Tuesday, 9 September 2014

प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शकतेसाठी प्रयत्नशील : तहसिलदार बाबासाहेब गाढवे


प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शकतेसाठी प्रयत्नशील !
                                                              :तहसिलदार बाबासाहेब गाढवे

            चाळीसगांव,दिनांक 09:- प्रशासकीय यंत्रणेत गतिमानता, सुसूत्रता आणता येईल अशा प्रकारचे अभिनव प्रयोग सुवर्ण जयंती राजस्व अभियांनातंर्गत राबवून प्रशासकीय यंत्रणेतील पादर्शकतेसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी आज पातोंडा येथील दाखले वाटप  शिबीरात केले.
            महसूल प्रशासनामार्फत आज ‍पातोंडा, शिरसगांव, तळेगांव, मेहुणबारे व बहाळ या पाचही मंडळ स्तरावर सुवर्ण जयंती राजस्व अभियानातंर्गत विविध दाखले वाटप  शिबीरांचे एकाच दिवशी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व प्रशासनातील सर्व कर्मचा-यांसह पाचही मंडळ स्तरावर  शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  पातोंडा मंडळातील ‍ शिबीरास स्वत: तहसिलदार बाबासाहेब गाढवे तर शिरसगांव मंडळात निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, तळेगांव मंडळात निवडणूक नायब तहसिलदार विजय सुर्यवंशी, मेहुणबारे मंडळात नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, बहाळ मंडळात संजय गांधीचे नायब तहसिलदार अनंत परमार्थी  यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात रेशन कार्ड, रहिवास दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॅशनॅलीटी, डोमिसाईल, सातबारा उतारे, दुय्यम  शिधा पत्रीका, विद्यार्थ्यांना शैक्षणीक कामासाठी लागणारे विविध दाखले आदि वाटप करण्यात आले यावेळी तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी उपस्थित ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या प्रसंगी विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित असल्याने  वेळीच समस्यांचे निराकरणही करण्यात आले.
            तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, गावातील सार्वजानिक स्वरुपाचे हक्क ‍निश्चित करुन ते दर्शविणारी पत्रके गावाच्या दप्तरात असावी याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. तरी अशा प्रकारच्या नोंदी हया प्रत्येक गावाच्या दप्तरी असणे जरूरीचे असल्याने निस्तार पत्रके व वाजिब-उल-अर्ज तयार करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अशी पत्रके व नोंदी हया अद्यावत नसल्याने सार्वजानिक जागांबाबत व वहिवाटींबाबत होणा-या वादांची प्रकरणे न्यायालयात दाखल होतात व काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात त्याअनुषंगाने गावातील सार्वजानिक वहिवाटीच्या नोंदी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.
            सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवितांना लोक सहभागातून शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी ‍मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश शेतक-यांना जाण्यायेण्यासाठी सुयोग्य रस्ता उपलब्ध करुन देणे हा असून ब-याच शेतक-यांना इच्छा असूनही उस, केळी, फळबाग, भाजीपाला यासारखी नगदी पिके शेतरस्ता उपलब्ध नसल्यामुळे घेता येत नाही. बैलगाडी किंवा इतर वाहने  अतिक्रमीत रस्त्यावरुन जावू शकत नसल्यामुळे पावसाळयात पेरणी वेळेवर होऊ शकत नाही. आंतर मशागतीसाठी आवश्यक अवजारांची ने-आण करणे कठीण होते. शेतमाल तात्काळ बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे शेतरस्त्याअभावी जिकरीचे होते. शेतरस्त्याअभावी काढणी, कापणी यंत्रे शेतापर्यंत घेऊन जाणे शक्य होत नाही. या सर्व समस्या लक्षात घेऊन शेतरस्ते, शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी शेतक-यांनी या मोहिमेत अधिकाधिक सहभाग नोंदवावा असे आवाहनही तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी यावेळी केले.
तालुक्यात पाचही ठिकाणी राबविण्यात आलेले शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व विविध विभागातील अधिकारी कर्मचा-यांनी  परिश्रम घेतले असून गांवक-यांनीही या ‍शिबीराचा मोठया प्रमाणात लाभ घेतला आहे.

        
                                                         * * * * * * * *

No comments:

Post a Comment