Sunday, 21 September 2014

मतदार शिक्षण व सहभागाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा : निवडणूक निरीक्षक मरिअप्पन


मतदार शिक्षण व सहभागाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा !

: निवडणूक निरीक्षक मरिअप्पन 

            चाळीसगांव,दिनांक 21 :- भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे या साठी भारत निवडणूक आयोगाचा मतदार शिक्षण व सहभागाचा पध्दतशीर कार्यक्रम (SVEEP-II) हा अधिक प्रभावीपणे राबवावा असे प्रतिपादन मतदार जनजागृतीचे निवडणूक निरीक्षक मरिअप्पन यांनी आज तहसिल कार्यालयातील आढावा बैठकीत केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे निरीक्षकांचे संपर्क अधिकारी ए.व्ही.भोकरे, उप विभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गट विकास अधिकारी मालती जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद  रविंद्र जाधव यांच्यासह तालुक्यातील क्षेत्रीय अधिकारी, बी.एल.ओ. कॅम्पस अँम्बेसेडर आदि उपस्थित होते.

            या बैठकीत निरीक्षक मरिअप्पन यांनी कॅम्पस अँम्बेसेडर यांच्याशी संवाद साधतांना विधानसभा निवडणूक-2014 करिता केलेल्या उपाय योजनांची माहिती जाणून घेतली व नवीन पिढीमध्ये लोकप्रिय झालेल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मतदान जनजागृती प्रभावीपणे करण्याच्या सुचना केल्या. तर एकूण मतदान केंद्राच्या कमी मतदान झालेल्या 10 टक्के मतदान केंद्रावरील बी.एल.ओ. यांच्याशी चर्चा करून सुयोग्य असे मार्गदर्शन केले.

            आढावा बैठकीत पुढे मार्गदर्शन करतांना प्रामुख्याने (SVEEP-II) कार्यक्रम प्रभावीपणे राबवितांना  शहरी व ग्रामीण भागात बॅनर्स व पोस्टर्स लावणे, चित्ररथाव्दारे मतदार जनजागृती करणे, मतदान यंत्राचे प्रशिक्षण राबविण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेवीका, बी.एल.ओ. यांचा सहभाग वाढविणे, महाविद्यालय परिसरात लोकशाहीसाठी मतदान मोहिम राबविणे, मतदानाचे आवाहन करणारी स्क्रीप्ट स्थानिक केबल वाहिनीवरुन प्रसारीत करणे व सर्वात कमी मतदान झालेल्या 10 टक्के मतदान केंद्रांवर मतदान जनजागृती करिता विशेष मोहिम राबविणे अशा विविध सुचना व मार्गदर्शन श्री. मरिअप्पन यांनी आजच्या आढावा बैठकीत केले.

            बैठकीत उपस्थितांना संबोधीत करतांना निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील म्हणाले की, सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचा-यांपासून सुरुवात करावी व मतदान केल्याची बोटाची शाही तपासावी त्याच प्रमाणे मतदानाचे महत्व सर्व सामान्य मतदारांना समजावून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे. मतदान कार्डाचा उपयोग हा ओळख म्हणून  करतात परंतु मतदानासाठी होत नाही ही खेदाची बाब आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 मध्ये  75 टक्यापेक्षा अधिक मतदानाचे लक्ष ठेवून सर्वानी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

सहाय्यक खर्च निरीक्षक ईश्वर घोडे दाखल

            017-चाळीसगांव विधानसभा मतदार संघाकरिता रॅली, प्रचारसभा, मद्यसाठा व खर्च निरीक्षण आदि कामकाजासाठी स्थापन केलेल्या तिनही पथकातील अधिकारी व कर्मचा-यांची आढावा बैठक सहाय्यक खर्च निरीक्षक ईश्वर घोडे यांनी आज तहसिल कार्यालयात घेतली. मतदार संघात तळेगांव/हिरापूर, चिंचगव्हाण, बिलाखेड टोलनाका या ठिकाणी चेकपोस्ट लावण्याच्या सुचना करुन नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांना रोटेशन प्रमाणे विविध चेकपोस्ट वर आता कर्तव्ये बजवावे लागणार असल्याच्या सुचना केल्या. निवडणूक खर्चासंबंधीचे शॅडो रजिष्टर तसेच पथकांकडून अचूक माहिती अपेक्षीत असून निवडणूक आयोगाला वेळोवेळी सादर करावयाचे अहवाल या बाबत सखोल चर्चा व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

                                           * * * * * * * *

                  

No comments:

Post a Comment