Monday, 3 October 2016

‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने’मुळे ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदलणार : मुख्यमंत्री

समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेमुळे
ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदलणार : मुख्यमंत्री
            मुंबई, दि. 3 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घोषित केलेल्या  व  लोकार्पण केलेल्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याणयोजनेमुळे ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदलणार असे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले.
            महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रोजगार हमी विभागातर्फे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याणयोजना पुस्तिकेचे प्रकाशन तसेच फ्लेक्सचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास रोहयो मंत्री जयकुमार रावल, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरजलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशीरोहयो सचिव डॉ. पुरुषोत्तम भापकर, श्यामसुंदर पालीवाल (राजस्थान)श्री. प्रकाश पागे तसेच वरिष्ठ अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ही एक अत्यंत महत्वाकांक्षी लोकोपयोगी योजना सुरु केली आहे. महात्मा गांधी यांनी दिलेला आदर्श  ग्रामविकासातून भारताच्या समृध्दीचा मार्गतसेच लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानहा नारा खऱ्या अर्थाने आज सार्थ झाला आहे. महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंतीच्या या पवित्र दिनी हा त्यांना मानाचा मुजरा आहे. त्यांची तत्वे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याणया योजनेमुळे आज खरी साकार होणार आहेत.
श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे तसेच ग्राम निर्मल व स्वच्छ करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न या योजनेमुळे साकार होणार आहे. नरेगाच्या माध्यमातून समृध्दी आली आहे. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेबाबत रोहयो मंत्री रावल, रोहयो सचिव डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
श्री. रावल म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात देखील या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे व्हावीत याकरिता रोजगार हमी योजना विभागाने 'समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना' तयार केली आहे. या योजनेंतर्गत प्रमुख 11 कलमी कामे मोहीम स्वरुपात घेण्याचे ठरवून योजनेंतर्गतचा खर्च सुमारे 10,000 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेमुळे ग्रामीण भाग दुष्काळमुक्त होऊन शेतकरी समृध्द होईल. पुढच्या काळापर्यंत या योजनेतील सर्व कामे पूर्ण केली जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. भापकर म्हणाले की, अहिल्यादेवी सिंचन विहीरी, अमृतकुंड शेततळे, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव तलाव व इतर जलसंधारणाची कामे, अंकुर रोपवाटिका, नंदनवन वृक्ष लागवड, संगोपन व संरक्षण तसेच ग्राम सबलीकरणाची समृद्ध ग्राम योजना ही 11 कलमी कामे पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

००००

No comments:

Post a Comment