स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांनी सहकार्य केले आहे. रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या सुरेल कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.