जळगाव दि.18 (जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने देश पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती निमित्त “जय शिवराय, जय भारत पदयात्रा” राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
राज्य शासनाच्या वतीने राज्यातील सर्वच 36 जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरावर भव्य स्वरुपात जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुषंगाने जळगांव जिल्ह्यामध्ये दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी जळगांव शहरात भव्य जिल्हास्तरीय “जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे” आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येवून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मा. जिल्हाधिकारी महोदयांनी शासनाच्या सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना निर्देश दिलेले आहेत. मुख्य कार्यक्रम दि.19 फेब्रवारी 2025 रोजी सकाळी 08.30 वा. श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरु होईल. सर्व प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पन करण्यात येईल. त्यानंतर सविंधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन शपथ घेण्यात येईल, तसेच पोवाडा आणि राज्यगीत होईल. त्यानंतर प्रत्यक्ष पदयात्रेस सुरुवात करण्यात येईल.
यावेळी या कार्यक्रमाला पालक मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रिय राज्य युवा कार्य व खेल मंत्रालय भारत सरकार श्रीमती रक्षाताई खडसे, खासदार . स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परषिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगावच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सचिव राम पवार तसेच सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक, जिल्हा नेहरु युवा केंद्राचे श्री नरेंद्र डागर, तसेच जिल्ह्यातील शिव छत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय स्वयंसेवक, एन.सी.सी. कॅडेट्स, नागरीक हे उपस्थित राहणार आहेत.
पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथेून सुरु होईल. या पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल - कोर्ट चौक - पंडीत जवाहरलाल नेहरु स्मारक - टॉवर चौक - चित्रा टॉकिज – शिवतीर्थ (जी.एस. मैदान) असा राहणार आहे. या पदयात्रेत शहरातील सर्व शाळा / महाविद्यालये, विद्यार्थी, युवक - युवती तसेच शिवप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत. यावेळी पदयात्रेमध्ये शिवाजी महाराजांची, मावळ्यांची वेशभुषा केलेले विद्यार्थी, घोड्यावर, रथामध्ये स्वार होऊन सहभागी होणार आहेत. काही शाळांचे लेझीम, झांज, ढोलपथक, योगा प्रात्यक्षिक करणारे विद्यार्थी हेही सहभागी होणार आहेत. त्यामुळे या पदयात्रमध्ये शिवकालीन देखाव्यांचा अभुतपुर्व असा अनुभव सर्वांना घेता येणार आहे.
पदयात्रेतील सहभागी शालेय विद्यार्थी व युवकांसाठी आयोजकांच्या वतीने दुध, केळी, बिस्कीट, पाणी इत्यादींची सोय करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जळगांव जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगांव यांचेवतीने अथक परिश्रीम घेण्यात येत आहे. या पदयात्रेमध्ये जळगांव शहरातील जास्तीत जास्त युवक - युवती व नागरिकांनी सहभागी व्हावेत असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment