Sunday, 21 April 2024

जिल्ह्यातील 20 राष्ट्रीयकृत, खाजगी बँका 120 मतदान केंद्राच्या सजावटीसाठी आल्या पुढे आदर्श मतदान केंद्र तसेच काही मतदान केंद्र दिव्यांग, युवक आणि महिला यांच्याकडून चालवले जाणार

 

जिल्ह्यातील 20 राष्ट्रीयकृत, खाजगी बँका 120 मतदान केंद्राच्या सजावटीसाठी आल्या पुढे

आदर्श मतदान केंद्र तसेच काही मतदान केंद्र दिव्यांग, युवक आणि महिला यांच्याकडून चालवले जाणार

 जळगाव, दिनांक 20 एप्रिल ( जिमाका ) : निवडणूक आयोगाच्या सूचनेननुसार जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात आदर्श मतदान केंद्र 55, दिव्यांगांकडून 21, युवकांकडून 11 आणि महिलांकडून 33 मतदार केंद्र चालवले जाणार असून ते अत्यंत आकर्षक पद्दतीने सजवली जातील. त्यासाठीचा आर्थिक भार जिल्ह्यातील 20 राष्ट्रीयकृत, खाजगी बँका राष्ट्रीय दायित्व म्हणून स्विकारत आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व बँकांना हे आवाहन केले होते.

लोकसभा निवडणूक अधिक समावेशक आणि महिला, दिव्यांग बांधव, युवक इत्यादी सर्व नागरिकांसाठी सहभागी होण्यासाठी आयोगाने अलीकडच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये विविध नवीन उपक्रम हाती घेतले.  स्त्री-पुरुष समानता आणि निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा अधिक रचनात्मक सहभाग याच्या प्रति वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, आयोग वेळोवेळी निर्देश जारी केलेले असून सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे, सर्व दिव्यांग व्यवस्थापित मतदान केंद्रे व सर्व तरुण व्यवस्थापित मतदान केंद्रे स्थापन करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या नुसार जिल्ह्यात आदर्श मतदान केंद्रासह एकूण 120 मतदान केंद्र निर्माण केले जाणार आहेत. ते अत्यंत आकर्षक पद्दतीने सजवली जाणार आहेत.

 

अग्रणी बँक व्यवस्थापक प्रणव कुमार झा म्हणाले,  जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँकांमध्ये त्यांच्या संख्येनुसार त्यांना आवाहन केले होते. स्थानिक शाखा प्रमुखांना मुख्यतः शाखेपासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या केंद्राला भेट देण्याची सूचना केली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सगळ्या आदर्श मतदान केंद्राना तसेच विशेष मतदान केंद्राना सारखेपणा यावा याचे नियोजन केले जात असून नियोजन पूर्ण होताच संबधित बँकांकडे दिले जाईल. त्यानुसार ती व्यवस्था करतील.

कशी असेल सजावट

मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी एक आकर्षक कमान उभारलेली असेल, त्यानंतर 10 x 15 आकाराचा मंडप उभारला जाईल, खाली रेड कार्पेट असेल, सगळीकडे फुलाची सजावट असेल, एक सेल्फी पॉईंट असेल, फ्लेक्स लावले जातील अशी माहितीही झा यांनी दिली.

या बँकाचा आहे सहभाग सेंट्रल बँक ऑफ इंडिया,स्टेट बँक ऑफ इंडिया, एच.डी.एफ.सी बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, आय सी आय सी आय बँक, आय डी बी आय बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक,येस बँक,बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युको बँक, आय डी एफ सी प्रथम बँक, भारतीय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक या बँका पुढे आल्या आहेत. या सर्व बँकानी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महोत्सवात पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष कौतुक केले आहे.

00 00 00 00

No comments:

Post a Comment