सार्वजानिक वहिवाटीच्या नोंदी
निस्तार व वाजीब-उल-अर्ज पत्रकात आवश्यक !
: प्रांताधिकारी गणेश मिसाळ
चाळीसगाव,दिनांक 28 :- गावातील सार्वजानिक
स्वरुपाचे हक्क निश्चित करुन ते दर्शविणारी पत्रके गावाच्या दप्तरात असावी याबाबत
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. तरी अशा
प्रकारच्या नोंदी हया प्रत्येक गावाच्या दप्तरी असणे जरूरीचे असल्याने या करिता
विभागीय आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली
निस्तार पत्रके व वाजिब-उल-अर्ज तयार करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अशी
पत्रके व नोंदी हया अद्यावत नसल्याने सार्वजानिक जागांबाबत व वहिवाटींबाबत होणा-या
वादांची प्रकरणे न्यायालयात दाखल होतात व काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न
निर्माण होतात त्याअनुषंगाने गावातील सार्वजानिक वहिवाटीच्या नोंदी ठेवणे आवश्यक
असल्याचे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
निस्तार पत्रक म्हणजे सरकारी
सार्वजानिक मालकीच्या जमिनीवर त्या गावातील भोगवटयात नसलेल्या जमिनीवर त्या
गावातील रहिवाशांना वहिवाटीचा तसेच जमिनीवरील विविध उत्पन्नाचा उपभोग घेण्याचा
कोणता हक्क पोहोचतो याचे स्पष्टीकरण करणारे पत्रक म्हणजे निस्तार पत्रक असा होत
असून यामध्ये शेत उपयोगी गुरांना मोफत चराईसाठीचे क्षेत्र, गावातील रहिवाशांना
सर्व प्रकारचे लाकूड, सरपण किंवा जंगलातील उत्पन्नाचा वापर करता येईल असे होय,
मुरुम, कंकर, वाळु, माती, चिकणमाती, दगड वा इतर दुय्यम खनिज घेण्यासाठीचे क्षेत्र,
दहनभुमी, दफनभूमी, गावठांण, गोठाण, छावणीची जमीन, मळणीची जमीन, बाजार, सार्वजानिक
प्रयोजनासाठी गावठाणाबाहेर राखून ठेवलेली जमीन इ. बाबी यात समाविष्ठ होत असून याची
नोंद निस्तारपत्रकात होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी कळविले आहे यासाठी सर्व
गावक-यांनी एकमत करुन गावाचे संबंधित तलाठयांशी संपर्क साधण्याचे आवाहन
प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी केले आहे.
वाजीब-उल-अर्ज
विदर्भातील महसुल संबंधीत नोंदवही असून ती संपुर्ण राज्यभरात लागू करण्यात आली
आहे. वाजीब-उल-अर्ज अभिलेख ठेवण्याबाबतच्या कार्यपध्दतीमध्ये गावातील कोणतेही जमीन
किंवा पाणी हे राज्य शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीचे नसेल किंवा त्यांच्याकडून
ज्याचे नियंत्रण अथवा व्यवस्था केली जात नाही म्हणजेच खाजगी मालकीची आहे अशा जमीनीवरील
अथवा यथास्थिती पाण्यावरील पाटबंधारे, मच्छीमारी, येण्याजाण्याचा हक्क किंवा अन्य
वहिवाटी यासाठी त्या गावातील रिवाज ठरवून त्याची नोंद असणारा अभिलेख म्हणजे वाजीब-उल-अर्ज असा असून
संहितेच्या कलम 165(1) नुसार जिल्हाधिका-यांनी असा अभिलेख तयार करावयाचा असून गावातील रिवाज
ठरविण्यासाठी समितीचा अभिप्राय घेऊन कार्यवाही करावयाची असते. गावातील रिवाज
ठरविण्यासाठी गठीत केलेल्या समितीचा अध्यक्ष हा सरपंच असून सदस्य पोलीस पाटील,
गावातील सहकारी संस्थेचा एक प्रतिनीधी व गावातील मागील किमान 60 वर्षापासून
रहिवाशी व सध्या 75 वर्षे किंवा त्यापुढील वय असणारे 2 प्रतिनिधी असतील तर सचिव
म्हणून संबंधित गावचा तलाठी राहील. वाजीब-उल-अर्ज तयार करतांना स्थानिक रुढी,
परंपरा व श्रध्दा यांचा विचार करुन स्थानिक, धार्मिक व सामाजिक सलोख्याचे वातावरण
कायम राहिल याची दक्षता घेण्याचे आवाहन करुन निस्तार पत्रक तसेच वाजीब-उल-अर्ज
ठेवण्याबाबत अधिक मार्गदर्शनासाठी श्री.गणेश मरकड, तहसिलदार पाचोरा व
श्री.बी.ए.कापसे, तहसिलदार भडगांव यांच्याशी संपर्क साधावा असेही श्री.मिसाळ
यांनी कळविले आहे.
*
* * * * * * *
सुवर्ण जयंती राजस्व अभियानातंर्गत
समाधान योजनेतुन विविध दाखल्यांचे वाटप
चाळीसगाव,दिनांक
28 :- राज्य
शासनाच्या राजस्व अभियानातंर्गत समाधान योजनेतून चाळीसगांव महसूल प्रशासनाने मौजे
हातले व खडकी या मंडळातंर्गत येणा-या गावातील नागरिकांना राज्य शासनाच्या
जनहितार्थ निर्णयाच्या अनुषंगाने विविध लोकोपयोगी दाखल्यांचे वाटप नायब तहसिलदार
महसूल नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसिलदार
विशाल सोनवणे, पुरवठा निरीक्षक संदेश निकुंभ, पुरवठा अव्वल कारकून दिलीप राजपूत,
मंडळ अधिकारी ए.बी.जाधव, मंडळ अधिकारी
बि.आर.सोनवणे तसेच हातले आणि खडकी
बु. मंडळातील सर्व तलाठी व गावकरी, विद्यार्थी मोठया सख्येने उपस्थित होते.
विविध लोकपयोगी दाखले वितरणात कुळकायदा कलम 43
नुसार नियंत्रीत सत्ता प्रकार शेरा कमी केलेल्या सात बारा उता-यांचे वाटप,
उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवास प्रमाणपत्र, दुबार शिधा पत्रीका प्रती, व नावे कमी
केलेल्या शिधा पत्रीकांचे वाटप यांचा
समावेश होता. सदर दाखले चाळीसगांव महसूल प्रशासनाने लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष
गावात शिबीर भरवून वितरीत केल्याने संबंधीत गावच्या नागरिकांनी महसूल प्रशासनाने
राबविलेल्या समाधान योजनेबाबत समाधान व्यक्त केले.
* * * * * * * *
बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका
धारकांसाठी साखरेचे नियतन
चाळीसगांव, दि. 28: महाराष्ट्र शासनाच्या
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून सार्वजानिक वितरण व्यवस्थेतंर्गत
चाळीसगांव तालुक्याकरिता माहे जुलै-2014 या महिन्याकरिता प्रती व्यक्ती 500 ग्रॅम
प्रमाणे बीपीएल व अंत्योदय शिधा पत्रीका धारकांसाठी 793 क्विंटल व ऑगस्ट 2014 या
महिन्या करिता प्रती व्यक्ती 650 ग्रॅम प्रमाणे 1091 क्विंटल साखर उपलब्ध झाली
असून बीपीएल व अंत्योदय शिधा पत्रीका धारकांनी संबंधीत स्वस्त धान्य दुकानदारांकडे
संपर्क साधून रुपये 13.50 या दराने साखर प्राप्त करुन घ्यावी.
तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम
2013 अंतर्गत निवड झालेल्या उर्वरित एपीएल (केशरी) शिधा पत्रीका धारकांसाठी 1200 क्विंटल गहू आणी
999 क्विंटल तांदुळ उपलब्ध झाला आहे केशरी शिधा पत्रीका धारकांनी प्रती कार्ड 10 किलो
गहू 7.20 रुपये या दराने तर 5 किलो तांदुळ 9.60 रुपये दराने संबंधित स्वस्त धान्य
दुकानदाराकडून प्राप्त करुन घ्यावा असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * * * *