Monday, 24 October 2016

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा : प्रातांधिकारी शरद पवार


आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा
                                                : प्रातांधिकारी शरद पवार

       चाळीसगाव दि. 24 (उमाका वृत्तसेवा) :  नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाला असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली  आहे. निवडणूक काळात घोषीत कलखंडात सर्व राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष ,अपक्ष उमेदवार तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि जनतेने आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक-2016 तथा उप विभागीय अधिकारी शरद पवार यांनी तहसिल कार्यालय,चाळीसगाव येथे आयोजित बैठकीत दिल्या.
            यावेळी तहसिलदार कैलास देवरे, नायब तहसिलदार (निवडणूक) विजय सुर्यंवशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारींसह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          राज्य निवडणूक आयोगाकडून 19 ऑक्टोंबर, 2016 रोजी  नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून दिनांक 24 ते 29 ऑक्टोंबर 2016 दरम्यान सकाळी 11:00 ते दुपारी 03:00 वाजे पर्यंत नामनिर्देशनपत्र  निवडणूक निर्णय अधिकारी, नगर पालीका चाळीसगांव येथे स्विकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी व वैध अर्जांची यादी दिनांक 02 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 03 वाजेपर्यंत जाहिर होईल.अर्ज माघारीची अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 03:00 वाजेपर्यंत असणार आहे तर त्याच दिवशी अंतीम निवडणूक लढविणाऱ्या वैध उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाईल. 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान तर 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणीला सुरवात होणार असून निवडणूकीचा अंतीम निकाल जाहीर करण्यात येईल.
            उमेदवारासह राजकीय पक्षांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर शेड्युल बँकेत खाते उघडून याच खात्यातून निवडणूक खर्च करणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी करावयाच्या खर्चाबाबतच्या अटी व शर्तींबाबत  मार्गदर्शनही या बैठकीत करण्यात आले.  उमेदवारांनी प्रचार प्रसिध्दीसाठी होर्डींग, जिंगल्स प्रसारणापुर्वी प्रशासनाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या परिसरात उमेदवारांना बुथ लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे. आचारसंहिता लागू असलेल्या काळात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी . आदर्श आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितांवर त्वरीत गुन्हे दाखल करण्यात येतील.
        तरी निवडणूक काळात सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2016 तथा उप विभागीय अधिकारी शरद पवार यांनी  केले आहे.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment