Thursday, 27 October 2016

कुटूंबनिवृत्ती व निवृत्तीवेतनधारकांच्या हयातीच्या दाखल्याची यादी बँकांकडे

कुटूंबनिवृत्ती व निवृत्तीवेतनधारकांच्या
 हयातीच्या दाखल्याची यादी बँकांकडे
मुंबई, दि. 27 :  आखिल भारतीय सेवेतून  सेवानिवृत्त झालेले अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्ती व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी दि. 1 नोव्हेंबर 2016 नंतर सादर करावयाच्या हयातीच्या दाखल्यांची अद्ययावत यादी निवृत्तीवेतनधारकांच्या आद्याक्षरानिहाय निवृत्तीवेतनधारकांच्या बँकांकडे पाठविण्यात आल्याचे अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळवले आहे.
            निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतील त्या बँकेत त्यांनी दि. 1 नोव्हेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2016 या कालावधीत प्रत्यक्ष हजर राहून यादीतील त्यांचे नाव पाहून स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकाच्या समक्ष स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा. (पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास नोंदवावी )
ऑनलाईन ही उपलब्ध
या पद्धतीने सेवानिवृत्तीधारकाना हयातीचा दाखला भरून देता येईल किंवा राष्ट्रीय सूचना केंद्र, पुणे यांच्या http://jeevanpramaan.gov.inया संकेतस्थळावर जीवनप्रमाण दाखला सादर करण्याची सोय उपलब्ध आहे. अधिदान व लेखा कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी चालू वर्षी दि. 1 नोव्हेंबर 2016 नंतर सादर करावयाचे हयातीचे दाखले या संकेतस्थळावरून नोंदणी करून सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जीवनप्रमाण पोर्टलवर नोंदणी करतांना निवृत्तीवेतनधारकाने त्यांच्या निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक (PPO NO)अचूक नोंदवणे आवश्यक आहे
जे निवृत्तीवेतनधारक अधिदान व लेखा कार्यालयात समक्ष उपस्थित राहून जीवनप्रमाण पोर्टलद्वारे जीवनप्रमाण संगणकीकृत हयातीचा दाखला ( DIGITAL LIFE CERTIFICATE)सादर करू इच्छितात त्यांच्यासाठी अधिदान व लेखा कार्यालयात निवृत्तीवेतन शाखेत सुविधा कक्ष निर्माण करण्यात आला आहे.
जे निवृत्तीवेतनधारक नजीकच्या आधारकेंद्राद्वारे अथवा खासगी सुविधा केंद्राद्वारे संगणककृत जीवनप्रमाण हयातीचे दाखले सादर करू इच्छितात त्यांनी प्रथम या अधिदान व लेखा कार्यालयाकडे त्यांचा  PPO NO  अचूक असल्याची खात्री करून घ्यावी.
ज्या निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या नावासमोरील स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा केला नसेल किंवा संगणकीकृत जीवनप्रमाण दाखला  (DIGITAL LIFE CERTIFICATE) सादर केले नसेल त्यांचे निवृत्तीवेतन माहे डिसेंबर 2016 पासून स्थगित करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन ही या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.

००००

No comments:

Post a Comment