Monday, 26 May 2025

खरीप हंगाम जागृती लेखमाला – भाग ६



शाश्वत शेतीकडे वाटचाल....!!

आजच्या घडीला शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून सुपीकता कमी होत चालली आहे. परिणामी, उत्पादन खर्च वाढतो, उत्पन्नावर परिणाम होतो आणि पर्यावरणावरही गंभीर दुष्परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘दहा टक्के रासायनिक खत बचतीची मोहीम’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांनी काही सोप्या उपाययोजना अमलात आणल्यास रासायनिक खताचा वापर कमी करता येतो आणि जमिनीचे आरोग्य सुधारते.
सर्वप्रथम, मातीची तपासणी करून त्याचा अहवाल मिळवणे अत्यावश्यक आहे. या अहवालाच्या आधारेच पिकाला आवश्यक त्या अन्नद्रव्यांची योजना आखता येते. जमिनीचा सुपीकता निर्देशांक लक्षात घेऊन रासायनिक खतांची मात्रा दहा टक्क्यांनी कमी करावी व त्याऐवजी सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. यात शेणखत, गांडुळखत, कंपोस्टखत, हिरवळीचे खते तसेच सूक्ष्मजीव मिश्रित खते यांचा समावेश होतो. यामुळे केवळ खतांची बचतच होत नाही, तर जमिनीतील सजीव क्रियाशीलतेलाही चालना मिळते.
बियाण्यांवर रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, पीएसबी (स्फुरद विरघळविणारे जीवाणू) यासारख्या जीवाणू संवर्धकांची प्रक्रिया करावी. यामुळे नत्र व स्फुरद अन्नद्रव्यांची गरज कमी होते. ताग, धेंचा, सुबाभुळ, चवळी, गवार यांसारखी झाडे जमिनीत हिरवळीचे खत म्हणून वापरल्यास जमिनीतील सेंद्रिय घटकांची वाढ होते.
ठिबक सिंचनासारख्या पाण्याच्या कार्यक्षम पद्धतींचा वापर करून विद्राव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा. बीबीएफ (रुंद सरी वरंबा) पद्धतीने पेरणी करताना खतही योग्य प्रमाणात टाकावे. तसेच पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसारच खतांचा वापर करावा. पिकांची फेरपालट (crop rotation) केल्यास जमिनीची विशिष्ट अन्नद्रव्यांवरील अवलंबनता कमी होते.
तुर, मुग, उडीद, सोयाबीन यांसारख्या डाळिंब पिकांकरिता बियाण्यावर रायझोबियम प्रक्रिया केल्यानंतर युरियाची दुसरी मात्रा टाळावी. सोयाबीन पिक वाढीच्या अवस्थेत २ टक्के युरियाची फवारणी करावी आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत ०:३४:५२ या खताची द्रवरूप फवारणी केल्यास पिकाच्या वाढीस चालना मिळते.
तृणधान्य पिकांना युरिया खत देताना ते जमिनीवर फेकण्याऐवजी जमिनीत मिसळून द्यावे. कापूस पिकासाठीही युरिया फवारणीच्या स्वरूपात द्यावा म्हणजे खताचा वापर कमी होतो आणि परिणाम अधिक चांगला मिळतो. युरिया वापरताना झिंक लेपित (झिंक कोटेड) किंवा कडूनिंब लेपित (निम कोटेड) युरिया वापरल्यास खताचे झपाट्याने होणारे अपायकारक विरघळणे टाळता येते.
ऊस पिकासाठी, काढणीनंतर ऊसाची पाचट जमिनीतच कुजविल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, जो जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे.
शेतकरी बांधवांनो, रासायनिक खतांचा वापर नियंत्रित करतानाच सेंद्रिय व जैविक घटकांचा प्रभावी उपयोग केल्यास जमिनीचे आरोग्य सुधारते, उत्पादन खर्चात बचत होते आणि शेती अधिक फायदेशीर ठरते. खत बचत ही केवळ आर्थिक नव्हे तर पर्यावरणीय बाबही आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा :
आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

No comments:

Post a Comment