Friday, 2 May 2025

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न


        जळगाव, दि. १ मे (जिमाका वृत्तसेवा): - राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी, याकरिता जिल्हास्तरावर ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षाचे उद्घाटन मा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्ह्याच्या कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ चौधरी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते. या निधीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. त्यानंतर २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत जिल्हास्तरीय कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले.

पूर्वी रुग्ण व त्यांचे नातेवाईक सहाय्यता निधीसाठी मंत्रालयात वारंवार जावे लागत होते. या त्रासातून मुक्तता मिळावी, यासाठी जिल्हा स्तरावरच सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला असून, त्यामुळे अर्जदारांना स्थानिक पातळीवरच मार्गदर्शन, कागदपत्र पडताळणी व पाठपुरावा करता येणार आहे.

No comments:

Post a Comment