भिल्ल समाज वस्तीमध्ये जाऊन जातीचे दाखल्यांचे वितरण
लोकाभिमुख प्रशासनाचे दर्शन घडविणारे प्रांताधिकारी गणेश मिसाळ
चाळीसगाव, दिनांक 4 :- जातीच्या दाखल्यांपासून अनेक वर्ष वंचित
असलेल्या मौजे वाघुलखेडा येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या 173 जणांना प्रत्यक्ष
त्यांच्या वस्तीत जाऊन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी जातीचे दाखले वितरीत केले.
जातीच्या दाखल्यापासून वर्षानुवर्षे वंचित असल्याने या वस्तीतील नागरिकांना अनेक
योजनांपासून वंचित रहावे लागले, त्यामुळे या
शिबीरातून जातीचा दाखला मिळाल्याने त्यांना न्यायीक हक्क मिळाला आहे. या शिबीरातून
ख-या अर्थाने लोकाभिमुख प्रशासनाचे दर्शन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी
घडवील्याच्या प्रतिक्रिया भिल्ल वस्तीतील समाजबांधवांनी यावेळी दिल्या आहेत.
दाखले वितरण कार्यक्रमात बोलतांना श्री.मिसाळ
म्हणाले की, एकलव्य संघटनेने हा समाज जातीच्या
दाखल्यांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून दिल्या नंतर जातीचा दाखला देण्यासाठीचा
कायदा व कायद्यातील नियमांचा आभ्यास केला असता त्यामध्ये स्थानिक चौकशी करुन व इतर
आवश्यक ते पुरावे गोळा करुन सक्षम प्राधिका-याला असे दाखले देण्याची तरतूद
त्यामध्ये मिळून आली व त्याचा वापर करुन भिल्ल समाजातील नागरिकांना त्यांच्या न्यायीक
हक्कानुसार जातीचे दाखले देण्याचा निर्णय घेतला व महसूल दिनाचे औचित्य साधत प्रत्यक्ष
भिल्ल समाजाच्या वस्तीमध्ये जाऊन दाखले वितरण करतांना मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रीयाही श्री.मिसाळ यांनी यावेळी व्यक्त करून लोकाभिमुख
प्रशासन राबविण्यासाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने हे काम शक्य झाल्याचेही त्यानी यावेळी सांगितले.
एकलव्य
संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ आपल्या
मनोगतात म्हणाले की, भिल्ल समाजातील लोकांना मिळालेल्या जातीच्या दाखल्यामुळे आदिवासी
प्रकल्प कार्यालय, यावल यांचे मार्फत आदिवासी
साठी असलेल्या विविध योजनांचा लाभ, अनुसूचित जमातींसाठी असलेली घरकुल योजना,
पंचायत समिती मार्फत वाटप होणारी शेती औजारे, ताडपत्री, विद्यार्थ्यांना शाळेतुन मिळणारी
शिष्यवृत्ती व इतर अनेक योजनांचा लाभ होणार असल्याने या जमातीला ख-या अर्थाने न्याय
मि ळाला आहे.
भिल्ल
समाज हा अशिक्षित असल्याने कागदपत्रांपासूनही ते दुरच आहेत. परिणामी ज्या समाजात
जन्माला आले त्या जातीचा जुना पुरावाच अनेकांजवळ नाही. ही अडचण लक्षात घेत पाचोरा
प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी स्वत: लक्ष घालून हे दाखले त्यांना वितरीत केले.
मिसाळ यांनी शासकीय कामाची विशिष्ट पध्दत
बाजूला ठेवत स्वत: पुढाकार घेऊन तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि
सरपंच यांच्या मदतीने समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
मौजे वाघुलखेडा येथे आयोजित दाखले वितरणाच्या
कार्यक्रमास सरपंच अशोक रामदास अहिरे, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ,
तालुका अध्यक्ष समाधान सोनवणे, प्र.तहसिलदार राजेंद्र नजन, नायब तहसिलदार आबा
महाजन, मंडळ अधिकारी कुमावत, तलाठी रुपाली
रायगडे, सेतु कर्मचारी सागर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत भोसले, यांनी परिश्रम
घेतले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन रमेश मोरे यांनी केले. यावेळी
समाज वस्तीतील नागरिक,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment