Saturday, 8 October 2016

शासनाच्या योजना उपेक्षितांपर्यंत पोहचवून त्यांचा विश्वास संपादन करा : आमदार उन्मेश पाटील


शासनाच्या योजना उपेक्षितांपर्यंत पोहचवून
त्यांचा विश्वास संपादन करा
                                                : आमदार उन्मेश पाटील
        चाळीसगाव दि. 8 (उमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृध्द करणारी महाराष्ट्र शासनाची जलयुक्त शिवार योजना फलदायी ठरत आहे. शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात, त्या उपेक्षितांपर्यंत पोहचवून त्यांचा विश्वास संपादन करण्याच्या सुचना आज आमदार उन्मेश पाटील यांनी दिल्या.
            जिल्हाभरात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांवर आधारित माहितीपट निर्मीती करुन शेतकऱ्यांमध्ये जलप्रबोधन होण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत माहितीपटाची निर्मीती करण्यात येत आहे. या माहितीपटाचा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच मनोहर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मिलींद दुसाणे, तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत, कृषी अधिकारी अनिल येवले, अविनाश चंदीले, अतुल चव्हाण, वनविभागाचे श्री.पाटील, श्री.शेख, सिंचन विभागाचे श्री.शिंपी, बावीस्कर, पानलोट सचिव देवेंद्र पाटील, चित्रीकरणासाठी आलेले ब्रिज कम्युनिकेशनचे संचालक मिलींद पाटील व त्यांची टिमसह ग्रामस्थ, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी महाळशेवगे येथील जलयुक्तच्या कामांचे ब्रिज कम्युनिकेशनमार्फत स्थळ चित्रीकरणासह ड्रोनच्या माध्यमातून हवाई चित्रीकरण करण्यात आले. यावेळी मुलाखतीमध्ये आमदार पाटील म्हणाले, महाळशेवगे येथे विविध विभागामार्फत जलयुक्तची 41 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. पैकी 36 कामे पुर्ण झाली असून यावर शासनाने 68 लाख इतका निधी खर्च केला आहे. या 36 कामांमुळे 253 टि.एम.सी. इतका पाणीसाठा झाल्यामुळे गावातील शेतकरी खऱ्या अर्थाने सुखावला आहे. तालुक्यात पहिल्या टप्प्यात 24 तर दुसऱ्या टप्प्यात 20 गावांचा अंतर्भाव या योजनेत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील 940 प्रस्तावीत कामांपैकी 767 कामे पुर्ण झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 562 कामे प्रस्तावित करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले. शासनामार्फत शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून शासन शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबवित असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन उपेक्षितांपर्यंत योजना पोहचविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित विविध विभागांच्या  अधिकाऱ्यांना दिल्या.
            यावेळी गावातील लाभार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या, तर कृषीसह, वनविभाग, सिंचन विभागामार्फत गावात झालेल्या जलयुक्तच्या कामांचे चित्रीकरणही करण्यात आले.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment