Monday, 24 February 2025

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करावेत- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन






यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न

                         नाशिक, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम निश्चित करतांना आर्थिक दुर्बल घटकातील पात्र तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक कोळस्कर, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, कुलसचिव दिलीप भरड यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्रमुख उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, जगातील अनेक प्रगत देश कौशल्य असलेल्या मनुष्यबळाचा शोध घेत आहेत. ते त्यांची भाषा जाणणाऱ्या कुशल मनुष्यबळाची मागणी करतात. या पार्श्वभूमीवर जपानी, जर्मन, रशियन, इटालियन, फ्रेंच किंवा अगदी इंग्रजी भाषेतील लघु अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार विद्यापीठाने करावा. देशातील शैक्षणिक प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रित मॉडेलपासून परिणाम आधारित मॉडेलकडे संक्रमण करणार आहे. हा बदल विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनविण्याबरोबरच त्यांना उद्योजक बनण्यासाठी  सक्षम करेल आणि  2047 पर्यंत 'विकसित भारताचे' स्वप्न पूर्ण करण्यास पूरक ठरेल, असा विश्वास राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

भारतामध्ये 2036 पर्यंत उच्च शिक्षणात 50 टक्के नोंदणी साध्य करण्याचे स्वप्न फक्त मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षमतेचा वापर करूनच साकारता येईल. दुर्गम भागातील आणि शैक्षणिक प्रवाहापासून दूर असणाऱ्या व्यक्तींना यामुळे शिक्षणाची संधी मिळू शकेल.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गृहिणी, कामगार, आदिवासी भागातील नागरिक आणि बंदिजनांनाही शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे.  विद्यापीठाचे हे कार्य कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे शिक्षण देण्यासाठी नवा विचार आणि नवकल्पनांचा समावेश अभ्यासक्रमात करावा, असे आवाहन राज्यपालांनी केले. विद्यापीठाचे रूपांतर डिजिटल विद्यापीठात करण्यासाठी निधी मिळण्याबाबत शासनाला सूचना करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. कोळसकर म्हणाले, विविध तंत्रज्ञानाच्या प्रगती आणि वापरामुळे बाह्य जग वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्ससह विविध घटक आपल्या उपजीविकेवरच नव्हे, तर समाज व्यवस्थेवर परिणाम करीत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याने शिक्षण क्षेत्रात भौगोलिक सीमारेषा पुसल्या जाऊन यापूर्वी कधीही उपलब्ध नसलेल्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे डिजिटल बँकिंग सुविधा, ई कॉमर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागात नव्या संधी निर्माण होत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हांनाना संधीमध्ये रुपांतर करावे, असेही आवाहन डॉ. कोळस्कर यांनी केले.

कुलगुरू प्रा. सोनवणे म्हणाले, विद्यापीठाद्वारे नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. नियमित शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी संधी निर्माण करून देत त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी, आदिवासी भागातील नागरिकांना सक्षम करण्यासाठी विद्यापीठ कार्य करीत आहे. शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोग करता यावा या दिशेने विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. विद्यापीठाला डिजिटल विद्यापीठात परिवर्तित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. असे झाल्यास १ कोटी विद्यार्थ्यांशी विद्यापीठ जोडले जाईल. वाढवण बंदराच्या ठिकाणी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी अभ्यास केंद्र सुरू करण्यात येत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजक घडवण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. आज पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी देशाच्या उभारणीत योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कुलपती तथा राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते विविध विद्या शाखेतील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थांना पदके प्रदान करण्यात आली.

No comments:

Post a Comment