Friday, 28 March 2025

जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच दिवशी 34,423 घरकुलांचे भूमिपूजन




जळगाव, दि. 28 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 34,423 घरकुलांचे भूमिपूजन 27 मार्च 2025 रोजी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये सन 2024-25 या वर्षात एकूण 86,689 घरकुल मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 71,645 लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला. या अनुषंगाने 4 मार्च 2025 रोजी विशेष मोहीम राबवून 35,264 घरकुलांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली होती.
आजच्या विशेष अभियानाअंतर्गत 34,423 घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे आतापर्यंत एकूण 70,687 घरकुलांचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंते आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या कामाच्या सातत्यपूर्ण अनुषंगाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी तालुकास्तरावर भेटी देऊन लाभार्थ्यांना प्रेरित केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व गटविकास अधिकाऱ्यांना नियमित पाठपुरावा करून काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सुरू असलेला हा वेग गृहनिर्माण क्षेत्रात जळगाव जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.

आदिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठ काम करत असल्याचे पाहुन प्रभावित झालो; विद्यापीठाला याकामी सहकार्य करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके



जळगाव, दि.२८ (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ज्या पध्दतीने काम करते आहे ते पाहुन प्रभावित झालो असून याकामी विद्यापीठाला सहकार्य करत राहण्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “आदिवासी वारसा ओळख आणि अस्तित्वाचा उत्सव” (सेलिब्रेटींग ट्रायबल हेरीटेज फॉर इटस आयडेंटीटी ॲण्ड एक्झिस्टन्स) आणि “आदिवासी समुदायाच्या संशोधन पध्दती आणि तंत्रज्ञान” या दोन विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे एकत्रित उद्घाटन करतांना डॉ.उईके बोलत होते.
अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी होते. विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या स्वामी विवेकांनद अध्ययन व संशोधन केंद्र, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा तसेच आदिवासी अकादमी यांच्या वतीने या दोन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके म्हणाले की, आदिवासी समुदायाची संस्कृती वेगळी आहे. हा समाज प्रामाणिक, सन्मान करणारा आणि विश्वासू आहे. तो आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतो आहे. मात्र जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी हा समाज आपली संस्कृती विसरणारा नाही. ही संस्कृती संपुष्टात येणारी नाही. या समाजाच्या विकासासाठी कौशल्यविकासाची तसेच सुक्ष्म आणि लघु उद्योगाची गरज आहे. विद्यापीठाच्या नंदुरबार येथील आदिवासी अकादमीच्या माध्यमातुन विद्यापीठाच्या विविध प्रस्तावासाठी राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्यापर्यंत चर्चा करुन पाठपुरावा केला जाईल असेही डॉ.उईके म्हणाले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विविध क्षेत्रात आदिवासी समुदायाच्या योगदानाची दखल घेतली गेली नाही याबद्दल खंत व्यक्त केली.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या विद्यापीठामार्फत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची तसेच विविध अभ्यासक्रमांची माहिती त्यांनी दिली. प्रारंभी विवेकानंद संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.अतुल बारेकर, आदिवासी अकादमीचे प्रभारी संचालक प्रा.के.एफ.पवार, तसेच व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालक प्रा.मधुलिका सोनवणे यांनी आयोजना मागील भूमिका सांगितली.यावेळी विद्यापीठाच्या वतीने सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिंनी सन्मान योजनेअंतर्गत ९ विद्यार्थिनींचा प्रा.उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, नितिन झाल्टे, चैत्राम पवार, वैभव सुरंगे, प्रा.म.सु.पगारे, प्रा.मधुलिका सोनवणे, प्रा.के.एफ.पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.कविता सोनी व खेमराज पाटील यांनी केले.सामाजिक कार्यकर्ते किशोर काळकर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
वैभव सुरंगे यांचे बीजभाषण
सामाजिक कार्यकर्ते वैभव सुरंगे यांनी आपल्या बीज भाषणात आदिवासी समुदायाच्या विविध संस्कृतीची माहिती दिली. आदिवासी समुदायाचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होत मात्र देशभर या समुदायाला ओळख मिळाली नाही. या समाजात महिला आणि पुरुषांना बरोबरीचा दर्जा आहे. मात्र या समाजाची ओळख चुकीच्या पद्धतीने मांडली गेली त्यामुळे देशभरातील संशोधकांनी नव्याने या समाजाचे संशोधन करावे. संशोधन करणाऱ्याची दृष्टी सकारात्मक असावी तसेच संशोधन पध्दती योग्य असायला हवी. त्यासाठी या समाजाची ताकद आणि ज्ञान जाणून घ्या. संशोधनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची अस्मिता समोर यायला हवी अशी अपेक्षा सुरंगे यांनी व्यक्त केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री चैत्राम पवार यांची मुलाखत प्रा. म.सु.पगारे व प्रा. मधुलिका सोनवणे यांनी घेतली. चैत्राम पवार यांनी जल, जंगल, जमीन, पशुधन यांच्या संवर्धन, संरक्षण यासाठी बारीपाडा आणि त्या भागात केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ!


                        जळगाव दि. 28  (जिमका): केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने (हमीभाव) नाफेड अंतर्गत २०२४-२५ हंगामातील तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकरी ८ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव अशा एकूण १६ खरेदी केंद्रांवर ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

                तुर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी अंतिम तारीख ८ एप्रिल २०२५ आहे. तर खरेदीचा कालावधी १३ फेब्रुवारी २०२५ ते १३ मे २०२५ दरम्यान असणार आहे. तुर हमीभाव ७५५० रुपये प्रति क्विंटल इतका आहे. 

            शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबुक, ऑनलाइन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा आणि ८ अ ही कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक मंत्री संजय वामनराव सावकारे, उपाध्यक्ष रोहितदादा दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार आणि प्र. जिल्हा पणन अधिकारी एस.एस. मेने यांनी केले आहे.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांचा जळगाव जिल्हा दौरा


                     जळगाव दि. 28 (जिमका):- राज्याचे आदिवासी विकास, मंत्री डॉ. अशोक वुईके यांचा जळगाव  जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे, शुक्रवार दिनांक 28 मार्च, 2025 रोजी सकाळी 6.20 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन,सकाळी 10.00 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव येथे आगमन व राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित, सकाळी 11.00 वाजता जळगाव येथून चिखली जि. बुलढाणा कडे प्रयाण

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींसाठी महत्वाची सूचना: ११ एप्रिलपर्यंत आधार नोंदणी अनिवार्य


जळगाव, दि. २8 (जिमका): मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी आधार नोंदणी (Aadhar Validation) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित आस्थापनांनी त्यांच्या प्रशिक्षणार्थींची आधार नोंद CMYKPY पोर्टलवर करावी, अन्यथा विद्यावेतन देता येणार नाही , अशी माहिती सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संदीप गायकवाड यांनी दिली.


ही नोंदणी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या INTERN LOGIN मध्ये ११ एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करावी लागेल. या योजनेंतर्गत प्रशिक्षण कालावधी ११ महिने निश्चित करण्यात आला असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवार संबंधित आस्थापनात रुजू झाल्यास पाच महिन्यांचा अतिरिक्त कालावधी कार्यप्रशिक्षणासाठी अनुज्ञेय राहील.


संबंधित आस्थापनांनी त्यांच्या नवीन व सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांची आधार नोंदणी वेळेत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ११ एप्रिल २०२५ पूर्वी आधार नोंदणी न केल्यास प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन मिळणार नाही, याची संबंधित आस्थापनांनी नोंद घ्यावी.

हजारो शोकाकुलांनी दिला शहीद वीर जवान अर्जून बावस्कर यांना दिला वरणगावात अखेराचा निरोप






जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) -  सैन्यदलाचा वीर जवान अर्जून बावस्करला दि २४ मार्च  रोजी अरुणाचल प्रदेशातील नियंत्रण रेखास्थित डोपावा येथे कर्तव्य बजावीत असताना विरमरण आले होते.  आज दि २७ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हजारो शोकाकुल  नागरिकांनी 'वीर जवान अमर रहे' घोषणा देत अखेरचा निरोप देत त्यांच्या दोघा मुलांनी अग्नी डाग देऊन शासकिय इतमात अंतिम संस्कार करण्यात आले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष भेटून कुटुंबाचे सांत्वन केले. 

    सिध्देश्वर नगर परिसरातील सम्राट नगर मधील व भारतीय सैन्य दलातील जवान अर्जून लक्ष्मण बावस्कर (३५) यांना अरुणाचल प्रदेशात धोपावा या ठिकाणी कर्तव्यावर विरमरण आले होते. लष्करी प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर त्यांचे पार्थिवदेह छत्रपती संभाजीनगर येथे आज गुरुवार दि २७ मार्च रोजी सकाळी लष्करी वाहनाने घरी आणण्यात आले. त्यावेळी सोबत 10 महार रेजिमेंटचे सुभेदार जरनेल सिंग होते.तसेच संभाजीनगर वरून 97 आर्टिलरी ब्रिगेडचे लेफ्टनंट अमित शहा आलेले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी  पंचक्रोशीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर त्यांच्या अंतिमयात्रेसाठी हार व फुलांनी सजविण्यात आलेल्या वाहनात तिरंग्यात चिरनिद्रेत ठेवून अंत्ययात्रा निघाली. सिध्देश्वर नगर , वामन नगर , बस स्थानक चौक , प्रतिभा नगर मार्गे  जात असताना 'वीर जवान अमर रहे , भारत माता  की जय ' अशा घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी बस स्थानक चौकातील तिरंगा ध्वजा जवळ मानवंदना देण्यात आली होती.

    उप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिम यांत्रा पोहचल्या नंतर वीर जवनाला लष्कर , पोलीस प्रशासन , जिल्हा प्रशासन , विविध राजकिय पक्ष , सामाजिक संघटना , नगर परिषद प्रशासन ,माजी नगर सेवेक , पंचक्रोशीतील माजी सैनिक व नागरिकांनी पुष्पचक्र अपर्ण करीत श्रद्धांजली वाहिली.  लष्करी जवानांनी व पोलीस प्रशासनाने हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. त्यांच्या पार्थीव देहावर शासकीय अंतिम संस्कार करताना त्यांच्या दोन्ही मुलांनी अग्नी डाग दिला.

   जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. एकनाथ खडसे  यांनी प्रत्यक्ष कुटुंबाला भेटून सांत्वन केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश प्रकाश पाटील, उप विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील , मुख्याधिकारी सचिन राऊत , सह पोलीस निरिक्षक जनार्धन खंडेराव, एस सिद्धीचे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक परिवार यांची उपस्थिती होती.

दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्थेत वनरक्षक प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत समारंभ

                              जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) : दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था, पाल येथे दिनांक २७ मार्च रोजी नवनियुक्त वनरक्षक प्रशिक्षण सत्राचा (सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२५) दीक्षांत समारंभ आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

                सहा महिन्यांच्या या प्रशिक्षण सत्रात नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक वनवृत्तातील एकूण ५३ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षण सत्रात वानिकी आणि संबंधित २१ विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन तिमाही परीक्षा आणि सेमिनार देखील घेण्यात आले.या परिक्षांमध्ये सर्व ५३ प्रशिक्षणार्थी हे उत्तीर्ण झालेले असून,त्यापैकी ७ प्रशिक्षणार्थींनी ७५% पेक्षा जास्त गुण मिळवून ‘सन्मान प्रमाणपत्र’ पटकावले, तर उर्वरित ४६ प्रशिक्षणार्थींना ‘उत्तीर्ण प्रमाणपत्र’ देण्यात आले. या सत्रापासून सर्व वनरक्षक प्रशिक्षणार्थींना एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या चेतना केंद्रातर्फे ‘Certificate Programme in Forestry’ या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले.

         सत्राच्या परीक्षेत विशिष्ट विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. ज्यात,

वन संवर्धन व वन व्यवस्थापन भाग-१.२.३ जेएफएम कार्यक्रम, वन उपयोगिता पदक: नंदकिशोर जनार्धन थोरात

वन्यजीव व्यवस्थापन, जैवविविधता व्यवस्थापन, कुरण व्यवस्थापन विषयक पदक: जीवन केरप्पा चोरमले

अभियांत्रिकी व सर्वेक्षण पदक: नंदकिशोर जनार्धन थोरात

  वन विषयक कायदा:  अमोल बालासाहेब सोनवणे

  क्रॉस कंट्री पदक: शुभम नारायण जाधव

  सर्वोत्कृष्ट/अष्टपैलू गुणसौजन्यपूर्ण वागणूक, प्रत्येक कार्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी: विठ्ठल शंकर मुळे

                 प्रशिक्षण सत्रात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या नंदकिशोर जनार्धन थोरात यांना सुवर्णपदक, स्वप्नील डिलेराम गाते यांना रौप्य पदक व अनिल गुलाबराव वाघ यांना कांस्य पदकांने गौरविण्यात आले. कार्यक्रमात दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्थेचे संचालक हेमंत शेवाळे यांनी सत्राचा अहवाल आणि निकाल वाचन केले. तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे वनवृत्त धुळे राजेंद्र सदगीर आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ पुणे संकुलचे प्राध्यापक डॉ. सचिन देवरे उपस्थित होते. त्यांनी नवप्रशिक्षितांना मार्गदर्शन केले आणि वन, वन्यजीव संवर्धन आणि मानव वन्यजीव संघर्षाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

              कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जमीर शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि भविष्यात प्रशिक्षणाचा उपयोग वनसंरक्षण, वनव्यवस्थापन आणि वनसंवर्धनात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास वन प्रशिक्षण संस्थेतील वनक्षेत्रपाल अंजली बोरावार, वनक्षेत्रपाल अजय बावणे, व्याख्याते रागीब अहमद, संस्थेतील लेखापाल, लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. प्रशिक्षणार्थींचे पालक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा

 

                     जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) : केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 29 मार्च  ते 01 एप्रिल  2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे

                     शनिवार, दिनांक 29 मार्च, 2025 रोजी सकाळी 07 वाजता  छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मोटारीने मुक्ताईनगरकडे रवाना. सकाळी 10.30 वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे आगमन. दुपारी 12 ते संध्याकाळी 06 वाजेपर्यंत मुक्ताईनगर निवासस्थानी  शासकीय काम आणि स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.

                     रविवार, दिनांक 30 मार्च, 2025 रोजी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगावकडे प्रस्थान. सकाळी 10.30 वाजता जळगाव येथे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 03 वाजेपर्यंत भाजप कार्यालय, जळगाव येथे कार्यकर्त्यांशी बैठक. दुपारी 03 वाजता जळगाव येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रस्थान.  दुपारी 3.30 वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे आगमन. संध्याकाळी 04 ते 06 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.

               सोमवार, दिनांक 31 मार्च, 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम आणि स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बैठक दुपारी 02 ते  संध्याकाळी 06 वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 06 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीन छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान. रात्री 09.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.

Wednesday, 26 March 2025

जात प्रमाणपत्र पडताळणीसमितीतर्फे विशेष त्रुटी पुर्तता मोहिमेचे आयोजन

जळगाव, दि. 26 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) : शैक्षणीक वर्ष २०२४-२५ वर्षात १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले तसेच सेवा, निवडणूक प्रयोजनार्थ जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल केलेले मागासगर्वीय विदयार्थी तसेच उमेदवार यांच्याकरीता जात प्रमाणपत्र पडताळणीसमिती तर्फे विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. ही त्रुटी पुर्तता मोहिम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवस उदिष्ठ कार्यक्रमानुसार राबविण्यात येत आहे.

अशा विदयार्थ्यांनी / उमेदवारांनी अर्ज दाखल केल्या नंतर ज्या मागासवर्गीय विदयार्थी/उमेदवारांच्या अर्जाना ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेल्या आहे. अशा विदयार्थ्यांच्या उमेदवारांच्या अर्जावर त्रुटी पुर्ततेकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दिनांक २७ मार्च २०२५ ते २८ मार्च २०२५ व ०३ एप्रिल २०२५ ते ०४ एप्रिल २०२५ तसेच ०८ एप्रिल २०२५ ते ०९ एप्रिल २०२५ या कलावधीमध्ये त्रुटी पुर्तता कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.
संबंधीत विदयार्थ्यांनी या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीर समोर महाबळ जळगाव येथे प्रत्यक्षात उपस्थित राहुन त्रुटी बाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात करावी. जेणेकरुन विदयार्थ्यांचे अर्ज निकाली काढणे सोईचे होईल असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव श्रीमती. एन. एस. रायते यांनी केले आहे.

अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण; 27 मार्च रोजी मुलाखती


जळगाव, दि. 26 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) : रावेरच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना 1 एप्रिल 2025 ते 15 जुलै 2025 या कालावधीत स्पर्धा परिक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याकरीता २७ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाद्वारे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे ‌.
प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक) महाराष्ट्राचा रहिवासी असावा.शालांत परीक्षा (इयत्ता १० वी) उत्तीर्ण असावा. वय १८ वर्ष पूर्ण असावे. वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांकडून विविध शासकीय/ निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची पूर्वतयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना उपस्थितीनुसार दरमहा रूपये १००० विद्यावेतन व प्रशिक्षण पूर्ण केल्यावर ४ पुस्तकांचा मोफत संच प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, १० वी, १२ वी व पदवी गुणपत्रिका, आधार कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला या कागदपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रतीसह स्व:खर्चाने उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २. शनी मंदीरामागे स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर किंवा संपर्कासाठी दूरध्वनी ०२५८४-२५१९०६, या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

जळगावमध्ये 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने' अंतर्गत तरुणांना रोजगार संधी!

जळगाव, दि. 26 मार्च ( जिमाका वृत्तसेवा) : जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' अंतर्गत १७३ हून अधिक रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. युवक-युवतींना शासकीय व खाजगी आस्थापना / उद्योजकांकडे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, तसेच गरजू युवकांना रोजगाराची संधी आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध हा योजनेचा उद्देश आहे.

उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतन देण्यात येणार आहे. यात १२ वी पास: रु. ६,०००/- प्रति महिना, आय.टी.आय. / पदविका: रु. ८,०००/- प्रति महिना व पदवीधर / पदव्युत्तर: रु. १०,०००/- प्रति महिना विद्यावेतन देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध नामांकित आस्थापनांमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.
बेबसाईटवर ऑनलाईन अप्लाय करण्याची कार्यप्रध्दती
www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्या. INTERN LOGIN हा पर्याय निवडून SIGN UP करावे. LOGIN झाल्यावर Apply for job या पर्यायावर क्लिक करावे तसेच, आस्थापनेने टाकलेल्या वरिल पैकी रिक्तपदास Apply करावे व संबंधित आस्थापनेशी संपर्क साधावा.
याबाबत काही अडचणी आल्यास अथवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 09.45 ते सांयकाळी 06.15 वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी 0257-2959790 वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांची ‘दिलखुलास’ मध्ये 27 ते 29 मार्चला मुलाखत

मुंबई दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, स्वाती पांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार दि. 27, शुक्रवार दि.28 आणि शनिवार दि. 29 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.

ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करित आहे. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना दळणवळणाची पुरेशी सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. याच दृष्टीकोनातून विमान वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात येत असून ग्रामीण उत्पादकांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला शहरी बाजारपेठेशी जोडणे, समन्वय साधणे यासाठी शासनस्तरावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मार्फत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याअनुषंगानेच नागरी आणि खासगी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, हरित आणि स्मार्ट विमानतळ विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. याविषयी 'दिलखुलास' कार्यक्रमात पांडे यांनी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष इमारतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

 


जळगाव जिल्ह्यात आधार संच वितरणाची संधी; अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 26 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) : माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय, मुंबई यांचे कडून जळगाव जिल्ह्यास आधार संच प्राप्त झाले आहेत. ज्या महसुल मंडळात सद्यस्थितीमध्ये आधार केंद्र नाही अश्या 25 महसुल मंडळ तसेच ७ शहरी भाग मध्ये आधार केंद्र वाटपा बाबत दिनांक २४ मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या संदर्भात मात्र आपले सरकार केंद्रचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.jalgaon.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, रिक्त महसुल मंडळाचे नावे व आवश्यक माहिती प्राप्त करून घ्यायची आहे.

इच्छुक आपले सरकार केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक 02 एप्रिल 2025 पर्यंत संध्याकाळी 5.00 पर्यंत https://forms.gle/Bn1s4filH1SDDQB97 या गूगल लिंक वर पाठवावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळातील विद्यार्थी प्रथमच विधान भवनाला भेट देण्यासाठी रवाना.

जळगाव दि. 26 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) : इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमच विधानभवनाला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. या अभ्यास भेटीत विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

नाशिक विभागातील तांडा, वाडी-वस्त्यांवरील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळावी यासाठी ही अभ्यास भेट आहे. यासाठी जळगाव विभागाचे 14 विद्यार्थी व 1 शिक्षिका आणि 1 शिक्षक आणि 41 विद्यार्थी यी अभ्यास भेटीसाठी रवाना झाले आहेत.
यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधानसभेचे कामकाज पाहता येणार आहे. आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जाऊन राष्ट्राची प्रगती साधावी, हा शासनाचा यामागील उद्देश आहे.
या अभ्यास भेट दरम्यान विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला, तारांगण या ठिकाणांना देखील विद्यार्थी भेट देतील असा मानस आहे. शासनाच्या विविध उपक्रमांद्वारे विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दार खुले करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे. या अभ्यास भेटीसाठी सचिव विनोद सिंघल ,संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी, नाशिक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक भगवान वीर, सहायक संचालक योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा; ग्रामपंचायत सदस्यांना कर भरण्याचे आवाहन

                      जळगाव दि. 26 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) - जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना 31 मार्च 2025 पर्यंत त्यांच्या ग्रामपंचायतींकडे असलेल्या कराची थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. 

               जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी 31 मार्च 2025 पर्यंत त्यांच्या कराची थकबाकी भरलेली नाही, त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. कर भरण्याची पावती मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत कर न भरल्यास संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य पदावरून, ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच पदावरून अपात्र ठरू शकते.

          जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रामपंचायत सदस्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या स्थानिक ग्रामपंचायतीकडून कर भरण्याच्या अंतिम मुदतीची माहिती घ्यावी. तसेच, ज्या सदस्यांना कराची पावती मिळाली नसेल, त्यांनी ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधून थकबाकीची पावती मिळवावी आणि मुदतीत भरणा करावा. वेळेत कराचा भरणा न केल्यास थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Tuesday, 25 March 2025

जिल्ह्यातील सर्व निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च रोजी सुरु राहणार


        जळगाव, दिनांक 25 मार्च, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र मुद्रांक शुल्क संबंधीचे कामकाज तसेच आर्थिक वर्ष 2024-2025 चा इष्टांक पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च, 2025 या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्याचे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांनी दिले आहे. अशी माहिती जळगावचे मुद्रांक जिल्हाधिकारी, सुनिल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

       वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते दरवर्षी 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने मार्च महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे पक्षकार किंवा नागरिकांना दस्त नोंदणीचे अर्ज जमा करणेसाठी शासकीय सुट्टीच्या दिवशी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु राहणार आहे. 

     तरी वरील दिवशी दस्त नोंदणीचा अर्ज जमा करण्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी सुनिल पाटील यांनी केले आहे.

जळगाव पोलीस दलाची शांतता समिती बैठक संपन्न






सण-उत्सव शांतते पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाकडून आवाहन

                     जळगाव, दि. २५ मार्च २०२५ ( जिमाका वृत्तसेवा ) : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

शांतता राखण्याची जबाबदारी पोलिसांबरोबर समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्तींनीही स्वीकारली पाहिजे. समाजात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी शांतता समिती सदस्यांनी सतर्क राहावे, असे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी सांगितले. तसेच, समाजात अज्ञानता दूर करण्यावर भर दिला पाहिजे आणि महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान योग्य प्रकारे व्हायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या सोशल मीडिया समाजात वाद आणि गैरसमज निर्माण करण्याचे प्रमुख साधन ठरत आहे. विशेषतः १५ ते २५ वयोगटातील युवक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याने वाद उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ पोहोचवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.

नागरिकांकडून विविध सूचना

शांतता समितीच्या बैठकीत नागरिकांनी पुढील महत्त्वपूर्ण सूचना दिल्या –आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट पोलिसांना तत्काळ कळवाव्यात, शहरात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ११ एप्रिल रोजी महात्मा फुले मार्केट आणि १४ एप्रिलच्या आधी मुख्य मिरवणूक मार्ग अतिक्रमणमुक्त करावा.

शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वाटप

बैठकीच्या शेवटी, जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वितरित करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केले, तर आभार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मानले.

देशभक्तीच्या रंगात न्हालं जिल्हा कारागृह "जीवन गाणे गातच जावे" संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात संपन्न


                                जळगाव, दि. 25 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) : कारागृहातील बंदी यांचा भावनिक विकास होऊन सकारात्मक विचारसरणी रुजावी, यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते. समाजविघातक प्रवृत्तीमुळे कारागृहात गेलेल्या बंदींचे समुपदेशन देशभक्तिपर गाण्यांच्या माध्यमातून व्हावे, तसेच संगीताच्या प्रभावी माध्यमातून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर नेऊन त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागवावी, या उद्देशाने "जीवन गाणे गातच जावे" या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या वतीने जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आले.

                         जिल्हा कारागृहाच्या कला भवनात झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील होते. जिल्हा कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. जे. चव्हाण, तुरुंग अधिकारी राकेश देवरे, सुभेदार सुभाष खरे, श्री. खांडरे आदी उपस्थित होते.

                           राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अप्पर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यातील सर्व कारागृहांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभक्तीपर गीतांनी भरले रंग

                      कार्यक्रमाची सुरुवात स्वर शुभम ग्रुपच्या प्रतीथयश कलाकार कपिल घुगे आणि सहकारी यांच्या सादरीकरणाने झाली. "इतनी शक्ति हमें देना दाता" या प्रार्थनेसह कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर विविध देशभक्तिपर गीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. बंदी बांधवांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद दिली. "भारत मातेच्या जयघोषाने" संपूर्ण कारागृह दुमदुमून गेले. विशेष म्हणजे, कारागृहात बंदीवास भोगत असलेल्या दोन बंदिवान बांधवांनीही भक्तिगीत व देशभक्तिपर गीते सादर केली.

शाहीर विनोद ढगे यांच्या भारुडाने प्रबोधन

                      जळगावचे सुप्रसिद्ध लोकशाहीर शाहीर विनोद ढगे आणि त्यांची "दिशा काला पथक" संस्था यांच्यातर्फे पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून भारुड सादर करण्यात आले. व्यसनमुक्ती व सकारात्मक जीवनदृष्टी यावर भर देणाऱ्या भारुडाने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.

कलावंतांचा प्रभावी सहभाग

                        स्वर शुभम ग्रुप व दिशा काला पथकाच्या १५ कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमाची सांगता स्वर शुभम ग्रुपच्या कलावंत वर्षा पाटील यांच्या "है मालिक, तेरे बंदे हम" या गाण्याने झाली. कार्यक्रमाचे समन्वयक विनोद ढगे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा संस्थेचे सचिन महाजन, मोहित पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, विनोद पाटील, आकाश भावसार, मनोज जैन यांनी मेहनत घेतली.

Monday, 24 March 2025

नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा - कुलगुरू प्रा.व्ही. एल माहेश्वरी







कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पत्रकार कार्यशाळा संपन्न 

           जळगाव, दि. 24 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) : नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा असून  विकास पत्रकारितेद्वारा सरकारी योजना जनतेपर्यत पोहचविण्याचे काम पूर्वकाळापासून प्रसारमाध्यमांनी केले आहे. असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी केले.

                    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा, विभागीय अधिस्वीकृती समिती,नाशिक व जिल्हा माहिती कार्यालय,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेत “विकास पत्रकारिता : काल, आज, उद्या” या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा.माहेश्वरी बोलत होते. यावेळी मंचावर नाशिक येथील विभागीय माहिती उपसंचालक डॉ.किरण मोघे, अहिल्यानगर येथील विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके, जळगाव येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर व जिल्हाधिकारी कार्यालयाचे 

 मिलिंद बुवा हे उपस्थित होते.

                    प्रा.माहेश्वरी पुढे म्हणाले की पूर्वीच्याकाळी लोकांपर्यंत माहिती पोहचविण्याचे काम वर्तमानपत्रे, रेडीओ, टीव्ही ही साधने करीत होती. आता तंत्रज्ञानात झालेला बदल व सोशल मिडीया या सारखी संसाधने वाढल्याने सरकारच्या योजना सर्वसाधारण जनतेपर्यंत सहज पोहचल्या जात आहेत. प्रसार माध्यमांद्वारे विकास पत्रकारितेचे काम चांगल्या पध्दतीने होत आहे. प्रारंभी प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजना मागील भूमीका सांगितली. उद्घाटनसत्राचे सुत्रसंचालन डॉ.गोपी सोरडे यांनी केले तर आभार डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी मानले.

                    उद्घाटनसत्रानंतर श्री.मिलिंद बुवा यांनी “प्रशासनात एआय चा वापर ” या विषयावर सविस्तर माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. विभागीय उपसंचालक डॉ.किरण मोघे यांनी “पत्रकारांसाठीच्या  विविध विकास योजना” या विषयावर माहिती दिली. अधिस्वीकृती पत्रिका-निकष आणि प्रक्रिया या संदर्भात विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके यांनी विवेचन केले. पुढील सत्रात जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी “शासकिय योजना आणि विकास पत्रकारिता” यावर भाष्य केले. त्यानंतर जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी “विकास पत्रकारितेतील स्थित्यंतर” या विषयावर विवेचन केले. समारोप प्रसंगी प्रा.डॉ. सुधीर भटकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील हे 31मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा यावेळी  कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार शिवलाल बारी यांनी कुलगुरुंची तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार केला.

                कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ॲड.सूर्यकांत देशमुख,मंगेश बाविसाने, सौ.रंजना चौधरी,धनंजय देशमुख, भिकन बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव बुलेटीन-2025 दिनांक 18 ते दिनांक 24 मार्च 2025

 जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव बुलेटीन-2025

दिनांक 18  ते दिनांक 24 मार्च 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जळगाव येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम









▪️ छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ऐतिहासिक ठेव्याचा दर्शन सोहळा 

                 जळगाव, दि. 24 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने प्रेक्षकांना अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावर आधारित नाट्य, संगीत व दृक-श्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा पाहण्याची संधी मिळाली. त्री जन्मशताब्दी दिनानिमित्त अहिल्यादेवींना वंदन करणारा, नमन करणारा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित शाहिरी-पोवाडे, नृत्य, नाट्य, संगीत अशा विविध कलांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाची निर्मिती परिवर्तन संस्थेच्यावतीने शंभू पाटील व नारायण बाविस्कर यांनी केली होती.

             कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी  विजयकुमार ढगे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, उद्योजक किरण बच्छाव, सुरेंद्र पाटील, नहीचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, आर्किटेक शिरिष बर्वे, नारायण बाविस्कर, सुभाष सोनवणे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. 

             याप्रसंगी अहिल्यादेवींच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, "अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हा निस्वार्थ सेवा, न्यायप्रियता आणि सामाजिक परिवर्तनाचा आदर्श आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण समाज उन्नतीसाठी कार्य करावे."

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी अहिल्याबाईंच्या कार्याचा ऐतिहासिक धांडोळा घेऊन इतिहासातील अहिल्यादेवींच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. जळगाव शहरात अहिल्यादेवींचे स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करणारे व त्यासाठी पुढाकार घेणा-यांमधील एक प्रमुख कार्यकर्ते सुभाष सोनवणे यांचा सन्मान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

           परिवर्तनच्यावतीने नाट्यप्रयोगाची निर्मिती करण्यात आली. कार्यक्रमाचे दिग्दर्शक हर्षल पाटील, नाट्य दिग्दर्शक हनुमान सुरवसे, संगीत दिग्दर्शक शरद भालेराव, नृत्य दिग्दर्शक नाना सोनवणे यांचे होते. ७० कलावंतांचा सहभाग असलेल्या नाटकात अहिल्याबाईंच्या जीवनातील विविध प्रसंगांची नाट्यात्मक मांडणी करून सादर केले होते. आकर्षक वेशभूषा, प्रभावी संगीत, उत्तम शाहिरी साथ, गाणी, नृत्य आणि अभिनेत्यांनी केलेला उत्तम अभिनय याद्वारे हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रभावीपणे सादर करण्यात आला. प्रेक्षागृहात अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. रसिकांनी नाटकास उत्तम दाद दिली. अहिल्यादेवींच्या जिवनावरील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभागाचे विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांचे सहकार्य लाभले होते. अहिल्यादेवींचे कार्य हे आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असून या थोर समाजसेवी कर्तृत्ववान महिलेच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी यासाठी ही निर्मिती केल्याचे शंभू पाटील यांनी सांगितले. 

               नाटकात नेहा पवार, दिपक महाजन, तन्वी काटकर, गणेश सोनार, मंगेश कुलकर्णी, होरिलसिंग राजपूत, अक्षय नेहे, योगीता भालेराव, विकास वाघ, गणेश सोनार, पवन भोई यांच्यासह ६० कलावंत सहभागी होते. रंगभूषा चिंतामण पाटील यांनी तर वेशभुषा अजय पाटील यांनी केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व कलावंतांचा सन्मान करण्यात आला.

शेतरस्ता व पाणंद रस्ता मोकळे करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा उपक्रम

 शेतरस्ता व पाणंद रस्ता मोकळे करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा उपक्रम!


मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जळगाव
जिल्हा प्रशासनाने शेतरस्ते व पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे!

राष्ट्रीय लोक अदालतीत ११,०८१ प्रकरणे निकाली; ३१.५५ कोटींची वसुली



                 जळगाव, दि. 23 मार्च : ( जिमाका वृत्तसेवा ) जिल्हा न्यायालय व अन्य न्यायालयांमध्ये दिनांक २२ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. न्यायालयातील प्रलंबित व दाखलपूर्व मिळून एकूण ११,०८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून ३१,५५,७६,९३९/- रुपयांची वसुली करण्यात आली.

या लोक अदालतीमध्ये ९,२७६ दाखलपूर्व आणि १,८०५ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच १९ ते २१ मार्च दरम्यान झालेल्या विशेष मोहिमेत आणखी ६८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

मा. श्री. एस. एन. राजुरकर, प्र. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा न्यायाधीश-१ जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत यशस्वी झाली. सर्व न्यायाधीश, वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांच्या सहकार्याने या उपक्रमाला मोठे यश लाभले.